Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » अण्णा, सोनियांना गडकरींचे आव्हान

अण्णा, सोनियांना गडकरींचे आव्हान

gadkari-nitinनवी दिल्ली, [१९ मार्च] – भाजपाप्रणीत रालोआ सरकारने लोकसभेत पारित केलेल्या शेतकरी हिताच्या भूमी संपादन विधेयकाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नका, असा आग्रह केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केला असून, राष्ट्रहितासाठी विरोधकांनी हे विधेयक पारित करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
रालोआ सरकारच्या भूमी संपादन विधेयकाबाबत कोणत्याही व्यासपीठावर खुली चर्चा करण्याची आपली तयारी असल्याचे आपण कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांना पत्र लिहून कळविले आहे, असे गडकरी यांनी गुरुवारी संसदभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. भू-संपादन विधेयकाबाबत जो काही प्रचार केला जात आहे प्रत्यक्षात तसे काहीही नसून, याला विनाकारण राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही गडकरी पुढे म्हणाले. हे भू-संपादन विधेयक पारित झाल्यानंतर अधिकाधिक रोजगार निर्मिती होणार आहे, सिंचनाच्या सोयी उपलब्ध होतील, रस्ते मागार्र्ने संपर्क वाढेल, शाळा, रुग्णालये सुरू होतील आणि खाद्यान्नांचे उत्पादनही वाढणार आहे. या विधेयकातील तरतुदीनुसार जवळपास ८० टक्के जमीन सिंचनासाठीच अधिग्रहित केली जाणार आहे, असा दावाही गडकरी यांनी केला.
यापूर्वीच्या कॉंग्रेसप्रणीत संपुआ सरकारने जो कायदा तयार केला त्यामध्ये कोळसा, रेल्वेशी संबंधित मुद्दे आणि इतर आवश्यक गोष्टींसंबंधीचे १३ कायदे या कायद्याच्या कक्षेत नव्हते. आम्ही यामध्ये ग्रामीण भागाला आधार मानून विकासाचा दृष्टिकोन ठेवला आणि संरक्षणासोबतच औद्योगिक कॉरिडोरलाही यामध्ये जोडले, असे सांगतानाच हे विधेयक शेतकरीविरोधी असल्याचे म्हणणे पूर्णपणे चूक आहे. याउलट शेतकर्‍यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी यामध्ये विशेष लक्ष देण्यात आले आहे आणि संपादन केल्यानंतर मिळणारा मोबदला चारपट करण्यात आला आहे, असेही गडकरी म्हणाले.
या भू-संपादन विधेयकाला विरोध करणारे विरोधी पक्ष आणि अण्णा हजारे यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी इलेक्ट्रॉनिक, प्रिंट मीडिया किंवा इतर कोणत्याही व्यासपीठावर येऊन आमच्याशी खुली चर्चा करावी. त्यासाठी आमची तयारी आहे, असे आव्हानही गडकरी यांनी दिले. भू-संपादन विधेयकाला विरोध म्हणून सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात १४ राजकीय पक्षांच्या नेत्यांनी नुकताच राष्ट्रपतिभवनापर्यंत मार्च काढून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निवेदन सादर केले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21614

Posted by on Mar 20 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1869 of 2453 articles)


=किसान मोर्चाचे यश= मुंबई, [१९ मार्च] - भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश किसान मोर्चातर्फे राज्यभर भाजपाचे सदस्य नोंदणी अभियान चालू असून, ...

×