Home » छायादालन, ठळक बातम्या, विदर्भ » ५०० शहरांमध्ये व्यापक विकास अभियान

५०० शहरांमध्ये व्यापक विकास अभियान

=पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नागपुरात घोषणा, नागपूर मेट्रो रेल्वेचे थाटात भूमीपूजन=
नागपूर, [२१ ऑगस्ट] – देशात नव्या १०० स्मार्ट सिटीज उभारून तेथे सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांची उपलब्धता आणि देशातील निवडक ५०० नगरांमध्ये बहुद्देशीय विकास अभियान प्रकल्प अशा दोन महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरात केल्या.
नागपुरातील मेट्रो रेल्वेच्या कार्याचा भूमीपूजन समारंभ व पारडी उड्डाण पुलाचा कोनशिला समारंभासाठी आले असता नापगुरात ते बोलत होते. कस्तुरचंद पार्कवर आयोजित विशाल जाहीर सभेत त्यांनी ही घोषणा केली. व्यासपीठावर राज्यपाल के. शंकरनारायण, महामार्ग, रस्ते वाहतूक, ग्रामविकास व जहाज उद्योग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय शहरविकास, गृहनिर्माण व गरिबी निर्मूलन मंत्री वेंकय्या नायडू, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयुष गोयल, महापौर प्रा. आ. अनिल सोले, नासुप्रचे सभापती प्रवीण दराडे, मनपा आयुक्त श्याम वर्धने उपस्थित होते. आपल्या ४० मिनिटांच्या घणाघाती भाषणात पंतप्रधानांनी देशाच्या विकासासाठी सरकारतर्फे आगामी काळात राबविण्यात येणार्‍या अनेक विकास योजनांचे सुतोवाच केले.
मोदी म्हणाले, अनेकांचे बलिदान दिल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. भारतानंतर अनेक छोटे देशही स्वतंत्र झाले. पण, विकासाच्या बाबतीत ते भारताच्या कितीतरी पुढे गेले आणि आज जगात विकसित देश म्हणून त्यांनी ख्याती प्राप्त केली. पण, १२५ कोटींचा भारत मात्र मागेच राहिला. याची पीडा आम्हाला होते का? कारण, आगामी भारताच्या निर्माणासाठी लोकसंख्या वाढ, वीज, पाणी, आरोग्य, रस्ते अशा सर्वच गरजांच्या बाबी लक्षात घेऊन योग्य नियोजनच करण्यात आले नाही. त्याचे परिणाम आज दिसत आहेत. आज स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे लोटली. पण, आम्ही गरिबी दूर करू शकलो नाही. आज जग वेगाने बदलत आहे. भारताचेही वेगाने नागरीकरण, शहरीकरण होत आहे. याला आपण संकट, आव्हान किंवा संधी म्हणावे का? माझा विचार वेगळा आहे. मी शहरीकरणाला एक संधी मानतो. आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू मानतो. शहरे वाढतच जाणार आहेत आणि नागरीकरणही होणारच आहे. याला आम्ही संधी मानून सर्वांनी मिळूनमिसळून आगामी समृद्ध भारताची एक ब्ल्यू प्रिंट तयार केली पाहिजे. आज खेड्यातील जनता शहरांकडे धाव घेत आहे. तो भार दूर करण्यासाठीच देशात १०० स्मार्ट सिटी निर्माण करण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला आहे. या शहरांत एकाच वेळी हजारो लोक राहू शकतील. येथे मेट्रो, रस्ते, शाळा, महाविद्यालये, आरोग्याच्या सोयी, तंत्रज्ञान केंद्रे यासह सर्व आधुनिक सोयीसुद्धा असणार आहेत. हे काम जर वेगाने झाले तर एक नवा समृद्ध भारत निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.
सार्वजनिक स्वस्त प्रवास
आज देशात प्रवासी वाहतुकीची समस्या सर्वत्र भेडसावत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आमच्या सरकारने स्वस्त दरात सार्वजनिक प्रवासी वाहतूक प्रणाली विकसित करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी एकाच वेळी हजारो लोक प्रवास करू शकतील, अशा मेट्रो प्रकल्पांना प्राधान्य देण्याचे आणि हे काम वेगाने करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
५०० नगरांचा विकास
सोबतच देशात ५०० नगरे, छोटी नगरे, महानगरांची निवड केली जाणार आहे. या नगरांमध्ये आधुनिक स्वच्छता व विकास प्रकल्प राबविण्यात येऊन त्याचा लाभ लगतच्या खेड्यांना कसा होईल, याची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात येणार आहे. यात नागरिक-खाजगी सहभागीतेच्या आधारावर पाणी शुद्धीकरण व कचर्‍यावर प्रक्रिया करणारे मोठमोठे प्रकल्प उभारले जातील. मला विश्‍वास आहे की, आम्ही सांडपाणी आणि कचर्‍यातून सोने निर्माण करू शकतो. शुद्ध केलेले पाणी लगतच्या गावखेड्यातील भाजी आणि शेती करणार्‍या अल्पभूधारकांना पुरविण्यात येईल. कारण, या शुद्ध केलेल्या पाण्यात एक प्रकारचे जैविक खत असते. त्यामुळे उत्पादन होणारे धान्य आणि भाजीपाला आपसूकच सेंद्रीय खते वापरून निर्माण झालेला मिळणार आहे. त्यामुळे उत्पादन तर वाढेलच, आरोग्यावरही दुष्परिणाम होणार नाहीत. आज खतांवर देण्यात येणार्‍या सबसिडीचा बराच निधी वाचेल. तो नगरांच्या विकास कामांसाठी देण्यात येईल.
स्वच्छता का राखत नाही?
आम्ही भारतीय दुबईला जातो, सिंगापूरला जातो. तेथे रस्त्यावर कागदाचा साधा तुकडा देखील नसतो. आम्हीच परतल्यावर त्या देशांचे गोडवे गातो. पण, आम्ही देशवासी? वाट्टेल तेथे कचरा टाकतो, घाण करतो, पान खाऊन पिचकार्‍या मारतो. आपण दुबई आणि सिंगापूरसारखाच आपला देशही स्वच्छ ठेवू शकत नाही का? जनतेने स्वच्छतेच्या नियमांचे पालन केले तर आरोग्याच्या समस्या उद्भवणार नाहीत, शिवाय त्यावरचा खर्चही वाचेल. त्यामुळे प्रत्येक देशवासीयाने मी स्वच्छता पाळीन असा निर्धार केला पाहिजे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. सर्व नगरांचे पदाधिकारी व नगरसेवकांनी या कामी पुढाकार घेतला पाहिजे, असाही सल्ला त्यांनी दिला.
गरिबांना शहरात रोजगार
आज गावखेड्यातून गरीब लोक, युवक रोजीरोटीसाठी शहरात येतात. त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यांना कौशल्यावर आधारित छोटछोटे अभ्यासक्रम शिकविण्याची गरज आहे. त्यामुळे ते आपल्या पायावर उभे राहू शकतील. यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. गरिबी निर्मूलनासाठी आमचे सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
भ्रष्टाचार जनतेनेच रोखावा
आमच्या देशाला भ्रष्टाचाराने पोखरून टाकले आहे. ६० वर्षे झालीत, देशाची लूटच करण्यात आली. केवळ नेत्यांनीच नव्हे तर ज्याला ज्याला संधी मिळाली, त्या सर्वांनी या लुटीत हात धुवून घेतले. जनतेनेच जर निर्धार केला तर आम्ही ही भ्रष्टाचाराची बीमारी दूर करू शकतो. केवळ निम्न दर्जाच्या लोकांनाच शिक्षा होते. हे बरोबर नाही. मी जेव्हा भ्रष्टाचाराची चर्चा करतो, तेव्हा राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता पसरते. तुम्हीच सांगा, मला या भ्रष्ट राजकारण्यांसाठी काम करायचे आहे की, देशाच्या जनतेसाठी? आमचे सरकार भ्रष्टाचार निखंदून काढण्यासाठी संकल्पबद्ध आहे, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. आमच्या देशाची अर्धी लोकसंख्या युवा आहे. या युवांना योग्य संधी उपलब्ध करून दिल्या तर आमचा देश कधीही मागे राहणार नाही, असे उद्गार पंतप्रधानांनी काढले.
तत्पूर्वी, नागपूर जिल्ह्यातील मौदा येथे एनटीपीसीच्या एक हजार मेगावॅट क्षमतेच्या वीजनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले.
नागपूरनंतर आता पुण्यात मेट्रो
नागपूरनंतर आता पुण्यातही मेट्रोचे उद्घाटन होईल, अशी घोषणा केंद्रीय शहरी विकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी याच कार्यक्रमात केली.
यानंतर मुंबईत मेट्रो-३ प्रकल्प सुरू करण्यात येईल आणि कालबद्ध कालावधीत तो पूर्ण करण्यात येईल, अशीही माहिती नायडू यांनी दिली. आम्ही शहरांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
नागपूरच्या विकासाला नवी दिशा मिळेल
नितीन गडकरी यांचा विश्‍वास
नागपूरच्या पूर्व-पश्‍चिम तसेच उत्तर व दक्षिण भागाला जोडणारा प्रस्तावित मेट्रो प्रकल्प आणि पारडी येथील साडेचार किलोमीटर लांबीच्या दहा लेनचे उड्डाणपूल यासारख्या प्रकल्पांमुळे येत्या काळात नागपूरच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्‍वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.
नागपूर हे देशातील झपाट्याने विकास करणार्‍या सुंदर शहरांपैकी एक शहर आहे. विदर्भाच्या या परिसरात टायगर कॅपिटल तयार होत आहे. पंतप्रधानांच्या व्यक्तिमत्त्वातही एका वाघाचेच दर्शन होत असल्याचे गौरवोद्गारही यावेळी गडकरी यांनी काढले. आपल्या अखत्यारीतील मार्ग परिवहन व जहाज बांधणी विभागाचे स्वरूप व कार्यपद्धती बदलण्याचा प्रयत्न वेगाने सुरू असून, येत्या काळात या विभागाच्या माध्यमातून देशाच्या जीडीपीत किमान दोन टक्क्यांच्या वाढीचे योगदान प्राप्त होईल, असे ते म्हणाले. आगामी काळात देशात सर्वदूर रस्त्यांचे जाळे विणण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. आता मागासलेपणाची चर्चा नकोच, आता विकासाची भाषा बोलू या! असे नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
चोख पोलिस बंदोबस्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या आजच्या कार्यक्रमासाठी कस्तुरचंद पार्क आणि संपूर्ण नागपूर शहरात गुरुवारी चोख पोलिस बंदोबस्त उभारण्यात आला होता. मैदानावरील सुरक्षेचे नियोजनही तेवढेच चोख होते. मुसळधार पावसातही कार्यक्रमस्थळी येणार्‍या नागरिकांची कसून तपासणी केली जात होती. तर कस्तुरचंद पार्ककडे येणार्‍या मार्गावरील वाहतूक नियंत्रित करण्याचे मोठे आव्हानही पोलिस यंत्रणेने समर्थपणे पेलले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=15405

Posted by on Aug 22 2014. Filed under छायादालन, ठळक बातम्या, विदर्भ. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, विदर्भ (2399 of 2480 articles)


=बीसीसीआय खडबडून जागी झाली,= नवी दिल्ली, [१९ ऑगस्ट] - इंग्लंड दौर्‍यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-३ ने सपाटून मार सहन ...

×