Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » लाखो लोकांनी घेतला आर्ट ऑफ लिव्हिंगचा प्रत्यक्ष अनुभव

लाखो लोकांनी घेतला आर्ट ऑफ लिव्हिंगचा प्रत्यक्ष अनुभव

art of living world culture festival 2016नवी दिल्ली, [१२ मार्च] – आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर आणि त्यांच्या जगभरातील अनुयायांची यावेळी निसर्गाने आणि अन्य यंत्रणांनी जेवढी परीक्षा पाहिली, तेवढी याआधी कोणीच पाहिली नसेल. मात्र या सर्व परीक्षेत श्री श्री रविशंकर आणि त्यांचे अनुयायी उत्तीर्णच झाले नाही, तर त्यांनी सर्व आव्हानांवर लिलया मात करीत, विश्‍व संस्कृती महोत्सवाचे यशस्वी आयोजन करून जगात भारताचे नाव उंचावले. आर्ट ऑफ लिव्हिंगचा प्रत्यक्ष अनुभव यानिमित्ताने कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या देश-विदेशातील लाखो लोकांनी घेतला.
आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे राजधानी दिल्लीतील मयुरविहार परिसराजवळ यमुना नदीच्या पात्रात विश्‍व संस्कृती महोत्सवाचे ११ मार्चपासून आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे यमुना नदीच्या पात्रात आयोजन करण्यावरच आक्षेप घेण्यात आला. यामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याचा आरोप नेहमीच पर्यावरणाच्या रक्षणाचे काम करणार्‍या श्री श्री रविशंकर यांच्यावर करण्यात आला. हा कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली. मात्र राष्ट्रीय हरित लवादाने आर्ट ऑफ लिव्हिंगवर पाच कोटींचा दंड ठोठावला आणि या कार्यक्रमाचा मार्ग मोकळा झाला.
या कार्यक्रमावर प्रारंभीच्या घटनांमुळे अनिश्‍चिततेचे ढग घोंगावत होते. प्रत्यक्षात उद्‌घाटनाच्या दिवशी म्हणजे शुक्रवार ११ मार्चला खरे ढग घोंगावत आले. सायंकाळी ५ वाजता या महोत्सवाचे उद्‌घाटन होणार असताना सकाळपासूनच दिल्लीत आभाळ दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी तर गाराही पडल्या. त्यामुळे उद्‌घाटन कार्यक्रम होणार असलेल्या परिसरातील व्यवस्था काही प्रमाणात कोलमडून पडली.
विशेष म्हणजे, या सर्व परिस्थितीमुळे विदेशातून हजारोंच्या संख्येत या कार्यक्रमांसाठी आलेले श्री श्री रविशंकर यांचे अनुयायी चिंतेत पडले होते. कार्यक्रम कसा होणार, असा प्रश्‍न त्यांना पडला होता. मात्र या कार्यक्रमात जेवढे अडथळे येत होते, तेवढा श्री श्री रविशंकर आणि त्यांच्या अनुयायांचा उत्साह वाढत होता, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ते जिद्दिने भिडले होते. उद्‌घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमस्थळी पोहोचले आणि आता कोणतीच शक्ती आपल्या कार्यक्रमात अडथळा आणू शकत नाही, असा विश्‍वास आयोजकांमध्ये आला.
या महोत्सवासाठी जगभरातून आलेल्या लाखोच्या संख्येतील अनुयायांच्या आणि व्यवस्थेतील कार्यकर्त्यांच्या फसफसून वाहणार्‍या उत्साहाला आवर घालणे मुसळधार पावसालाही शक्य झाले नाही. जगभरातून आलेल्या कलाकारांनी अतिशय सुरेख सादरीकरण केले. त्यामुळेच कलेचा कुंभमेळा असे याचे वर्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. हजारो लोक पावसाचा आनंद लुटत या कार्यक्रमात सहभागी झाले. अडथळ्यांवर कशी मात करावी आणि प्रतिकूल परिस्थितीतही आनंद कसा लुटावा, याचा म्हणजेच आर्ट ऑफ लिव्हिंगचा प्रत्यक्ष अनुभव हजारो लोकांनी घेतला.
उद्‌घाटनाच्या समारंभात मानवी आणि नैसर्गिक अडथळ्यांचा उल्लेख करण्यावाचून श्री श्री रविशंकर यांनाही राहावले नाही. कोणतेही चांगले काम करत असताना अडथळे येतच असतात, असे उद्‌गार त्यांनी काढले. विशेष म्हणजे, दुसर्‍या दिवशीही पाऊस आला आणि गाराही पडल्या. देवाचा आशीर्वाद म्हणून सगळे या पावसाकडे पाहात होते. त्यामुळे दुसर्‍या दिवसाचे कार्यक्रमही कोणताही अडथळा न येता सुरळीत पार पडले. दुसर्‍या दिवशीच्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, जलसंसाधन मंत्री उमा भारती, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले.
या त्रिदिवसीय कार्यक्रमासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यकर्त्यानी केलेली व्यवस्था अतिशय देखणी आणि दृष्ट लागावी अशी होती. याचा अनुभव कार्यक्रमस्थळाचा फेरफटका मारल्यानंतर आला. कोणत्याही कारणाने हा कार्यक्रम झाला नसता, तर भारताबद्दल जगात चुकीचा संदेश गेला असता, हे निश्‍चित.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27269

Posted by on Mar 13 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (678 of 2477 articles)


=पाकव्याप्त काश्मिरातील निर्वासित नेता शौकत अली काश्मिरीचा गौप्यस्फोट= जिनेव्हा, [१२ मार्च] - दहशतवादावरील पाकिस्तानचा दुतोंडी चेहरा पुन्हा एकदा जगापुढे उघड ...

×