Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

=भूमी अधिग्रहण अध्यादेशावर विरोधक सरकारला घेरणार=
parliament-mainनवी दिल्ली, [२२ फेब्रुवारी] – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवार, २३ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत असून, गेल्या काही दिवसांमधील घडामोडी लक्षात घेता हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात होईल.
हिवाळी अधिवेशनानंतर काढण्यात आलेल्या भूमी अधिग्रहण अध्यादेशासह सहा अध्यादेशांचे कायद्यात रूपांतर करण्याचे मोठे आव्हान या अधिवेशनात सरकारसमोर आहे. त्याचप्रमाणे भूमी अधिग्रहण अध्यादेशाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी धरणे आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे तसेच कॉंग्रेस पक्षानेही या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतल्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.
संसदेच्या संयुक्त अधिवेशनात उद्या २३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे अभिभाषण होईल. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू रेल्वे अर्थसंकल्प सादर करतील. २७ फेब्रुवारीला आर्थिक सर्वेक्षण संसदेत सादर केले जाईल. २८ फेब्रुवारीला अर्थमंत्री अरुण जेटली अर्थसंकल्प सादर करतील.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी सकाळी संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह सर्व पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत चालण्याच्या दृष्टीने तसेच अनेक महत्त्वपूर्ण अध्यादेशांचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी विरोधी पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन या बैठकीत संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केले.
सत्ताधारी पक्ष तसेच विरोधक यांच्यात अनेक मुद्यांवर मतभेद असले तरी ही बैठक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झाली. जम्मू-काश्मिरातून राज्यसभेवर निवडून आलेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचे व्यंकय्या नायडू यांनी अभिनंदन केले. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट सामन्याचे सावट आजच्या बैठकीवर दिसून आले.
जनता दल युनायटेडचे अध्यक्ष शरद यादव आणि भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे दुष्यंत चौटाला यांना नितीशकुमार यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहायचे असल्यामुळे ते बैठकीतून लवकर निघून गेले. लोकसभेत भाजपाचे बहुमत असल्यामुळे तेथे विधेयक पारित करण्यात सरकारला कोणतीच अडचण नाही. सरकारची खरी अडचण राज्यसभेत आहे. कारण राज्यसभेत भाजपा अल्पमतात आहे, तर विरोधी पक्षांचे बहुमत आहे.
अर्थसंकल्पी अधिवेशन दोन टप्प्यात चालणार आहे. २३ फेब्रुवारीला सुरू होणार्‍या अधिवेशनाचा पहिला टप्पा २० मार्चला संपणार आहे. त्यानंतर एक महिना अधिवेशनाला सुटी आहे. २० एप्रिलपासून दुसर्‍या टप्प्यातील अधिवेशनाला प्रारंभ होईल आणि ८ मे रोजी अधिवेशनाचे सूप वाजणार आहे.
विशेष म्हणजे नेहमीची परंपरा तोडून संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी रविवारी सकाळी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन अर्थसंकल्पी अधिवेशनात सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन केले. सोनिया गांधी यांची भूमिका सकारात्मक होती, त्यांनी सहकार्याचे आश्‍वासन दिले, असे नायडू यांनी नंतर सांगितले. लोकसभेतील कॉंग्रेस पक्षाचे गटनेते मल्लिकार्जुन खडगे यांच्यासह सर्व प्रमुख पक्षाचे नेते बैठकीला उपस्थित होते.
सभागृह चालविणे सामूहिक जबाबदारी : मोदी
संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. अर्थसंकल्पातून सामान्य लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे अर्थसंकल्प तसेच देशाच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेली विधेयके पारित करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी बैठकीत म्हटले. विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्यांवर चर्चेला सरकार तयार आहे, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20844

Posted by on Feb 23 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (2018 of 2453 articles)


=भूमी अधिग्रहण अध्यादेशावर विरोधक सरकारला घेरणार= नवी दिल्ली, [२२ फेब्रुवारी] - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवार, २३ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत असून, ...

×