Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » अर्थसंकल्प शेतकरी राजाला समर्पित : मुनगंटीवार

अर्थसंकल्प शेतकरी राजाला समर्पित : मुनगंटीवार

=एकच आशा उरात माझ्या, एकच आहे ध्यास=
sudhir-mungantiwar1मुंबई, [१८ मार्च] –
एकच आशा उरात माझ्या, एकच आहे ध्यास
लाखांचा पोशिंदा त्याला, घडू नये उपवास
शर्थ करेन मी, जिवास माझ्या पडो कितीही त्रास
देईल माझ्या बळीराजाला, स्वाभिमानाचा घास…
वरील शब्दात आपल्या भावना व्यक्त करून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरी बांधवांना आजचा अर्थसंकल्प समर्पित केला.
ते पुढे म्हणाले, सक्षम शेतकरी व समृद्ध ग्रामीण क्षेत्र हाच ‘मेक इन इंडिया’चा पाया आहे. शेतकरी जगला तरच राज्याची अर्थव्यवस्था सक्षम होऊ शकेल. या सर्व बाबी विचारात घेऊन, कृषी क्षेत्राला भरपूर तरतूद उपलब्ध करून, विशेष चालना देण्याच्या दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प मांडण्याचा आपला प्रयत्न आहे. २०१६ हे वर्ष ‘शेतकरी स्वाभिमान वर्ष’ म्हणून साजरे करण्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी यावेळी केली.
ऐका माझ्या भगिनींनो
नाही तुम्ही निराधार
तुमच्या पाठीशी खंबीर
आहे आमचे सरकार…
निराधार भगिनींना आधार देणे ही सरकारची प्राथमिकता आहे. स्त्री हा आमच्या समाजाचा मानबिंदू आहे. तीच जर परिस्थितीच्या रेट्यात होरपळत असेल तर, आमच्या प्रगतीला कोणताही नैतिक आधार उरणार नाही. स्त्रीच्या जीवनमानावर समाजाचा दर्जा ठरत असतो. म्हणून शेतकरी, ग्रामविकास या सोबतच निराधार, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीता यांचे जीवनमान उंचावणे हा देखील या अर्थसंकल्पातून साधावयाच्या सर्वांगीण विकासाच्या प्रयत्नातील मुख्य मूलाधार असल्याचे मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
तुम्ही खचून जाऊ नका अशी साद घालत, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा विश्‍वास मुनगंटीवारांनी या ओळींच्या माध्यमातून दिला.
या अर्थसंकल्पात समाजातल्या शेवटच्या माणसाच्या विकासाचे उद्दिष्ट निश्‍चित केले गेले असून, त्याच्या घामाच्या सुगंधाने भूमाता प्रसन्न होते आणि हिरवाईचे ताटवे फुलून येतात, तो शेतकरी हा या अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू आहे. शेतकर्‍यांच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार आणि त्याला पूरक असा ग्रामविकास हा देखील या अर्थसंकल्पाचा मुख्य आधार आहे. स्वातंत्र्याच्या सात दशकात विकासाची सोनेरी किरणे ज्यांच्या दारात पोहोचलेली नाहीत, त्या सर्व दीन, दुर्बल, शोषित, पीडित, अंध, अपंग, निराधार, विधवा, परित्यक्ता, दलित, आदिवासी, असहाय्य बांधवांच्या विकासाचा निर्धार आज मी या अर्थसंकलपातून व्यक्त करतो, असे मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
वर्षानुवर्षे या राज्यात अर्थसंकल्प मांडले गेले. राजकारणात आणि समाजकारणात वावरताना येथील सामान्य माणसाशी माझे जे नाते जोडले गेले आहे, त्या आधारे मी हे विश्‍वासाने सांगू शकतो की, सामान्य माणूस अर्थसंकल्प कदाचित वाचत नसला तरी तो या अर्थसंकल्पात स्वत:ला शोधत असतो. हा अर्थसंकल्प मी मांडत असलो तरी, त्यातील भावना, अपेक्षा या राज्यातील कानाकोपर्‍यात वसलेल्या सामान्य माणसाचे प्रतिनिधित्व करणार्‍या आहेत, असेही अर्थमंत्र्यांनी नमूद केले.
आम्हाला रस्ते, वीज, पाणी, सिंचनव्यवस्था व अन्य पायाभूत सुविधांचा विकास तर करायचाच आहे. त्यासोबच आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला पराक्रमी, सुजलाम्, सुफलाम् महाराष्ट्रही घडवायचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलेले सामाजिक न्यायाचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. आम्हाला पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या स्वप्नांची पूर्ती करताना शेवटच्या माणसाच्या वेदनेची जाणीव मनात जपायची आहे, सावित्रीच्या मुलींचा सत्त्व आणि स्वाभिमान जागृत करायचा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज यांच्या कल्पनेतील बंधुभावाशी समर्पित असा समाजही निर्माण करायचा आहे, असे म्हणून मुनगंटीवार यांनी हे बजेट माझे नाही, केवळ वर्षीचा उपचार
त्यास लाभला सामान्यांच्या, स्वप्नांचा आधार
अन्य नको मज दुसरे काही, आशीष तुमचे हवे
सुखदु:खाच्या सोबत तुमच्या, राहील हे सरकार… या ओळी म्हणून आपला निर्धार व्यक्त केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27448

Posted by on Mar 19 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (615 of 2451 articles)


=उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक= नवी दिल्ली, [१८ मार्च] - उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीला एक वर्ष असले, तरी राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला ...

×