Home » क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या » लॉडर्‌‌सवर भारताने रचला इतिहास

लॉडर्‌‌सवर भारताने रचला इतिहास

=२८ वर्षानंतर भारताचा इंग्लंडवर विजय=
लंडन, [२१ जुलै] – ईशांत शर्माच्या भेदक गोलंदाजीच्या (७-७४) जोरावर, क्रिकेटचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्‍या लॉडर्‌‌स मैदानावर भारताने यजमान इंग्लंडचा ९५ धावांनी पराभव करून ऐतिहासिक विजयाची नोंद केली आणि पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. नॉटिंघम येथे झालेला पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता. तब्बल २८ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर भारताला क्रिकेटच्या पंढरीत विजयाची नोंद करता आल्यामुळे या विजयाला आगळे महत्त्व आहे. पहिल्या डावातील शतकवीर अजिंक्य रहाणे, दुसर्‍या डावात मुरली विजयची मोठी खेळी, भुवनेश्‍वर कुमार आणि रवींद्र जडेजा यांच्या अष्टपैलू कामगिरीपुढे ईशांतची कामगिरी सरस ठरली. ७४ धावांत ७ गडी बाद करून भारताचा विजय सुकर केल्यामुळे ईशांतला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
दोन्ही संघातील तिसरा कसोटी सामना येत्या २७ जुलैपासून खेळला जाणार आहे. १९८६ नंतर २०१४ मध्ये म्हणजे यापूर्वी भारताने लॉडर्‌‌सवर विजयाची नोंद केली तेव्हा सध्याच्या भारतीय संघातील १० खेळाडूंचा जन्मही झाला नव्हता. २०११ नंतर विदेशी भूमीत भारताचा हा पहिला कसोटी विजय आहे. योगायोग असा की १९८३ नंतर २०११ मध्ये पुन्हा विश्‍वचषकावर नाव कोरण्यासाठीदेखील भारताला २८ वर्षे वाट बघावी लागली होती.
एका क्षणी भारतीय संघ पराभवाच्या मार्गावर उभा ठाकला होता. पहिल्या डावात भारताची शान राखली ती भुवनेश्‍वर कुमार व रवींद्र जडेजा यांनी. हे दोघेही गोलंदाज. पण, लॉडर्‌‌सवर फलंदाजांसारखी फलंदाजी करून त्यांनी भारताला अक्षरश: उचलून धरले. याच जोरावर भारताने कसोटीत मुसंडी मारली. खेळाच्या चौथ्या दिवशी दोन्ही संघांना कसोटी मालिकेत आघाडी घेण्याची समसमान संधी होती. भारताचा कर्णधार धोनी व इंग्लंडचा कर्णधार कुक या दोघांवर कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच संपूर्ण क्रिकेट वर्तुळातून टीकेचा मारा सुरू झाला होता. दोघांसाठी हीच मालिका भविष्याचा मार्ग ठरविणारी राहणार असल्याने लॉडर्‌‌सची लढत रंगतदार अवस्थेत आली होती. चौथ्या दिवशीचा खेळ संपला त्यावेळी इंग्लंडने आपल्या दुसर्‍या डावात ४ बाद १०५ धावा केल्या होत्या. त्याच क्षणी भारतीय गोटात उत्साहाचे वातावरण पसरले होते.
सोमवारी पहिल्या दोन तासात भारत बाजी मारेल, असे भाकीतही क्रिकेट तज्ज्ञांनी वर्तविले होते. खेळपट्टीची महिमा ते सांगू लागले होते. पण, रूट (१४) व अली (१५) या नाबाद जोडीने भारताच्या गोलंदाजांचा निर्धाराने सामना केला. धोनीने फलंदाजांभोवती अनेक क्षेत्ररक्षक लावले. पण, झेल येत नव्हते. त्यातच रूटने इंग्लंडला विजयाचा मार्ग दाखविण्यासाठी पुढाकारच घेतला होता. एका टोकाकडून तो धावा काढत होता, तर दुसर्‍या टोकाकडून अली त्याला चिवट साथ देत होता. या जोडीने पहिला तास धैर्याने खेळून काढला. उपहारापर्यंत हीच जोडी नाबाद राहील असेच वाटत होते. या जोडीने शतकी भागीदारी करून भारताच्या तोंडचे पाणी पळविले होते. शेवटी १०१ धावांची भागीदारी केल्यानंतर अलीला टिपण्यात ईशांतला यश आले आणि सामन्याचा नूरच पालटला. मोईन अलीचा (३९) उडालेला झेल पुजाराने टिपला. त्यावेळी इंग्लंडच्या पाच बाद १७३ धावा फलकावर झळकत होत्या.
उपहारानंतर ईशांतने इंग्लंड तंबूत वावटळासारखा सुसाट प्रवेश केला. एका पाठोपाठ एक फलंदाज टिपण्याचा त्याने सपाटा लावला. यष्टिरक्षक प्रायर (१२) आणि बेन स्टोक्स (०) झटपट तंबूत परतले. एक लावून धरणार्‍या रूटला ईशांतने बिन्नीकरवी झेलबाद करून विजयातील मोठा अडसर दूर केला. रूटने १४६ मिनिटे खेळपट्टीवर राहून ६६ धावा काढल्या. ईशांतने ब्रॉडला ८ धावांवर टिपल्यानंतर ऍण्डरसन दोन धावा काढून धावबाद झाला आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. लॉडर्‌‌सवर पराभव पत्करणे म्हणजे कर्णधारपद गमावणे हे समीकरण कुकला जाणवले असावे. तो तरी काय करणार?
जडेजा आणि ऍण्डसरन या दोघांमध्ये पहिल्या कसोटीदरम्यान वादावादी झाल्याने या दोघांभोवतीच लॉडर्‌‌स कसोटी फिरत होती. त्यातच दुसर्‍या डावात जडेजा फलंदाजी करीत असताना ऍण्डरसनच्या धक्क्यातून जखमी होता-होता बचावला. त्यानंतर त्याने मनमोकळी फलंदाजी करून इंग्लंडला चोख प्रत्युत्तर दिले होते. कसोटीतील शेवटचा क्षण जडेजाचाच होता. त्याने ऍण्डरसनला धावबाद केले. भारत ९५ धावांच्या फरकाने जिंकताच संघातील खेळाडूंनी ईशांत शर्माचे भरभरून कौतुक केले. भारताने लॉडर्‌‌स सर केले. कसोटी विजयाचा आनंद कर्णधार धोनी सेनेने सहजतेने साजरा केला. हा सामना बघणारे माजी कर्णधार कपिलदेव, राहुल द्रविड व सौरव गांगुली यांच्या तोंडातून अभिनंदनाचे शब्द मुक्तपणे निघत होते. अभिनंदनाचा वर्षाव खेळांडूंवर होत होता. भारत जिंकताच लॉडर्‌‌सवरील दर्शकांनी उभे राहून व टाळ्यांचा कडकडाट करून भारतीय संघाचे अभिनंदन केले.
महत्वाच्या नोंदी
१) १९८६ मध्ये लॉडर्‌‌सवर भारताने पहिला विजय मिळविला होता. त्यावेळी इंग्लंडचा कर्णधार डेव्हिड गॉवर होता. पराभवाचे खापर त्याच्यावर फोडण्यात आले अन् त्याचे कर्णधारपदही गेले. याची आठवण आज प्रकर्षाने होत होती.
२) चहापानास काही मिनिटे उरली असताना इंग्लंडचा दुसरा डाव ८८.२ षटकांत २२३ धावांत संपुष्टात आला.
३) भारताच्या वेगवान गोलंदाजांच्या इतिहासात ईशांत शर्मा हा दुसर्‍या डावातील सर्वश्रेष्ठ गोलंदाज ठरला. त्याने २३ षटकांत ७४ धावा देत ७ गडी बाद केले. यापूर्वी हा विक्रम जवागल श्रीनाथच्या नावावर होता. त्याने अहमदाबाद येथे दक्षिण आफ्रिकेचे सहा गडी दुसर्‍या डावात टिपले होते.त्याने ११.५ षटकांत २१ धावा दिल्या होत्या. कपिलदेवने मुंबईत इंग्लंडचे पाच गडी ७० धावांत मिळविले होते.
४) लॉडर्‌‌सच्या याच खेळपट्टीवर २०० वे वर्ष साजरे करण्यात आले. त्यानिमित्त आयोजित प्रदर्शनी सामन्यात सचिन तेंडुलकरच्या संघाने शेन वॉर्नच्या संघावर विजय मिळविला होता.
पंतप्रधानांकडून अभिनंदन
लॉडर्‌‌स मैदानावर मिळविलेल्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे. भारतीय संघाच्या कामगिरीचा माझ्यासह सर्व देशवासीयांना अभिमान आहे, असे भारताच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या अभिनंदनपर ट्विटमध्ये म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=14289

Posted by on Jul 22 2014. Filed under क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या (2419 of 2479 articles)


[gallery link="file" orderby="rand"] बर्लिन, [१५ जुलै] - ब्राझीलमधील विश्‍व करंडक फुटबॉल स्पर्धा जिंकल्यानंतर जर्मनी संघातील खेळाडूंना घेवून येणारे बोईंग ७४७ ...

×