Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ५ लाख रस्ते अपघातात दीड लाख लोकांचा मृत्यू

५ लाख रस्ते अपघातात दीड लाख लोकांचा मृत्यू

=नितीन गडकरी यांची व्यक्त केली नाराजी,
नवी दिल्ली, ६ सप्टेंबर –
२०१६ मध्ये ४ लाख ८० हजार ६५२ रस्ते अपघात झाले असून यात १ लाख ५० हजार ७८५ जण मृत्युमुखी पडले, तर ४ लाख ९४ हजार ६२४ जण जखमी झाल्याचे केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज स्पष्ट केले. रस्ते अपघातातील बळींच्या संख्येबाबत गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली असून, ही संख्या कमी करण्यासाठी आपले मंत्रालय कृतसंकल्प असल्याची घोषणा गडकरी यांनी यावेळी केली.
रस्ते अपघाताबाबतचा २०१६ चा अहवाल जाहीर करतांना गडकरी म्हणाले की, देशात, दर तासाला होणार्‍या ५५ अपघातात १७ जणांना आपले प्राण गमवावे लागतात.
२०१५ च्या अपघातांच्या तुलनेत २०१६ मध्ये अपघातांचे प्रमाण ४. १ टक्क्याने कमी झाले, जखमींच्या संख्येतही १.१ टक्क्याने घट झाली; मात्र दुर्देवाने मृतांच्या आकड्यात ३.२ टक्क्याने वाढ झाली आहे, असे स्पष्ट करत गडकरी म्हणाले की, १८ ते ३५ या वयोगटातील अपघातातील मृतांचा आकडा ४६.३ टक्के म्हणजे ६९,८५१ आहे.
देशातील रस्त्याच्या जाळ्यात राष्ट्रीय महामार्गाचे प्रमाण २ टक्के असले तरी एकूण अपघातांच्या ३० टक्के अपघातात राष्ट्रीय महामार्गावर होतात आणि त्यातील बळींचा आकडा ३५ टक्के आहे, याकडे लक्ष वेधत गडकरी म्हणाले की, अपघातात मृत्युमुखी पडणार्‍यांमध्ये दुचाकी चालकांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ३४.८ टक्के आहे, तर अपघातात मृत्युमुखी पडणार्‍या पादचार्‍यांचे प्रमाण १०.५ टक्के आहे.
दुचाकी वाहनांच्या अपघातात ५२५०० जणांचा मृत्यू झाला, यातील जवळपास २० टक्के म्हणजे १०१३५ मृत्यू हेल्मेट परिधान न केलेल्यांचे होतेे, असे स्पष्ट करत गडकरी म्हणाले की, सर्वाधिक म्हणजे ८४ टक्के अपघात चालकाच्या चुकीमुळे झाले असून यात ८०.३ टक्के लोकांचे मृत्यू झाले, तर ८३.९ टक्के लोक जखमी झाले. निर्धारित वेगापेक्षा जास्त वेगाने गाडी चालवणे, दारू पिऊन गाडी चालवणे, लाल दिव्याचे उल्लंघन करणे आणि ओव्हरटेक करणे ही चालकाच्या चुकीचे कारणे आहेत.
रस्ते अपघातात उत्तरप्रदेश सर्वाधिक आघाडीवर असून त्याखालोखाल तामिळनाडू आणि महाराष्ट्राचा क्रमांक आहे. रस्त्याचे सदोष बांधकाम, वाहनातील दोष आणि चालकांच्या चुका ही रस्ते अपघाताची प्रमुख कारणे आहेत.
रस्ते अपघातातील मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी आमच्या मंत्रालयाने अनेक उपाययोजना केल्या असून ज्या ठिकाणी जास्तीतजास्त अपघात होतात, अशी देशातील संभाव्य अपघातांची ७८९ ठिकाणे शोधून काढण्यात आली आहेत. या ठिकाणी होणार्‍या अपघाताची कारणे शोधून ती कारणे दूर केली जात आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या अखत्यारीत येणार्‍या अशा १४० ठिकाणांची दुरुस्ती करण्यात आली असून २८३ ठिकाणाच्या दुरुस्तीसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. २२८ ठिकाणांबाबत सर्वेक्षण सुरू आहे, असे गडकरी म्हणाले. पत्रपरिषदेला मंत्रालयाचे सचिव युद्धवीरसिंह मलिक उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार
सर्वाधिक अपघात होणार्‍या १३ राज्यांच्या मुख्यमंत्र्याकडे आपण आपल्या पत्रासह रस्ते अपघाताबाबतचा हा अहवाल पाठवणार आहे. तसेच रस्ते अपघात कमी करण्याबाबत उपाययोजना सुचवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्‌यात त्या जिल्ह्यातील सर्वात वरिष्ठ लोकसभा सदस्याच्या नेतृत्वात एका समितीची स्थापना करण्याची घोषणा गडकरी यांनी केली. या समितीत खासदार, आमदार आणि अन्य वरिष्ठ सरकारी अधिकार्‍याचा समावेश राहणार आहे. ही समिती जिल्ह्‌यातील रस्ते अपघातांचा आढावा घेत आपला अहवाल आमच्या मंत्रालयाकडे पाठवेल, असे गडकरी म्हणाले.
सात्त्विक खंत
रस्ते अपघातातील बळींची संख्या कमी करण्यासाठी नव्या मोटरवाहन कायद्यात अनेक तरतुदी असून हे विधेयक पारित करण्यासाठी मी जीव तोडून प्रयत्न केल्यानंतरही ते राज्यसभेत रखडले असल्याचे खंत गडकरी यांनी व्यक्त केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=34905

Posted by on Sep 8 2017. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (31 of 2477 articles)


►डोकलाम प्रकरणावर प्रतिक्रिया, अलाहाबाद, ५ सप्टेंबर - जागतिक पातळीवर भारताची बाजू भक्कम करण्याचे खरे श्रेय नरेंद्र मोदी सरकारलाच जाते, असे ...

×