Home » छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र » ६० वर्षांत गरिबी दूर का झाली नाही?

६० वर्षांत गरिबी दूर का झाली नाही?

=अमित शाह यांचा कॉंगे्रसला सवाल, भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला प्रारंभ=
BJP president Amit Shah with Maharastra Cheif Minister Devendra Fadanvis and State president Raosaheb Danveस्व. गोपीनाथ मुंडे नगरी, [२३ मे] – पं. नेहरू, इंदिरा गांधी यांच्या काळापासूनच कॉंगे्रस पक्ष गरिबी हटावचा नारा देत आहे. मग, गेल्या ६० वर्षांमध्ये देशातील गरिबी दूर का झाली नाही, गरीब आजही गरीब का आहे. या प्रश्‍नाचे उत्तर एकच आहे… ‘गरिबी हटाव’चा नारा देणार्‍यांनी गरिबांचा वापर केवळ मतांसाठी केला. त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आजवर काहीच केले नाही, अशी सणसणीत चपराक भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अमित शाह यांनी आज शनिवारी येथे हाणली.
कॉंगे्रसने स्वातंत्र्यानंतर ६० वर्षे देशावर राज्य केले. दरवेळी ‘गरिबी हटाव’चा नारा दिला. पण, आज ६० वर्षांनंतरही गरिबांची स्थिती पूर्वी होती तशीच आहे. निवडणुका आल्यानंतरच कॉंगे्रसला गरिबांची आठवण येते. कॉंगे्रसने गरिबांच्या मतांचा वापर केवळ सत्तेसाठीच केला. पण, गरिबांच्या स्थितीत सुधारणा आणण्याचे खरे कार्य भाजपाप्रणीत रालोआ सरकारनेच केले आहे, असे अमित शाह यांनी महाराष्ट्र भाजपाच्या दोन दिवसीय कार्यकारिणीचे उद्‌घाटन करताना सांगितले.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात गरिबी निर्मूलनासाठी अनेक योजना राबविण्यात आल्या होत्या. आता नरेंद्र मोदी यांच्या सरकारनेही या दिशेने ठोस पावले उचलली आहेत. मोदी सरकारला पुढील आठवड्यात एक वर्ष पूर्ण होत आहे. पण, या एक वर्षाच्या काळात सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. तिथेच, तब्बल ६० वर्षे भ्रष्टाचाराशिवाय दुसरे काहीच न करणारे आम्हाला एक वर्षाच्या कामाचा हिशेब मागत आहेत, असे सांगताना, कॉंगे्रसने आधी आपल्या ६० वर्षांच्या कामांचा हिशेब द्यावा, असा प्रहारही भाजपाध्यक्षांनी केला.
केंद्रात भाजपासोबत सत्तेत असलेल्या सर्वच मित्रपक्षांनी सरकारला चांगली साथ दिल्यामुळे सरकार अवघ्या एक वर्षात बरीच कामे करू शकले. केंद्राप्रमाणेच महाराष्ट्रातही भाजपाने भ्रष्टाचारमुक्त सरकार दिले आहे. संपुआ सरकारने आपल्या १० वर्षांच्या सत्ताकाळात १२ लाख कोटी रुपयांचे घोटाळे केले. भाजपाने मात्र सत्तेत आल्यानंतर पहिल्याच दिवशी विदेशातील काळा पैसा परत आणण्यासाठी विशेष तपास पथक गठित केले. अवघ्या दीन महिन्यातच संसदेत काळ्या पैशाचा मार्ग रोखणारे विधेयक पारित केले. आता काळा पैसा जमा करणार्‍याला आणि याबाबतची माहिती दडविणार्‍यालाही दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा होणार आहे, याकडे अमित शाह यांनी लक्ष वेधले.
भाजपासाठी सत्ता म्हणजे सुख उपभोगण्याचे साधन नाही, तर शेवटच्या रांगेतील माणसाला पुढे आणण्याचे माध्यम आहे, असे स्पष्ट करताना अमित शाह म्हणाले की, जनसंघाची स्थापना दहा तरुणांनी मिळून केली होती. त्यानंतर भाजपाचा जन्म झाला. सुरुवातीच्या काळात केवळ दोन खासदार असलेली भाजपा अल्पावधीतच स्पष्ट बहुमताने केंद्रात सत्तेत येईल, असा विचारही कुणी केला नव्हता. दहा कोटींपेक्षा जास्त सदस्यांसह भाजपा आज जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरला आहे. असंख्य कार्यकर्त्यांनी स्वार्थ बाजूला ठेवून आपले जीवन पक्षासाठी समर्पित केले, या शब्दात त्यांनी पक्षासाठी सर्वस्व अर्पण करणार्‍यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
…तर ताकद कळली नसती : फडणवीस
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी शिवसेनेसोबतची युती तुटली नसती, तर भाजपाला स्वत:ची ताकद कधीच कळली नसती, असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. कोल्हापुरातील भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला ते संबोधित करत होते.
शिवसेना-भाजपा युती तुटेल, असा विचार दोन्ही पक्षांनी कधीच केला नव्हता. युती तुटण्याचे दु:ख दोन्ही पक्षांना होते. स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय झाला आणि भाजपाने स्वबळावर १२० पेक्षा जास्त जागा जिंकल्या. ही युती जर तुटली नसती, तर भाजपाला राज्यातील स्वत:ची ताकद कधीच समजू शकली नसती. भाजपाला छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद मिळाला, असे फडणवीस यांनी राज्य कार्यकारिणीची बैठक सुरू होण्याआधी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22658

Posted by on May 24 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र (1671 of 2476 articles)


=५६ टक्के लोकांनी केली प्रशंसा= नवी दिल्ली, [२३ मे] - पुढील आठवड्यात एक वर्ष पूर्ण करीत असलेले केंद्रातील नरेंद्र मोदी ...

×