Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » अजित डोभाल यांच्या व्यूहरचनेचे फलित

अजित डोभाल यांच्या व्यूहरचनेचे फलित

  • म्यानमार मोहीम पाऊण तासात फत्ते
  • ठार झालेल्या अतिरेक्यांचा आकडा शंभरावर
  • ४ जून रोजीच झाला होता निर्णय
  • पंतप्रधानांच्या मंजुरीनंतर लगेच कारवाई

ajit-dobhalनवी दिल्ली, [१० जून] – गेल्या ४ जून रोजी अतिरेक्यांनी मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात केलेल्या भ्याड हल्ल्यात करून लष्कराचे २० जवान शहीद झाल्यानंतर हे बंडखोर म्यानमारच्या हद्दीत पळाल्याचे स्पष्ट झाले होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी त्याच दिवशी या अतिरेक्यांना धडा शिकविण्याची धाडसी योजना आखली होती. पण, लगेच कारवाईसाठी लष्कर तयार नसल्याने अखेर मंगळवारी ही योजना अमलात आणण्यात आली. विशेष म्हणजे, भारतीय लष्कराने अवघ्या ४५ मिनिटात ही मोहीम फत्ते करून शंभरावर अतिरेक्यांचा खात्मा केला.
अतिरेक्यांनी अतिशय भ्याड हल्ला करून लष्कराच्या २० जवानांना ठार मारण्याची घटना तमाम भारतीयांच्या हृदयावर आघात करून गेली होती. दहशतवादी हल्ले मुळीच खपवून घेतले जाणार नाही, हा नरेंद्र मोदी सरकारचा ठाम निर्धारच असल्याने ४ जून रोजीच गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, लष्करप्रमुख मेजर दलबीरसिंह सुहाग आणि गृह व संरक्षण मंत्रालयातील अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ५ जून रोजी पहाटेलाच म्यानमारमध्ये धडक द्यायची आणि अतिरेक्यांना यमसदनी पाठवायचे, असा निर्णय या बैठकीत झाला होता. पण, इतक्या कमी वेळेत कारवाई करण्यास लष्कर तयार नसल्याचे लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले. त्यामुळे लष्कराला कारवाईसाठी ७२ तासांचा अवधी देण्यात आला. ७ रोजी पंतप्रधान मोदी यांनी या मोहिमेला मंजुरी दिली आणि ९ तारखेला पहाटेच लष्करी जवानांनी म्यानमारच्या हद्दीत घुसून शंभरावर अतिरेक्यांचा खात्मा करतानाच त्यांचे अनेक गुप्त अड्डेही उद्‌ध्वस्त केले.
विदेशी हद्दीत घुसून भारतीय लष्कराने अशा प्रकारची कारवाई करण्याची ही मोहीम राबविण्यामागचे रणनीतीकार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हेच आहेत. या कारवाईसाठी त्यांनी पंतप्रधानांसोबतचा आपला नियोजित बांगलादेश दौराही रद्द केला. ही धाडसी योजना डोभाल यांनीच तयार केली. पंतप्रधान मोदीदेखील त्यांच्याकडून वेळोवेळी माहिती प्राप्त करीत होते. या तयारीसाठी डोभाल काही दिवस मणिपुरातच मुक्काम ठोकून होते आणि गुप्तचरांकडून अतिरेक्यांच्या हालचालींची बारिक-सारिक माहिती प्राप्त करीत होते.
परिपूर्ण योजना तयार झाल्यानंतर सोमवार, ८ जून रोजी रात्री लष्कराचे हेलिकॉप्टर्स विशेष कमांडो पथकासह म्यानमार सीमेत दाखल झाले. म्यानमारच्या परराष्ट्र मंत्रालयालाही याबाबतची माहिती तेथील भारतीय राजदूताने दिली. म्यानमारच्या सीमेत सात किलोमीटर आतपर्यंत भारतीय जवान पोहोचले होते. गुप्तचरांनी अतिरेक्यांच्या अड्ड्यांची माहिती आधीच दिली असल्याने जवान तिथपर्यंत दाखल झाले. या अड्ड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जवानांना शेकडो मीटर सरपटत जावे लागले. या काळात ड्रोन्सच्या माध्यमातून अतिरेक्यांच्या हालचालींवर जवानांची बारीक नजर होती. त्यानंतर अवघ्या ४५ मिनिटांत जवानांनी शंभरावर अतिरेक्यांना ठार केले. या कारवाईत म्यानमारच्या लष्करानेही भारतीय जवानांना मोठी मदत केली. महत्त्वाचे म्हणजे, मुंबईवरील २६/११ रोजीच्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानात घुसून अशाच प्रकारची धाडसी कारवाई करण्याची लष्कराची योजना होती. पण, तत्कालीन कॉंगे्रसप्रणीत संपुआ सरकारने त्यास नकार दिला होता.
डोभाल यांचा अनुभव कामी आला
अजित डोभाल १९८६ मध्ये आयबीचे प्रमुख असताना त्यांनी ईशान्येतील बंडखोरांविरोधात गोपनीय मोहीम उघडली होती. त्यांनी त्या काळात लालडेंगा बंडखोरांच्या सातपैकी सहा गटांना भारताच्या बाजूने आणले होते. वाढत्या दबावामुळे अन्य बंडखोर गटांनाही भारतासोबत शांतता करार करणे भाग पडले होते. १९६८ च्या केरळ तुकडीचे अधिकारी असलेले डोभाल यांनी तब्बल सहा वर्षे पाकिस्तानात ‘अंडरकव्हर एजंट’ म्हणूनही काम केले आहे. पाकमध्ये बोलल्या जाणार्‍या उर्दूसह अनेक देशांच्या भाषांचे त्यांना ज्ञान आहे. एवढेच नव्हे, तर ऑपरेशन ब्लू स्टारच्या चार वर्षांनंतर म्हणजे १९८८ मध्ये सुवर्णमंदिरात ‘ऑपरेशन ब्लॅक थंडर’ असे नाव असलेले अभियान राबविण्यात आले होते. सुवर्णमंदिराच्या आत काही दहशतवादी लपले होते. त्यांची माहिती प्राप्त करण्यासाठी डोभाल रिक्षा चालकाच्या वेशात गेले होते. दहशतवाद्यांचीही त्यांच्यावर नजर होती. एक दिवस दहशतवाद्यांनी त्यांना बोलावले, तेव्हा आपण आयएसआयचे एजंट असल्याचे आणि तुमच्या मदतीसाठीच येथे आलो असल्याचे डोभाल यांनी त्यांना सांगितले होते. याच काळात डोभाल यांनी लपलेल्या अतिरेक्यांची संख्या, त्यांच्याजवळ असलेली शस्त्रे आणि अन्य वस्तूंची माहिती मिळविली. यानंतर त्यांनी पंजाब पोलिसांना अतिरेकी नेमके कुठे आहेत, याचा नकाशाच काढून दिला. दोन दिवसानंतर मोहीम हाती घेण्यात आली आणि सर्व अतिरेक्यांना अटक करण्यात आली. या मोहिमेसाठी डोबाल यांना कीर्तीचक्र या शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय, १९९९ मध्ये इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचे अपहरण करून कंधहार येथे नेण्यात आले, तेव्हाही त्या संपूर्ण प्रकरणात डोभाल यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.
म्यानमारला विश्‍वासात घेतले
भारतीय लष्कराने म्यानमारच्या हद्दीत घुसून कारवाई केल्यानंतरही या देशाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. उलट म्यानमारकडून भारतीय लष्कराला सहकार्य करण्यात आले. तशी व्यवस्था भारताने आधीच करून ठेवली होती. आठवडाभरापूर्वी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी म्यानमारचा दौरा केला होता. या दौर्‍याचा गाजावाजा कुठेही करण्यात आला नव्हता. या दौर्‍यात म्यानमार सरकारसोबत लष्कराच्या मोहिमेविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. म्यानमारने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22816

Posted by on Jun 11 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1635 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१० जून] - निगोशिएबल इन्स्ट्रूमेन्टस् कायद्यातही दुरुस्ती करण्यासाठी अध्यादेश जारी करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज बुधवारी घेतला. यामुळे ...

×