Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » विजयादशमीपूर्वीच सीमोल्लंघन

विजयादशमीपूर्वीच सीमोल्लंघन

  • गुलाम काश्मिरात घुसून ठार मारले ४० अतिरेकी
  • देशभर जल्लोष, राजकीय क्षेत्रही उल्हसित

dgmo-ranbir-singh-vikas-swarupनवी दिल्ली, [२९ सप्टेंबर] – भारतीय लष्कराच्या जांबाज कमांडोनी काल रात्री गुलाम काश्मीरमध्ये घुसून धडक कारवाई करत पाकिस्तानी लष्कराच्या २ जवानांसह ३८ अतिरेक्यांचा खात्मा केला. कमांडोंनी अतिरेक्यांचे प्रशिक्षण तळही उद्‌ध्वस्त करत उरी येथील ब्रिगेडच्या लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या १८ भारतीय लष्करी जवानांच्या मृत्यूचा बदला घेतला, एवढेच नाही तर भारताच्या सार्वभौमतेला तडा देण्याचे पाकिस्तानी लष्कराचे तसेच दहशतवाद्यांचे घातक मनसुबे याच पद्धतीने हाणून पाडण्याचा इशाराही आपल्या या कारवाईतून दिला आहे.
भारताने अशी धडक कारवाई केल्याचे पाकिस्तानी लष्कराने नाकारले असले तरी भारतीय लष्कराच्या गोळीबारात पाकिस्तानचे दोन लष्करी जवान मारले गेल्याचे सांगितले आहे. भारतीय लष्करी कमांडोंच्या या कारवाईचे विविध राजकीय पक्षांनी स्वागत केले असून भारतीय लष्करावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोझिकोड येथे भाजपा राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने आयोजित जाहीर सभेतून दिला होता. या धडक लष्करी कारवाईने पंतप्रधान मोदी यांनी आपला शब्द खरा करून दाखवला आहे. त्याचप्रमाणे देशभरातील जनतेने या निमित्ताने व्यक्त केलेल्या अपेक्षांची पूर्तताही केली आहे.
उरी येथील लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे १८ लष्करी जवान शहीद झाल्यानंतर देशभर आक्रोश उसळला होता, पाकिस्तानला त्याच्याच भाषेत धडा शिकवण्यासाठी, शहीद भारतीय जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सरकारवर दबाव वाढला होता. देशातील जनतेच्या या अपेक्षांची पूर्तता करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्कराला गुलाम काश्मीरमध्ये घुसून धडक करावाई करण्यासाठी हिरवी झेंडी दाखवली होती. त्यानुसार लष्कराच्या कमांडो पथकाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाईला अंतिम रूप दिले. विशेष म्हणजे या कारवाईत भारताच्या बाजूने कोणतेही नुकसान झाले नाही. ही कारवाई होण्यापूर्वी लष्कराने अतिशय गोपनीयता बाळगली होती, या कारवाईबाबत कोणालाही ताकास तूर लागू दिला नाही. वृत्तवाहिन्यांनी भारताच्या या धडक कारवाईत ९ पाकिस्तानी लष्करी जवान मारले गेल्याचा दावा केला आहे.
आज सकाळी भारतीय लष्कराचे महासंचालक (लष्करी कारवाई) लेफ्टनंट जनरल रणवीरसिंह यांनी एका पत्रपरिषदेत या धडक कारवाईची माहिती देताच देशभर जल्लोष करण्यात आला. भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयातर्फे संयुक्तपणे या पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरूपही उपस्थित होते. भारताने या प्रथमच या पद्धतीची धडक लष्करी कारवाई केली.
गुलाम काश्मीरमधील एका तळावर भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत काही अतिरेकी असल्याची गोपनीय माहिती आम्हाला मिळाली होती, या माहितीच्या आधारे आम्ही गुलाम काश्मीरमध्ये घुसून या तळावरील अतिरेक्यांचा खात्मा केल्याची माहिती लेफ्टनंट जनरल रणवीरसिंह यांनी दिली.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला लागून असलेल्या गुलाम काश्मीरमध्ये घुसून लष्करी कमांडोंनी ही कारवाई करत अतिरेक्यांचे अनेक प्रशिक्षण तळही उद्‌ध्वस्त केले. लष्करी कमांडो गुलाम काश्मिरात जवळपास ३ किमी आत घुसले होते, रात्री १२.३० वाजता सुरू झालेली ही कारवाई पहाटे ४.३० पर्यत सुरू होती. या कारवाईसाठी लष्करी कमांडो एमआय १७ हेलिकॉप्टरने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसले होते आणि आपली कारवाई यशस्वीपणे पूर्ण करून याचा हेलिकॉप्टरने परत आले. या हेलिकॉप्टरला संरक्षण देण्यासाठी भारतीय वायुदलाची विमाने तयार ठेवण्यात आली होती. लष्करी कमांडोंच्या या कारवाईची माहिती मिळून पाकिस्तानी लष्कर सज्ज होईपर्यत आपली धडक कारवाई यशस्वीपणे पार पाडून लष्करी कमांडो आपल्या देशात परत आले होते. या कारवाईत अनेक अतिरेकी तसेच त्यांचे समर्थक मारले गेल्याचे रणवीरसिंह यांनी स्पष्ट केले.
अतिरेक्यांच्या घुसखोरीच्या प्रयत्नांबद्दल चिंता व्यक्त या कारवाईबाबतची माहिती मी पाकिस्तानी लष्कराचे महासंचालक यांनाही दिली. भारतावर दहशतवादी हल्ला करण्याचा कोणताही प्रयत्न भारतीय लष्कर खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही लेफ्टनंट जनरल रणवीरसिंह यांनी यावेळी दिला. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरुन भारतात अनेकवेळा घुसखोरी करण्याचे प्रयत्न झाले.
पुंछ आणि उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर हे स्पष्ट झाले होते, याकडे लक्ष वेधत रणवीरसिंह म्हणाले की, मात्र भारतीय लष्कराने अनेकवेळा भारतात घुसखोरी करण्याचे प्रयत्न हाणून पाडले. भारतीय लष्कराच्या या कारवाईबद्दल रणवीरसिंह यांनी गौरवोद्‌गार काढले.
पाकिस्तान हादरले
भारताच्या या धडक लष्करी कारवाईने पाकिस्तान हादरले आहे. या कारवाईचा आम्ही निषेध करतो. शांततेचा मार्ग स्वीकारण्याच्या आमच्या भूमिकेला आमचा भेकडपणा समजू नका, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी व्यक्त केली आहे. भारताची ही कृती म्हणजे युद्धबंदी कराराचे उल्लंघन असल्याचा आरोपही पाकिस्तानने केला आहे. या घटनेनंतर नवाज शरीफ यांनी तातडीने आपल्या संरक्षण मंत्र्यांना पाचारण करून त्यांच्याकडून या कारवाईबाबत माहिती घेतल्याचे वृत्त आहे. भारताच्या या लष्करी कारवाईवर चर्चा करून पुढील कारवाईची आपली दिशा ठरवण्यासाठी नवाज शरीफ यांनी उद्या आपल्या मंत्रिमंडळाची बैठक बोलावल्याचे समजते. भारताने भीमबेर, हॉटस्प्रिंग, केल आणि लिपा या भागात घुसून ही कारवाई केल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.
पर्रीकर, डोभाल वॉररूममध्ये
बुधवारी रात्री सुरू झालेल्या या धडक लष्करी कारवाईवर लष्कराच्या वॉररूममध्ये बसून संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि लष्कर प्रमुख लक्ष ठेऊन होते. ही कारवाई यशस्वी होऊन लष्करी कमांडो सुखरूप आपल्या देशात परतताच पर्रीकर यांनी सुटकेचा श्‍वास सोडला. बुधवारी रात्री तटरक्षक दलाने एका मेजवानीचे आयोजन केले होते. या कारवाईसाठी ती मेजवानी रद्द करण्यात आली.
पाकव्याप्त नव्हे, गुलाम काश्मीर!
जम्मू-काश्मीर हे भारताचे अभिन्न अंग आहे. त्यामुळे १९६२ मध्ये चीनने आणि १९४७ मध्ये पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या ज्या भागावर कब्जा केलेला आहे, तो भाग आम्ही हस्तगत केल्याशिवाय राहणार नाही, आणि या भागांबाबत सरकार कोणतीही तडजोड करू शकत नाही, असा ठराव भारतीय संसदेने २२ फेब्रुवारी १९९४ रोजी सर्वसंमतीने पारित केलेला आहे. त्या अर्थाने सध्याचा पाकव्याप्त काश्मीरचा भाग भारतासाठी ‘गुलाम काश्मीर’ आहे. त्यामुळे तरुण भारतने पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख यापुढे ‘गुलाम काश्मीर’ असाच करण्याचा निर्णय घेतला आहे. तभाच्या चोखंदळ वाचकांनीही यापुढे सार्वजनिक चर्चेप्रसंगी, भाषणांमध्ये अथवा लेखांमध्ये ज्या-ज्या ठिकाणी पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख येईल त्या ठिकाणी ‘गुलाम काश्मीर’ या शब्दावलीचाच उपयोग करावा, अशी अपेक्षा आहे.
लष्करी जवानांच्या सुट्या रद्द
या घटनेनंतर सीमेवरील हालचाली वाढल्यामुळे लष्कराला अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लष्कर, सीआरपीएफ तसेच सीमा सुरक्षा दलाचे जवान तसेच अधिकार्‍यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानी लष्कराकडून प्रत्युत्तरात कारवाई होण्याच्या शक्यतेमुळे पंजाब आणि जम्मू काश्मीर सीमेवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला लागून असलेला १० किमीचा परिसर रिकामा करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिले आहेत. सीमावर्ती राज्यातील रुग्णालयातही आवश्यक ती व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राष्ट्रपतींना दिली माहिती
गुलाम काश्मीरमध्ये घुसून लष्करी कमांडोंनी केलेल्या या धडक कारवाईची माहिती राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल तसेच मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना देण्यात आली. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेत त्यांना या धडक कारवाईची माहिती दिल्याचे समजते. भाजपेतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही या कारवाईबाबतची माहिती देण्यात आली.

भारतीय लष्कराची अभूतपूर्व धाडसी कारवाई
attack-2भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या तयारीत असलेल्या पाकप्रशिक्षित अतिरेक्यांना गुलाम काश्मिरात घुसून भारतीय लष्कराच्या शूर जवानांनी गोळ्या घालून ठार मारलं असून, चार तासांच्या जबरदस्त कारवाईत अतिरेक्यांचे सात तळ उद्‌ध्वस्त केले आहेत. पाकिस्तानी अतिरेक्यांनी उरी येथील भारतीय लष्कराच्या शिबिरावर हल्ला केला होता अन् त्यात आमचे १८ जवान शहीद झाले होते. त्या घटनेपासून देशभर पाकविरुद्ध आक्रोश होता. पाकिस्तानचा बदला घेतला पाहिजे अशी जनभावना होती. त्या जनभावनेचा आदर करीत मोदी सरकारने धाडसी निर्णय घेत गुलाम काश्मिरात आपले सैनिक पाठवून अतिरेक्यांचे कंबरडे मोडले. या अभूतपूर्व कारवाईचे देशभर स्वागत झाले असून, पाकिस्तानला एक कठोर संदेश गेला आहे. आठ दिवस सतत अभ्यास केल्यानंतर गुलाम काश्मिरातील नेमक्या कोणत्या ठिकाणी हल्ला करायचा, हे निश्‍चित करून भारतीय सैनिकांनी बुधवारच्या रात्री धडक कारवाई केली. या कारवाईमुळे लष्कराचे मनोबल तर वाढलेच आहे, देशातील जनतेचे धैर्यही वाढले आहे. या कारवाईबद्दल देशभरातून लष्कराचं अभिनंदन केलं जात आहे.
चार तासातील घडामोडी
१) बुधवारी रात्री १२.३० वाजता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात. विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विशेष सेना दलाच्या पॅराट्रूपर्सचा मोहिमेत सहभाग.
२) प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय कमांडोजना हेलिकॉप्टर्समधून उतरविले. येथून त्यांनी गुलाम काश्मिरात प्रवेश केला.
३) धोरणात्मक हल्ले (सर्जिकल स्ट्राईक्स) करण्यासाठी कमांडोजनी गुलाम काश्मिरच्या सीमेत ३ किलोमीटर आत मुसंडी मारली.
४) पाकिस्तानच्या बाजूच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भिंबेर, हॉटस्प्रिंग, केल आणि लिपा सेक्टरमध्ये सर्वशक्तीनिशी हल्ले.
५) विस्वसनीय सूत्रानुसार हल्ल्याची ही ठिकाणं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून ५०० मीटर्स ते २ किलोमीटर अंतरावर.
६) दहशतवाद्यांची ७ तळं उद्ध्वस्त
७) भारतीय लष्कराने धोरणात्मक हल्ल्यात ४० दहशतवादी आणि पाकिस्तानच्या दोन सैनिकांना कंठस्नान घातले. भारतीय बाजूने कुठलीही जीवितहानी झाली नाही. ठार झालेल्यांमध्ये दहशतवादी, त्यांचे मार्गदर्शक आणि सूत्रधारांचा समावेश आहे.
८) बुधवारी रात्री १२.३० वाजता सुरू झालेल्या कारवाईत हेलिकॉप्टर्सचा वापर करण्यात आला. ही कारवाई सकाळी ४.३० वाजता आटोपती घेण्यात आली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29331

Posted by on Sep 30 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (85 of 2477 articles)


नवी दिल्ली, [२९ सप्टेंबर] - भारताने गुलाम काश्मीरमध्ये बुधवार-गुरुवारच्या रात्री दहशतवाद्यांचे अड्डे उद्‌ध्वस्त करण्याचे धाडस दाखवत पाकिस्तानचा अतिरेकी चेहरा जगासमोर ...

×