Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » स्वदेशी स्कॉर्पेन पाणबुडीचे जलावतरण

स्वदेशी स्कॉर्पेन पाणबुडीचे जलावतरण

=सुस्तावलेपणामुळेच युद्धनौकांना अपघात: संरक्षण मंत्री पर्रिकर यांचे मत=
Scorpene_submarineमुंबई, [६ एप्रिल] – संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून देशातच विकसित करण्यात आलेल्या स्कॉर्पेन या अत्याधुनिक पाणबुडीचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते आज सोमवारी येथे थाटात जलावतरण करण्यात आले. सुस्तावलेपणा आणि प्रमाणित पद्धतीचा योग्य वापर न करण्यामुळेच भारतीय नौदलाच्या युद्धनौकांना अपघात झाले, असे मत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
युद्धनौका आणि पाणबुड्यांना होणारे अपघात टाळण्यासाठी जबाबदारी निश्‍चित करण्यासोबतच प्रमाणित पद्धत काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे, असे पर्रिकर म्हणाले. या संपूर्ण स्वदेशी पाणबुडीचे माझगाव डॉकयार्ड येथे जलावतरण केल्यानंतर ते बोलत होते.
स्कॉर्पेन पाणबुडी म्हणजे भारतीय नौदलाच्या ‘प्रोजेक्ट-७५’ या पाणबुडी कार्यक्रमाचा एक भाग आहे. फ्रान्सच्या सहकार्याने या जातीच्या सहा पाणबुड्या देशातच विकसित करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, त्यातील ही पहिलीच पाणबुडी आहे. उर्वरित पाच पाणबुड्या आगामी काही वर्षातच नौदलात दाखल करण्यात येणार आहेत. यावेळी आयोजित समारंभात पर्रिकर यांच्यासह नौदल प्रमुख ऍडमिरल आर. के. धोवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ही पाणबुडी पुढील वर्षी सप्टेंबरपासून कार्यरत होणे अपेक्षित आहे. सध्या भारतीय नौदलाकडे डिझेल आणि इलेक्ट्रॉनिक अशा पारंपरिक पाणबुड्या आहेत. त्यात दहा रशियन किलो क्लास आणि चार जर्मन एचडीडब्ल्यू पाणबुड्यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमानंतर पर्रिकर पत्रकारांशीही बोलले. युद्धनौका आणि पाणबुड्यांना अपघात कशामुळे होतात आणि ते टाळण्यासाठी कोणती पावले उचलायला हवी, असे विचारण्यात आले असता त्यांनी नौदलाच्या सुस्तावलेपणावर ठपका ठेऊन कठोर संदेश देण्याचा प्रयत्न केला. युद्धनौकांच्या सुचालनासाठी प्रमाणित कार्यपद्धतीचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. त्यात कोणतीही त्रुटी राहायला नको. जास्तीत जास्त सतर्कता पाळली जावी, यासाठी जबाबदारीही निश्‍चित करण्यात येत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पर्रिकर यांनी संरक्षण प्रकल्पांवरून संपुआ सरकारवरही टीका केली. या प्रकल्पांबाबत आधीचे सरकार गंभीर नव्हते. संरक्षण धोरणातील आधीच्या सरकारच्या सर्व चुका मोदी सरकार सुधारत आहे. संरक्षण प्रकल्पांना चालना दिली जात आहे, असे पर्रिकर म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21917

Posted by on Apr 7 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1822 of 2477 articles)


=पंतप्रधानांची सूचना= नवी दिल्ली, [६ एप्रिल] - पौर्णिमेच्या रात्री चंद्राचे शीतल चांदणे सर्वत्र पसरलेले असते. चंद्राच्या प्रकाशामुळे अंधारावर मात होते. ...

×