अर्थमंत्री जेटली यांना सभागृहात बोलवा
Saturday, March 14th, 2015=विरोधकांचा लोकसभेत गदारोळ, कामकाज स्थगित=
नवी दिल्ली, [१३ मार्च] – अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीतच अर्थसंकल्पावरील चर्चा सुरू झाली पाहिजे, अशी मागणी करून आज कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी लोकसभेत गदारोळ केला. यामुळे सभागृहाचे कामकाज एकदा स्थगित करावे लागले. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे ही चर्चा आज शुक्रवारी सुरू होऊ शकली नाही. आता सोमवारी अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात होईल.
सभागृहाच्या कामकाज पत्रिकेत अर्थसंकल्पावरील चर्चा सुरू करण्याचे दर्शविण्यात आले होते. सभापती सुमित्रा महाजन यांनी हा विषय पुकारताच अर्थमंत्री कुठे आहेत, अर्थसंकल्पावरील चर्चा सुरू करण्यासाठी अर्थमंत्र्यांची सभागृहात उपस्थिती आवश्यक आहे, असे के. सी. वेणूगोपाल म्हणाले. त्यावर अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा सभागृहात उपस्थित आहेत, याकडे महाजन यांनी लक्ष वेधले. मात्र, अर्थसंकल्पावरील चर्चा सुरू करताना अर्थमंत्री सभागृहात असलेच पाहिजे, त्यांच्याशिवाय चर्चा सुरू करता येणार नाही, असा विरोधी सदस्यांचा आग्रह होता. सर्व विरोधी सदस्य या मुद्यावर आक्रमक झाले होते, उभे राहून बोलत होते. त्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
सदस्यांना शांत राहाण्याचे, आपल्या जागेवर बसण्याचे आवाहन सभापती सुमित्रा महाजन वारंवार करत होत्या. पण, त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी ब्रिटिश सरकारच्या निमंत्रणावरून अर्थमंत्री जेटली इंग्लंडला गेल्याचे संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. पण, यामुळे विरोधकांचे समाधान झाले नाही. जेटली यांच्याऐवजी दुसरा मंत्री या कार्यक्रमासाठी का पाठवला नाही, अशी विचारणा वेणूगोपाल यांनी केली. यावर तुम्ही आम्हाला शिकवू शकत नाही, असे नायडू म्हणाले. सभागृहातील गोंधळ वाढत होता. सभापती महाजन यांनाही सदस्य जुमानत नव्हते. त्यामुळे तुमच्या सदस्यांना आवरा, असे म्हणण्याची वेळ महाजन यांच्यावर आली.
सभागृहात आरडाओरडा करणे ठिक नाही, असे महाजन म्हणाल्या. अध्यक्षांची परवानगी घेऊन जेटली परदेशात गेले आहेत, याकडे नायडू यांनी लक्ष वेधले. त्यावर जेटली यांनी परदेशात जात असल्याची सूचना आपल्याला दिली होती, अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा अर्थसंकल्पावरील चर्चेच्या वेळी सभागृहात उपस्थित राहतील, चर्चेला उत्तर मात्र जेटलीच देतील, असे महाजन म्हणाल्या. मात्र, विरोधक आपल्या भूमिकेवर ठाम होते. सभागृहातील गोंधळ थांबता थांबत नव्हता. या गोंधळातच जयंत सिन्हा यांनी चर्चा सुरू करण्यासाठी अर्थसंकल्पावरील आपले भाषण सुरू केले. त्यामुळे विरोधक आणखी संतप्त झाले आणि वेलमध्ये आले. सदस्यांना आपल्या जागेवर जाण्याचे आवाहन सभापती महाजन करत होत्या. कॉंग्रेस पक्षाचे गटनेते मल्लिकार्जुन खडगे यांनी अर्थमंत्र्यांना सभागृहात बोलवा अशी मागणी केली. या गोंधळात सिन्हा यांचे भाषण सुरूच होते. सभागृहातील गोंधळ वाढत असल्यामुळे तसेच विरोधक ऐकत नसल्यामुळे सभापती महाजन यांनी सभागृहाचे कामकाज स्थगित केले.
Short URL: https://vrittabharati.in/?p=21416

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!