Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » आक्षेपानंतरही प्रसारित केला लघुपट

आक्षेपानंतरही प्रसारित केला लघुपट

  • बीबीसीचा उद्दामपणा
  • कारवाई करण्याचा सरकारचा विचार

rape_victim_braveryनवी दिल्ली, [५ मार्च] – भारत सरकार, देशाची संसद, न्यायालय आणि देशभरातील जनतेच्या भावनांकडे दुर्लक्ष करून बीबीसी या आंतरराष्ट्रीय वाहिनीने निर्भया सामूहिक बलात्कार व हत्याकांड प्रकरणातील दोषीची मुलाखत असलेला लघुपट निर्धारित वेळेच्या आधीच प्रसारित केली असून, यामुळे भारत सरकार वाहिनीवर कारवाई करण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे.
‘इंडियाज डॉटर’ या शिर्षकाखाली तयार करण्यात आलेला हा लघुपट बीबीसीने स्थानिक वेळेनुसार रात्री १० वाजता आणि भारतीय वेळेनुसार बुधवारी मध्यरात्रीनंतर तीन वाजता प्रसारित केला. ब्रिटन आणि युरोपातील इतर देशांमध्ये हा लघुपट प्रसारित करण्यात आला. या लघुपटामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर होत असलेल्या चर्चेचा फायदा घेण्यासाठी बीबीसीने निर्धारित वेळेच्या आधीच हा लघुपट प्रसारित केला, हे विशेष. आधी हा लघुपट येत्या रविवारी ८ मार्च रोजी साजर्‍या होणार्‍या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रसारित करण्यात येणार होता. बीबीसीने हा लघुपट प्रसारित केल्यानंतर सोशल मीडियावरून बीबीसीवर जबरदस्त टीका होत आहे.
निर्भयाने जर बलात्काराला विरोध केला नसता तर तिला आम्ही मारले नसते, असे अकलेचे तारे याप्रकरणी मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या मुकेश सिंग नावाच्या आरोपीने या लघुपटासाठी घेण्यात आलेल्या मुलाखतीत तोडले आहेत. बलात्काराच्या घटनांसाठी मुलांपेक्षा मुलीच जास्त जबाबदार आहेत, असेही त्याने म्हटले आहे.
आवश्यक ती परवानगी घेऊन तिहार कारागृहात ही मुलाखत घेण्यात आल्यामुळेही मोठा वाद निर्माण झाला आहे. मुलाखतीला परवानगी कुणी आणि कशी दिली याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी बुधवारी संसदेत सांगितले होते.
सरकार कारवाई करणार
सरकार आणि न्यायालयाने बंदी घालण्याचे निर्देश दिल्यानंतरही बीबीसी या आंतरराष्ट्रीय वाहिनीने हा लघुपट प्रसारित करण्याच्या घटनेची भारत सरकारने गंभीर दखल घेतली असून, आक्षेप नोंदविल्यानंतरही लघुपट प्रसारित केल्याबद्दल बीबीसीवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते. बीबीसीवर नेमकी काय कारवाई करता येऊ शकते याबाबत सरकार आणि गृह मंत्रालयामध्ये सल्लामसलत सुरू असून, याबाबत विधी आणि न्याय मंत्रालयाचेही मत मागितले आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व पैलूंवर वेगाने कार्यवाही करण्यात यावी, असे गृह मंत्रालयाने परराष्ट्र मंत्रालयाला सांगितले आहे. ही मुलाखत चित्रीत केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी भादंविच्या कलम ५०९ आणि ५०४ नुसार आधीच एफआयआर दाखल केला आहे.
भारतात प्रसारण नाही
१६ डिसेबर २०१२ च्या निर्भया बलात्कार व हत्याकांड घटनेवर आधारित लघुपट भारतात प्रसारित करण्याची आपली कोणतीही योजना नसल्याचे बीबीसीने स्पष्ट केले आहे. भारत सरकारने गंभीर आक्षेप नोंदविल्यानंतरही बीबीसीने बुधवारी रात्री ब्रिटन आणि युरोपमध्ये हा लघुपट प्रसारित केला होता. भारत सरकारच्या निर्देशही आपण बांधिल आहोत आणि त्यामुळेच हा लघुपट भारतात प्रसारित करणार नाही, असे बीबीसीने गृह मंत्रालयाला पाठविलेल्या निवेदनात म्हटले असल्याचे अधिकृत सूत्राने सांगितले.
सोशल मीडियावर व्हायरल
भारत सरकारने बंदी घातल्यानंतरही बीबीसीने प्रसारित केलेला लघुपट फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ब्रिटिश चित्रपट निर्मात्या लेस्ली उडविन यांनी हा लघुपट तयार केला असून, यामध्ये भारताचे जे चित्र उभे करण्यात आले आहे त्यामुळे देशात संतापाची लाट उसळली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21146

Posted by on Mar 6 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1964 of 2453 articles)


=पंतप्रधानांची विरोधकांवर टीका= खंडवा, [५ मार्च] - भाजपाप्रणीत रालोआ सरकारच्या भूसंपादन विधेयकाच्या मुद्यावरून विरोधक शेतकर्‍यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, ...

×