Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » स्वदेशी जीपीएसचे स्वप्न पूर्ण

स्वदेशी जीपीएसचे स्वप्न पूर्ण

=इस्रोची ऐतिहासिक कामगिरी, सातव्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण=

श्रीहरिकोटा, [२८ एप्रिल] – संपूर्ण स्वदेशी दिशादर्शक यंत्रणा उभारण्याच्या दिशेने भारताने आज गुरुवारी आणखी एक पाऊल पुढे टाकले असून, आयआरएनएसएस-१ जी हा यंत्रणेतील सातवा आणि अखेरचा उपग्रह येथून यशस्वीपणे अवकाशात सोडण्यात आला.
सुमारे महिनाभराच्या कालावधीत आयआरएनएसएस-१ जी कार्यान्वित झाल्यानंतर इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिमच्या (आयआरएनएसएस) माध्यमातून पृथ्वी आणि समुद्री नेव्हिगेशन, आपत्ती व्यवस्थापन, वाहनांचे ट्रॅकिंग व व्यवस्थापन, प्रवाशांना नेव्हिगेशन मदत आणि चालकांसाठी दृश्य व आवाजी नेव्हिगेशन यंत्रणा उपलब्ध होणार आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (पीएसएलव्ही-सी३३) या प्रक्षेपकाने क्षेपणास्त्रासह येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी १२.५० वाजता अवकाशात झेप घेतली. २० मिनिटांनंतर उपग्रह यशस्वीपणे त्याच्या कक्षेत स्थिरावला. पीएसएलव्ही प्रक्षेपकाच्या माध्यमातून उपग्रह यशस्वीपणे अवकाशात सोडण्याची ही सलग ३४ वी वेळ आहे.
आधी सोडण्यात आलेल्या चार उपग्रहांच्या माध्यमातून आयआरएनएसएस आधीच कार्यान्वित असून, या यंत्रणेला अधिक कार्यक्षम आणि अचूक करण्यासाठी उर्वरित तीन उपग्रहांचा वापर करण्यात येणार आहे, असे इस्रोकडून सांगण्यात आले. अमेरिकेच्या ग्लोबल पोझिशनिंग (जीपीएस) यंत्रणेच्या धर्तीवर भारताने संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाने ही यंत्रणा विकसित केली असून, यामुळे इस्रोच्या शिरपेचात आणखी एका मानाचा तुरा खोवला गेला. इस्रोच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार सातही उपग्रह सोडण्याच्या या मोहिमेवर एकूण १४२० कोटी रुपये खर्च झाले आहेत.
मेक इन इंडियाचे उत्तम उदाहरण : पंतप्रधान
आयआरएनएसएस-१ जी या सातव्या नेव्हिगेशन उपग्रहाचे पीएसएलव्ही सी-३३ च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला असून, या नेव्हिगेशन यंत्रणेचा फायदा केवळ भारतालाच नव्हे तर सार्क सदस्य देशांनाही होईल, असे म्हटले आहे.
सर्वप्रथम या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोचे सर्व वैज्ञानिक आणि संपूर्ण चमूचे मी मनापासून अभिनंदन करतो. सोबतच सर्व भारतीयांचेही मी अभिनंदन करतो, असे पंतप्रधान मोदी यांनी टीव्हीवरून दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
ही शास्त्रज्ञांनी जनतेला दिलेली अनोखी भेट आहे. या नव्या तंत्रज्ञानाचा देशातील जनतेला खूप फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच हे मेक इन इंडिया, मेड इन इंडिया आणि मेड फॉर इंडियन्सचे उत्तम उदाहरण आहे. १२५ कोटी भारतीयांना आता नवे नेव्हिक मिळाले आहे, असेही मोदी म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28077

Posted by on Apr 29 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (410 of 2477 articles)


मुंबई, [२८ एप्रिल] - पाणीटंचाईची भर पडल्याने यंदाची दुष्काळी परिस्थिती अधिक आव्हानात्मक आहे. मात्र, चांगल्या पावसाचा अंदाज असल्याने या परिस्थितीचे ...

×