Home » छायादालन, ठळक बातम्या, रा. स्व. संघ, राष्ट्रीय, सांस्कृतिक » सामाजिक एकतेसाठी शिवशक्तीची गरज

सामाजिक एकतेसाठी शिवशक्तीची गरज

  • लाखोंची उपस्थिती असलेल्या शिवशक्ती संगमात सरसंघचालकांचे प्रतिपादन
  • संघशक्तीचे विराट दर्शन
  • राष्ट्रहित सर्वप्रथम
  • सत्यम्, शिवम्, सुंदरम् हीच आपली संस्कृती
  • संघकार्य जगासाठी प्रेरणादायी
  • निश्‍चितच मिळवेल भारत माता विश्‍वगुरूचे स्थान

पिंपरी, [३ जानेवारी] – भारत देश हा एक परिवार आहे आणि मातृभूमी आपल्या आईसारखी आहे. आपल्यासाठी समाज आणि राष्ट्रहित सर्वतोपरी असायलाच हवे. समाजाला शक्तिशाली करण्यासाठी, समाजाच्या एकतेसाठी शिव आणि शक्ती एकत्र येणे आवश्यक आहे. सत्यम्, शिवम्, सुंदरम् हीच आपली संस्कृती आणि परंपरा आहे. समुद्रमंथनातून निघालेले विष पचविणार्‍या भगवान शिवाला शक्तीची जोड मिळाल्यानेच समाजावर त्या विषाचा परिणाम झाला नव्हता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यही असेच आहे. ‘जगात कुठेही दु:ख असो, तिथे जाऊन सेवा करणारा’ अशी संघाची ओळख आहे. स्वयंसेवक जाती, धर्म असा कुठलाही भेद न मानता, कोणतेही संकट असो, समाजसेवेसाठी सदैव धावून जातो. कारण, हा समाज आपलाच आहे, या मातृभूमीतील प्रत्येक व्यक्ती आपलीच आहे, ही शिकवण केवळ संघकार्यातून आणि समाजसेवेच्या अनुभवातून मिळत असते, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज रविवारी येथे केले.
रा. स्व. संघाच्या पश्‍चिम महाराष्ट्र प्रांताच्यावतीने पुण्याजवळील मारुंजी या गावात सुमारे ४५० एकर परिसरात ‘शिवशक्ती संगम’ या एकदिवसीय भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तीन लाखांवर उपस्थित असलेल्या स्वयंसेवक आणि नागरिकांना संबोधित करताना सरसंघचालकांनी शिवशक्ती संगमाची परिभाषा विशद केली. यावेळी सरसंघचालकांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांचाही आवर्जून उल्लेख केला.
शिव ही आपली परंपरा आहे. सत्यम्, शिवम्, सुंदरम् ही आपली संस्कृती आहे. आपला समाज शिवाला ओळखणारा असला, तरी जगाची परंपरा शक्ती ओळखणारी आहे. शक्तीशिवाय सत्य चालत नाही, असे मानणारा आपला समाज आहे. शक्तिमान राष्ट्रांच्या वाईट गोष्टींवर चर्चा होत नाही, त्या निमूटपणाने पाळल्या जातात. तिथेच दुर्बल राष्ट्रांच्या चांगल्या कामांनाही किंमत मिळत नाही, असे सांगताना डॉ. मोहनजी भागवत यांनी एक उदाहरण सांगितले. ते म्हणाले की, नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर एका देशात व्याख्यानासाठी गेले. पण, तिथे आयोजकांशिवाय कुणीच नव्हते. विद्यार्थी का नाही, असे टागोर यांनी विचारले असता, गुलाम देशाच्या व्यक्तीचे भाषण ऐकणे आम्हाला मान्य नाही, अशी विद्यार्थ्यांची भूमिका असल्याने ते अनुपस्थित राहिले, असे उत्तर टागोर यांना देण्यात आले. तेव्हाची सत्यता वेगळी होती. पण, आता भारत स्वतंत्र झाला. युद्धात विजय मिळाल्याने शक्ती वाढली आहे. आज संयुक्त राष्ट्रात भारताने मांडलेला प्रत्येक ठराव मंजूर होतो. ही शक्तीचीच किमया आहे. ज्याच्याजवळ शक्ती आहे, त्याचेच लोक ऐकतात. इतरांचे कितीही बरोबर असले, तरी त्याचे ऐकणे लोकांना बंधनकारक वाटत नाही, याकडेही सरसंघचालकांनी लक्ष वेधून त्यासाठी जागतिक योग दिवसाचे उदाहरणही दिले.
एखादा समाज किंवा देश शक्तिशाली असला, तरी शक्तीला दुसर्‍यांचे शोषण किती करावे, याची माहिती नसल्याने, शीलयुक्त शक्ती असणे आवश्यक आहे. शिलाचा महत्त्वाचा घटक सत्य आहे. जो सत्यनिष्ठ नाही, तो शिलसंपन्न होऊच शकत नाही. जगात जीवांचे आणि जीवनांचे विविध प्रकार दिसत असले, तरी जीवनाची जात एकच आहे. त्यांचा स्वीकार करा. त्यांच्याकडे समतेच्या दृष्टीने पाहा. आत्मीयतेच्या दृष्टीने पाहा. सत्यात भेद, विषमतेला स्थान नाही. तू-मी श्रेष्ठ, नीच, कनिष्ठ ही भेददृष्टी आहे. सत्याप्रमाणे वागा म्हणजे, सर्वांना आपले माना. सर्वांचाच स्वत:सारखा विचार करा. कुणीही लहान मोठा नाही. सामाजिक एकतेतून शक्ती प्राप्त होत असते. समाज कितीही साधनसंपन्न असला, तरी जगाच्या धकाधकीत तो उद्‌ध्वस्त होत असतो. संकल्प दृढ असायलाच हवा. कारण, केवळ संकल्पबद्ध समाजच मोठा होऊ शकतो, असे डॉ. भागवत यांनी स्पष्ट केले.
सरसंघचालकांनी धर्माविषयीदेखील आपले मत व्यक्त केले. धर्म सर्वांना जोडून ठेवतो, त्यांना विखरू देत नाही. त्यांची प्रगती करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संदेश देताना संविधान सभेच्या भाषणात म्हटले आहे की, या संविधानाने आपल्यात राजनीतीक एकता तर आली आहे. पण, सामाजिक एकता येणेही तितकेच आवश्यक आहे. आपसातील भेदांमुळे फितुरतावाद्यांनी आपलाच देश इंग्रजांच्या ताटात भेट केला. आपण जर सामाजिकदृष्ट्या एक आलो नाही, तर संविधानही आपले रक्षण करू शकणार नाही. यासाठी संविधानात अनेक तरतुदी आहेत. पण, नुसत्या कायद्याने समरसता येत नाही. त्यासाठी समतायुक्त आचरणाची सवय लागावी लागते. स्वार्थाच्या भानगडीत न पडता, सर्व समाज आपला आहे, या भावनेतूनच समतामय समाज निर्माण होऊ शकतो. केवळ कायदे पुरेसे नाही. म्हणूनच अशा शक्तीची आपल्याला आवश्यकता आहे. शिवत्वाशिवाय शक्ती नाही आणि शक्तीशिवाय शिव नाही. गुणविहिन रुपाला अर्थ नाही, त्याचा नाश होत असतो. त्यागपूर्ण समाजाची स्थापना करण्यासाठी शिव-शक्तीचा संगम होणे आवश्यक आहे, असे मोहनजी म्हणाले.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजपाचे सर्व मंत्री, साधू-महंत प्रामुख्याने उपस्थित होते.
सरसंघचालकांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे –
– डॉ. हेडगेवार यांचे बालपण खडतर होते. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांच्या माता-पित्यांचा मृत्यू झाला. कमाई जास्त नव्हती. मोठ्या भावाचे लक्ष पहेलवानीकडे आणि लहान भाऊ शिकत होता. या स्थितीतही त्यांनी जबाबदारी पार पाडली. सोबतच, राष्ट्रहितार्थ जी-जी कामे चांगली होती, त्यातही ते सहभागी झाले. जोपर्यंत देशाचे दु:ख दूर होत नाही, तोपर्यंत स्वत:चा विचार करायचा नाही. राष्ट्रविचार प्रथम, हे धोरण स्वीकारून त्यांनी सर्व चळवळीत भाग घेतला. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. सश्रम कारावास भोगला. गणेशोत्सवाच्या भाषणातून समाजबोधनाचे कार्य केले. डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यांच्याशी चर्चा करताना त्यांना एक कळले की, आपण हाती घेतलेले काम पूर्ण होईलच, असे नाही. कारण, कुणीतरी बाहेरून येतो आणि आपल्याला गुलाम बनवितो. हा प्रसंग आपल्या देशावर सातवेळा आला आहे. शत्रूंच्या ताकदीमुळे नव्हे, तर आपल्यात काही त्रुटी असल्यानेच तो प्रसंग आपल्यावर आला. त्यांच्या स्वत:च्या अनुभवाचा निष्कर्षही हाच होता. त्यामुळे त्यांनी समाजकार्यात स्वत:ला गुंतविले.
-या सर्व सूत्रांचा उगम या देशातील सनातन मूल्यात आहे. विविधतेत एकतेचे दर्शन घडते. एकतेच्या साक्षात्कारालाच जीवनाचे सर्वोच्च मानून, सर्व प्राणीमात्रेविषयी कृतज्ञता बाळगणे हेच ते मूल्य आहे आणि त्याची प्रेरणा देणारी आपली संस्कृती आहे. पंख वेगळे असले, तरी संस्कृती एक आहे. तिला सर्व जग हिंदू संस्कृती म्हणून ओळखते… यामागचे कारण आपली मातृभूमी आहे… प्रत्येक हिंदू तिला माता मानतो… तिच्यावर पाय ठेवण्यापूर्वी तिला नमन करतो… तिची माफी मागतो… भारत, भारतीय आणि मातृभूमी हीच आपली संस्कृती आहे.
– जगात कुठेही दु:ख असो, तिथे जाऊन सेवा करणारा अशी रा. स्व. संघाची ओळख आहे. दुष्काळ, पूर असो वा भूकंप, कोणत्याही संकटाची माहिती मिळताच जात, धर्म, पंथ, संप्रदाय अशा विचारात न पडता, सर्वच जण आपले आहेत, हा विचार करून, धावून जाणारा म्हणजेच संघ. हा विचार मनात येणे ही देशाची आवश्यकता आहे. देशोन्नतीचा हा एकमेव उपाय आहे. नेते, सरकार यांच्या बळावर देश वाढत नाही. सरकार, नेते जे करतात, ते टिकविण्यासाठी समाजाची गरज असते. समाज परिवर्तनातून व्यवस्था परिवर्तन यशस्वी होऊ शकते आणि त्यासाठी चारित्र्यसंपन्न लोकांची गरज असते. संघाने ९० वर्षांचा अनुभव घेतला आहे. तो पाहा… विचारधारा कोणतीही असो, कामाचे क्षेत्र कोणतेही असो, जगाच्या उत्थानाची नीती कोणतीही असो, प्रामाणिकपणे देश उभा राहावा, यासाठीची भावना आपल्यात असायला हवी. सरसंघचालक या नात्याने मी बोलत नाही. पण, देश-विदेशात फिरल्यानंतर माझे असे मत झाले. विदेशातील लोकही आम्हाला भेटले. कार्यपद्धती कोणती, याची विचारणा केली. स्वत:ला आणि परिवाराला सुरक्षित ठेवायचे असेल, तर आधी देश सुरक्षित राहायला हवा. त्याशिवाय व्यक्तिगत सुरक्षा शून्य आहे. संघकार्य आज जगासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
– आज जी शक्ती आहे, त्यातून समाजाची सेवा करणे आणि सेवा करताना आपली शक्ती उत्तरोत्तर वाढविणे, हेच संघकार्य आहे. यावर विचार करा. देशाचीही अशीच स्थिती उत्पन्न करायची, असा विचार ज्यांचा असेल, त्यांनी स्वार्थाचा त्याग करावा आणि आपल्या इच्छेनुसार कोणतेही समाजसेवी कार्य उचला.
या शिवशक्ती संगमासाठी कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी व्यासपीठावर तीन मजली भव्य देखावा उभारला होता. त्यावर राज्यातील किल्ल्यांची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. तेथूनच सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी स्वयंसेवकांना उद्बोधन केले.
लक्षवेधक
– एकूण ४०० एकरांचा परिसर या शिवशक्ती संगमसाठी सज्ज करण्यात आला होता. या १०० एकरांचे संघस्थान, २०० एकरांचा वाहनतळ आणि १५० एकरांचे सिद्धता केंद्र अशी रचना होती.
– सात मजली घराइतका म्हणजेच ७० फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर भगवा फडकवण्यात आला होता. २०० फूट लांब, १०० फूट रुंद आणि ८० फूट उंचीच्या व्यासपीठावर सरसंघचालक आणि इतर मान्यवर विराजमान होते.
– व्यासपीठामागे तोरणा किल्ल्याचे चित्र, राजगडावरील सदरेची प्रतिकृती आणि रायगडावरील मेघडंबरीची प्रतिकृती शिवरायांच्या प्रतिमेसह उभारण्यात आली होती.
– १ जानेवारी रोजी या शिवशक्ती महासंगमसाठी एक लाख ५८ हजार ७७८ पूर्ण गणवेशात सहभागी होणार्‍या स्वयंसेवकांची नोंदणी झाली होती. या नोंदणीत दोन दिवसांत आणखी भर पडली असल्याचे सांगण्यात आले.
– दीड लाखाहून अधिक स्वयंसेवक आणि तितकेच नागरिक अशा तीन लाखांपेक्षा अधिक संघ चाहत्यांचा हा महासंगम होता. स्वयंसेवकांमध्ये ३५ हजार ७१३ महाविद्यालयीन तरुण, ३५ हजारांहून अधिक नोकरदार, ३३ हजारांहून अधिक व्यवसायी, आठ हजारांपेक्षा जास्त डॉक्टर, वकील, सीए, सीएस, आठ हजारांपेक्षा जास्त सेवानिवृत्त आणि २० हजारांपेक्षा जास्त शेतकरी या शिवशक्ती संगमसाठी नोंदले गेले होते.
जवळपास दीड लाख स्वयंसेवकांची उपस्थिती आणि लाखभर नागरिकांची हजेरी यामुळे शिवशक्ती संगम संमेलन हा अपूर्व अनुभव ठरला. एवढ्या मोठ्या संख्येने स्वयंसेवक आणि नागरिक येऊनही कार्यक्रमात कोठेही गडबड, गोंधळ झाला नाही. अत्यंत शिस्तीने पार पडलेल्या या देखण्या सोहळ्याची आठवण पुणे आणि पिंपरीकरांना होत राहील. १९८३ मध्ये पुण्याजवळ तळजाई टेकडीवर राष्ट्रीय संघाचे प्रांत शिबिर झाले होते. त्यापेक्षा किमान पाचपट उपस्थिती असलेल्या या शिबिरात आज शिस्तीचे अनोखे दर्शन पाहावयास मिळाले. पश्‍चिम महाराष्ट्रात रा. स्व. संघाच्या वाढलेल्या ताकदीचे प्रत्यंतरही या कार्यक्रमाने आले. या कार्यक्रमासाठी सुमारे दीड लाख स्वयंसेवकांनी नोंदणी केली होती. याशिवाय इतरही नागरिकही सुमारे त्याच संख्येने उपस्थित होते. परगावहून येणार्‍या स्वयंसेवकांची वाहने आणि स्थानिकांची वाहने यामुळे संगमस्थळी वाहतुकीची कोंडी होईल, असे वाटत होते. मात्र, संघ स्वयंसेवकांनी अतिशय काटेकोर पद्धतीने नियोजन केल्याने वाहतूक कोंडीचा प्रसंग उद्भवला नाही. संघ स्वयंसेवकांनी कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्यासाठी केलेले नियोजनही अत्यंत रेखीव होते. संमेलनात संघ स्वयंसेवकांनी केलेले संचलन उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26411

Posted by on Jan 4 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, रा. स्व. संघ, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, रा. स्व. संघ, राष्ट्रीय, सांस्कृतिक (941 of 2479 articles)


बॉम्ब निकामी करताना लेफ्ट. कर्नल शहीद आणखी दोन अतिरेक्यांचा खात्मा रावळपिंडीत रचण्यात आला कट सात जवानांना आले वीरमरण पठाणकोट, ...

×