Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » २६/११ च्या सूत्रधारांवर पाक करणार कारवाई

२६/११ च्या सूत्रधारांवर पाक करणार कारवाई

  • मोदींच्या चाणक्यनीतीचे मोठे यश
  • एनएसए करणार लवकरच चर्चा
  • दहशतवाद संपुष्टात आणण्याचा संयुक्त निर्धार

Modi-Nawazऊफा, [१० जुलै] – शांघाय सहकार्य संघटना परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी रशियातील ऊफा येथे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली. तब्बल ५५ मिनिटांच्या चर्चेत २६/११ च्या सूत्रधारांविरुद्ध कारवाई करण्यासोबतच पाकमध्ये रेंगाळत असलेल्या खटल्याला गती देणे, सर्वच ज्वलंत मुद्यांवर चर्चेची प्रक्रिया पुन्हा सुरू करणे आणि दक्षिण आशियातील दहशतवाद पूर्णपणे मोडित काढण्यावर दोन्ही पंतप्रधानांनी भर दिला.
गेल्यावर्षी मे महिन्यात नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला नवाझ शरीफ उपस्थित झाले होते. त्यानंतर उभय नेत्यांमध्ये आज प्रथमच औपचारिक भेट आणि चर्चा झाली. द्विपक्षीय संबंधाच्या आड येणार्‍या बहुतेक सर्वच मुद्यांवर उभय नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी २६/११ च्या मुंबई अतिरेकी हल्ल्याच्या सूत्रधारांविरुद्ध अद्याप न झालेल्या कारवाईचा मुद्दा प्रखरपणे मांडला. मुंबई हल्ल्यातील आरोपींच्या आवाजांचे नमुने भारताकडे सोपविण्यासही शरीफ तयार झाले आहेत. तसेच, एकमेकांच्या देशातील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या मासेमारांची येत्या १५ दिवसांत मुक्तता करण्याचेही या बैठकीत ठरले. यावेळी नवाझ शरीफ यांनी त्यांना सार्क परिषदेच्या निमित्ताने पुढील वर्षी पाकला येण्याचे निमंत्रण दिले असून, मोदी यांनी ते स्वीकारले आहे.
या बैठकीनंतर दोन्ही देशांच्या संयुक्त पत्रपरिषदेला परराष्ट्र सचिव एस. जयशंकर आणि एजाज अहमद चौधरी यांनी संबोधित केले. मोदी आणि शरीफ यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेचा तपशील त्यांनी एका निवेदनातून सादर केला. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि पाकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझिज यांच्यात दहशतवादाच्या मुद्यावर नवी दिल्लीत लवकरच बैठक होणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
दहशतवाद हाच दोन्ही देशांच्या संबंधांच्या आड येणारा मुख्य मुद्दा आहे. ही समस्या कायमची निकाली काढण्यासाठी परस्परांना सहकार्य करण्यावर दोन्ही पंतप्रधानांमध्ये एकमत झाले आहे. दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित करतानाच विकासाला प्रोत्साहन देण्याची दोन्ही देशांची जबाबदारी आहे आणि त्यासाठी सर्वच ज्वलंत मुद्दे चर्चेच्या माध्यमातून सोडविण्याचा दोन्ही देशांचा निर्धार आहे, असेही यात नमूद आहे.
मोदी पाकला जाणार
पुढील वर्षी आयोजित सार्क परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी पाकिस्तान दौर्‍यावर जाणार आहेत. नवाझ शरीफ यांनी याबाबत दिलेले निमंत्रण मोदी यांनी स्वीकारले आहे. नरेंद्र मोदी यांची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करणार असल्याचे ट्विट शरीफ यांनी भेटीनंतर केले आहे.
अमेरिकेकडून स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवाझ शरीफ यांच्यात झालेल्या चर्चेचे अमेरिकेने स्वागत केले आहे. आशिया उपखंडात वाढत असलेला तणाव कोणाच्याही हिताचा नाही, असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. आपसातील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देश जी पावले उचलतील, त्याचे आम्ही स्वागतच करू, असेही त्यांनी सांगितले.
मोदी-शरीफ भेटीतील १० महत्त्वाचे मुद्दे
१) सर्व ज्वलंत मुद्यांवर चर्चा करण्यावर सहमती
२) सर्वप्रकारच्या दहशतवादाचा निषेध
३) दहशतवाद संपविण्यावर दोन्ही देशांमध्ये एकमत
४)२६/११ च्या सूत्रधारांवरील खटल्याचा जलद निपटारा करणार
५)२६/११ च्या आरोपींचे आवाजांचे नमुने देण्यास पाक सहमत
६) सार्क परिषदेकरिता पुढील वर्षी पाकचा दौरा करण्याचे शरीफांचे निमंत्रण मोदींनी स्वीकारले
७) दहशतवादाशी संबंधित सर्व मुद्यांवर दोन्ही देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दिल्लीत चर्चा करणार
८) लष्करी मोहिमांच्या महासंचालकांच्या बैठकीनंतर बीएसएफ डीजी आणि पाक रेंजर्स डीजी यांच्यात चर्चा होणार
९) एकमेकांच्या ताब्यातील सर्व मासेमारांची १५ दिवसांत सुटका, नौकाही परत करणार
१०) धार्मिक पर्यटनाकरिता आवश्यक ती यंत्रणा उभारण्यावर चर्चा करण्यावर एकमत

Short URL: https://vrittabharati.in/?p=23378

Posted by on Jul 11 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या (1575 of 2483 articles)


बिहार विधान परिषद निवडणूक नितीश-लालू आघाडीला फक्त १० जागा पाटणा, [१० जुलै] - याच वर्षी होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीची ...

×