Home » उ.महाराष्ट्र, छायादालन, ठळक बातम्या » लाखो भाविकांनी केले पवित्र स्नान

लाखो भाविकांनी केले पवित्र स्नान

  • कुंभमेळ्यातील पहिले शाही स्नान
  • पहिला मान निर्वाणी आखाड्याला
  • दुसरे शाही स्नान १३ सप्टेंबरला

Kumbh_Mela_1 snanनाशिक, [२९ ऑगस्ट] – राखीपौर्णिमेच्या पावन पर्वावर आयोजित कुंभमेळ्यातील पहिल्या शाही स्नानात आज शनिवारी नाशिक आणि त्र्यंबकेश्‍वर येथे लाखो भाविकांनी गोदावरी नदीत पवित्र स्नान केले. विविध आखाड्यांचे महंत आणि साधू यावेळी वेगवेगळ्या घाटांवर उपस्थित होते. शाही स्नानाच्या काळात कुठलीही अप्रिय घटना घडायला नको, यासाठी दोन्ही शहरांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. दोन्ही शहरांमध्ये दुसरे शाही स्नान १३ सप्टेंबर रोजी होणार आहे.
नाशिकमधील गोदावरी नदीत सर्वप्रथम शाही स्नानाचा मान महंत ग्यानदास महाराज यांच्या निर्वाणी आखाड्याला मिळाला. ग्यानदास महाराज हे अ. भा. आखाडा परिषदेचे अध्यक्षही आहेत. सकाळी सव्वा सात वाजता त्यांनी इतर संतमहंतांसोबत पवित्र स्नान केले. त्यानंतर दिगंबर आखाड्याचे अध्यक्ष महंत कृष्णदास महाराज यांच्या नेतृत्वात साधू आणि महंतांनी सकाळी आठ वाजता रामकुंड आणि रामघाटावर डुबकी घेतली. शाही स्नानाचा तिसरा आणि शेवटचा मान मिळाला निर्मोही आखाड्याला. सकाळी साडेनऊ वाजता या आखाड्याचे साधू व महंतांनी गोदावरीत डुबकी घेतली. त्यानंतर विविध आखाड्यातील साधू व महंतांनी शाही स्नानाचा आनंद उपभोगला.
शाही स्नानाला प्रारंभ होण्यापूर्वी वैष्णव पंथीयातील तिन्ही आखाड्यांची शाही मिरवणूक तपोवन येथील लक्ष्मीनारायण मंदिरातून निघाली. फुलांनी सुशोभित वाहने, अश्‍व आणि उंटांवर महंत आणि महामंडलेश्‍वर विराजमान होते. त्यांच्या हाती आपापल्या आखाड्यांचे ध्वज, तलवारी, त्रिशुल यासारखी शस्त्रे होती. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तिन्ही आखाड्यांचे साधू व महंतांचे स्वागत केले. यावेळी जलसंपदा खात्याचे राज्यमंत्री दादा भुसे, नाशिकचे महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरमीत सिंग बग्गा, महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सर्व साधू व महतांचा भगवी वस्त्रे देऊन सन्मान करण्यात आला.
नाशिक आणि त्र्यंबकेश्‍वर येथील सर्वच कुंडांवर भाविकांना स्नानाच्या वेळी कुठलाही धोका निर्माण होऊ नये यासाठी पोहण्यात निष्णात असलेल्यांना तैनात करण्यात आले होते. याशिवाय जीवनरक्षक जवानही सज्ज ठेवण्यात आले होते. याशिवाय ठिकठिकाणी ३५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, नियंत्रण कक्षातून शहरभर देखरेख ठेवली जात आहे. ५८ दिवस चालणार्‍या या कुंभमेळ्याची २५ सप्टेंबर रोजी सांगता होणार आहे.
त्र्यंबकेश्‍वरात पाऊस
दरम्यान, शाही स्नानाला सुरुवात होण्यापूर्वी त्र्यंबकेश्‍वरात शनिवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. या पावसात शैव पंथीयातील १० आखाड्यातील नागा साधूंसह हजारो साधू आणि महंतांचे त्र्यंबकेश्‍वर येथील कुशावर्त तीर्थ घाटावर आगमन झाले. येथे महंत हरिगिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखालील श्री पंच दशानम जुना आखाड्याच्या साधू आणि महंतांना शाही स्नानाचा पहिला मान मिळाला. या आखाड्याच्या साधूंनी पहाटे सव्वाचार वाजता शाही स्नान केले. साधू आणि महंतांशिवाय लाखो भाविकांनीही दोन्ही शहरांमधील विविध घाटांवर डुबकी घेतली.
दोन आखाड्यांच्या साधूंनी उपसल्या तलवारी
दरम्यान, शोभायात्रा काढण्याच्या मुद्यावरून दोन आघाड्यांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर साधू व महंतांनी चक्क एकमेकांवर तलवारी उपसल्या. पोलिसांनी लावलेले सुरक्षा कठडेही त्यांनी तोडून टाकले. पोलिसांनी मात्र अवघ्या २० मिनिटांतच स्थिती नियंत्रणात आणली.
रामकुंडात भाविकाचा मृत्यू
राखीपौर्णिमेच्या दिवशी शाही स्नानात सहभागी झालेल्या एका भाविकाचा नाशिकच्या रामकुंडात बुडाल्याने मृत्यू झाला. या भाविकाची ओळख अद्याप पटली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23696

Posted by on Aug 30 2015. Filed under उ.महाराष्ट्र, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.महाराष्ट्र, छायादालन, ठळक बातम्या (1509 of 2476 articles)


=अरविंद पनगारिया यांचे मत= नवी दिल्ली, [२९ ऑगस्ट] - चीनमध्ये सध्या असलेली आर्थिक मंदीची स्थिती जगभरासाठी चिंतेचा विषय असली तरी ...

×