Home » आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप » समता, बंधुतेच्या बळावरच देशाची प्रगती

समता, बंधुतेच्या बळावरच देशाची प्रगती

=लंडन येथील लोकार्पण कार्यक्रमात फडणवीस यांचे प्रतिपादन=
modi fadanvis unveils-ambedkar-memorial-at-londonलंडन, [१४ नोव्हेंबर] – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक पातळीवरील स्मारकाचे लंडन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करून महाराष्ट्र सरकारने आज या महान नेत्याला अनोखी मानवंदना दिली. याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, बाबासाहेबांनी संविधानात अधोरेखित केलेल्या समता आणि बंधुतेच्या बळावरच देशाची प्रगती होऊ शकेल, अशा भावना अभिप्राय स्वरूपात शब्दबद्ध केल्या.
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेले निवासस्थान स्मारक म्हणून सामान्य जनतेसाठी आज खुले करण्यात आले. या छोटेखानी पण ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कार्यक्रमाला या दोन्ही नेत्यांसह राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खासदार रामदास आठवले, माजी मंत्री सुलेखा कुंभारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
लंडनमधील किंग हेन्री मार्गावरील या ऐतिहासिक वास्तूत पंतप्रधानांचे आगमन झाले, तेव्हा जयभीमच्या जयघोषांनी हा परिसर दुमदुमून गेला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी या निवासस्थानाला भेट दिल्यानंतर त्याठिकाणी ठेवण्यात आलेली दुर्मिळ छायाचित्रे आणि अन्य संस्मरणीय वस्तुंची माहिती जाणून घेतली. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण अभिवादन केले. या वास्तुची पाच मिनिटे पाहणी केल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी बाहेर येऊन या स्मारकासमोर मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांना हात उंचावून अभिवादन केले. त्याहीवेळी नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या निवासस्थानामुळे समानता आणि सामाजिक न्यायाचा संदेश कायम जगाला प्रेरणा देत राहील, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भावना व्हिजिटर बुकमध्ये नोंदविल्या. त्यात ते म्हणतात की, एक ऐतिहासिक दिवस! भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेले घर, जेथे राहून त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण ग्रहण केले, ते घर आज पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजींच्या हस्ते स्मारक रूपाने जनतेकरिता खुले झाले आहे. समता आणि बंधुता या आधारावर समाज आणि देश प्रगती करू शकतो, हे आपल्या संविधानाच्या माध्यमातून मा. बाबासाहेबांनी अधोरेखित केले आहे. भारतमातेच्या या सच्च्या सुपुत्राला माझी वंदना. पंतप्रधान मुंबईत इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी आले असताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणादरम्यान त्यांना या ऐतिहासिक निवासस्थानाला भेट देण्याची विनंती केली होती. पंतप्रधानांनीही हे निमंत्रण सहर्ष स्वीकारून त्यानुसार आपल्या लंडन दौर्‍यात त्यांनी या कार्यक्रमाचा समावेश केला आणि हा ऐतिहासिक दिवस आज संपूर्ण जगाला पहायला मिळाला.
पॅरिस हल्ल्यानंतर राज्यातील स्थितीचा आढावा
पॅरिस येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लंडनहून राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याकडून राज्यातील सुरक्षेच्या स्थितीचा आढावा घेतला. राज्यात सर्वार्थाने सतर्कता बाळगून आणि कुठलीही अनुचित परिस्थिती उद्भवणार नाही, यासाठी पोलिस दलाने काळजी घ्यावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी पोलिस महासंचालकांना दिले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25442

Posted by on Nov 15 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप (1251 of 2483 articles)


पॅरिस, [१४ नोव्हेंबर] - पॅरिस येथील अतिरेकी हल्ल्यानंतर एका रात्रीत होत्याचे नव्हते झालेल्या फ्रेंच नागरिकांनी आपले मित्र, आप्तेष्टांशी संवाद साधण्यासाठी ...

×