Home » छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र » साहित्यिकांपुढे संवेदना निर्माण करण्याचे आव्हान

साहित्यिकांपुढे संवेदना निर्माण करण्याचे आव्हान

=मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन, घुमान साहित्य संमेलनाचा थाटात समारोप=
Punjab Deputy CM Sukhbir Singh Badal with Maharashtra CM Devendra Fadnavis during the 88th Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan at Ghumanघुमान, [५ एप्रिल] – आजचे युग हे डिजिटायझेशनचे युग आहे. मात्र, डिजिटायझेशन मधून संवेदना निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्यासारख्या साहित्यिकांपुढे समाज, लोक, तरुण पिढी यांच्यात संवेदना निर्माण करण्याचे खरे आव्हान आहे. घुमान येथील साहित्य संमेलन हे त्या दिशेने टाकलेले प्रभावी पाऊल आहे. त्यामुळे अशा सकारात्मक प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले.
बाबा नामदेवांच्या नगरीत, पंजाबमधील घुमान येथे आयोजित ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल, महाराष्ट्राचे शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, स्वागताध्यक्ष भारत देसडला, सरहद संस्थेचे संजय नहार, साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य, अन्य पदाधिकारी, पंजाब सरकारचे अधिकारी, मंत्री तसेच मान्यवर उपस्थित होते.
मुखमंत्र्यांनी पूर्णतः वैचारिक भूमिका मांडताना प्रथम संत नामदेवांच्या कार्याला नमन केले. साहित्य हे पूल निर्माण करणारे असते. संस्कृती, धर्म, समाज यांच्यात ऐक्य निर्माण करण्याचे काम साहित्य करीत असते, असे सांगून घुमान येथील साहित्य संमेलनाने मराठी आणि पंजाबी साहित्यास नवे वळण मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. मराठी संस्कृतीत साहित्य संमेलनाची परंपरा आहे, तशी अन्य कोणत्याच प्रांतात नाही. महाराष्ट्र आणि पंजाव यांचे संबंध गेल्या सातशे वर्षांपासूनचे आहेत, असे सांगून पुढील काळात ते अधिक वृद्धिंगत होतील, असे ते म्हणाले. नव्या पिढीशी संवाद साधून वाचन संस्कृती जगवावी लागेल. पराभूत मनोवृत्ती पासून नवा मार्ग शोधण्याचे काम संत साहित्याच्या सहाय्याने करावे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.
पुस्तकांचे गाव निर्माण करणार : विनोद तावडे
राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आपल्या भाषणात साहित्यिकांसाठी जे जे करणे शक्य आहे ते सर्व करू, असे सांगून विविध संकल्पना मांडल्या. यामध्ये पुस्तकांचे स्वतंत्र गाव निर्माण करून लाख दीड लाख पुस्तके या गावात ठेवून मान्यवर साहित्यिकांकडून वाचकांना मार्गदर्शन करता येईल असे आपले स्वप्न असल्याचे तावडे यांनी सांगितले. मराठीला अभिजात दर्जा मिळण्याचे काम आता दृष्टीपथात आहे. मराठी साहित्य महामंडळ आणि नाट्य महामंडळ यांना अनुदान मागावे लागू नये, अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी दर विजयादशमीला या दोन्ही संस्थांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाईल, अशी व्यवस्था करीत आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा तावडे यांनी केली.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आपल्या भाषणात मराठी व पंजाबी संस्कृतीच्या इतिहासाचा दाखला देत घुमान येथील संमेलन ऐतिहासिक असल्याचे स्पष्ट केले. मराठी साहित्याने राज्याचा उंबरठा ओलांडला असून आता नव्या क्षितिजाकडे हे संमेलन झेपावत आहे, असे ते म्हणाले. मराठी संस्कृती, पंजाबी संस्कृती, भाषा यासाठी पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
हे तर ऐतिहासिक संमेलन -प्रा. सदानंद मोरे
महाराष्ट्राबाहेर काम केलेल्या मराठी माणसांबद्दल आपल्या मराठी माणसाला माहिती नाही. त्यामुळे अशा थोर मराठी माणसांचा महाराष्ट्रातील अभ्यासक्रमात समावेश केला जावा, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ सदानंद मोरे यांनी केले. संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. काश्मीर , पंजाब आणि महाराष्ट्र यांचे फार जुने नाते आहे. असे ऐतिहासिक संमेलन कधीही झाले नाही असे ते म्हणाले.
आपल्या भूतकाळात रमण्यापेक्षा आपण आपल्या भविष्यकाळाचा विचार करण्याची गरज आहे असे ते म्हणाले .
राष्ट्रसंत नामदेव महाराज यांच्या नावे महाराष्ट्राबाहेरील साहित्यिकांना सन्मानित केले जावे, तसेच संत गुलाबराव महाराज यांचे पुण्यात स्मारक बांधले जावे, अशी मागणीही त्यांनी महाराष्ट्र शासनाला केली. ह्या वर्षीचे साहित्य संमेलन हे लोकांच्या संत नामदेव महाराजांवरील असलेल्या श्रद्धेमुळेच पार पडले असेही मत त्यांनी व्यक्त केले.
पंजाब आणि महाराष्ट्र हे स्वाभाविक मित्र असून ह्या दोन महान संस्कृतींची देवाण-घेवाण सुरू राहावी, असे ते म्हणाले. समारोप प्रसंगी भारत देसडला, सरहद चे संजय नहार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. महामंडळाच्या अध्यक्ष माधवी वैद्य यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी प्रा. रहमान राही आणि जतिंदर पन्नू यांचा सत्कार करण्यात आला. एकूण समारोप समारंभ पाहुण्यांच्या भरगच्च उपस्थितीत पार पडला व घुमान सारख्या पंजाब राज्यातील आडगावात आयोजित केलेल्या या देखण्या संमेलनाचे सूप वाजले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21906

Posted by on Apr 6 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र (1825 of 2476 articles)


=मुख्यमंत्र्यांची घोषणा= संत साहित्य नामदेव नगरी (घुमान), [५ एप्रिल] - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबई येथील इंदू ...

×