Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » आज भारतात अफाट संधी : पंतप्रधान

आज भारतात अफाट संधी : पंतप्रधान

=प्रवासींमुळे देशाला नवी ओळख मिळाली=
PM Modi at the Inauguration of Pravasi Bharatiya Divasगांधीनगर, [८ जानेवारी] – व्यवसाय किंवा इतर कारणांमुळे परदेशात वास्तव्य असलेल्या अप्रवासी भारतीयांसाठी आजच्या भारतात अफाट संधी आहेत आणि त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे केले.
ज्यांचे पूर्वज संधी शोधण्यासाठी परदेशांमध्ये गेले त्यांच्यासाठी आजच्या भारतात अफाट संधी आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी १३ व्या प्रवासी भारतीय दिवस कार्यक्रमात बोलताना सांगितले. प्रवासी भारतीय दिवस हा भारतीय वंशाच्या लोकांचा दरवर्षी होणारा सर्वात मोठा कार्यक्रम आहे. पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मी जगभरातील सुमारे ५० नेत्यांची भेट घेतली आहे आणि हे सर्वजण भारतासोबत सहकार्य करण्यास तयार आहेत. आज येथे जमलेले सर्वजण जग हेच भारताचे भांडवल आहे आणि भारताच्या त्यांच्याशी असलेल्या संबंधांचे डॉलर्स किंवा पौंड्‌समध्ये मूल्यमापन करता येणार नाही, असेही मोदी म्हणाले.
जगभरातील कोट्यवधी हिंदूंची श्रद्धा असलेल्या गंगा नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले. तुम्हाला आणखी एका गोष्टीची निश्‍चितपणे चिंता असेल आणि ती म्हणजे मॉं गंगेचे पुनरुज्जीवन, याची मला कल्पना आहे, असेही ते म्हणाले. भारतीय मूल्ये जिवंत ठेवल्याबद्दल पंतप्रधानांनी अप्रवासी भारतीयांचे मनापासून कौतुक केले आणि त्यांच्यामुळे भारताला एक नवी ओळख मिळाल्याचे सांगितले. परदेशात राहाणार्‍या कोणत्याही भारतीयाला शेजारी भारतीय दिसला की त्याला आनंद होतो. यामुळे आपल्या मुलांनाही कौटुंबिक मूल्यांची शिकवण मिळेल, अशी त्यांना खात्री असते, असेही पंतप्रधान म्हणाले.
संयुक्त राष्ट्र संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना भारतीय प्राचीन विद्या असलेल्या योगाची दखल घेत आंतरराष्ट्रीय योगदिन घोषित करण्याची मागणी केली असता ४० मुस्लिम देशांसह जगभरातील १७३ देशांनी त्याला पाठिंबा दिला, याची आठवण पंतप्रधानांनी आपल्या भाषणात करून दिली.
तत्पूर्वी, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात जगभरातून आलेल्या अप्रवासी भारतीयांचे स्वागत केले. शिस्त, कामाची संस्कृती आणि संबंधित देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान केल्यामुळे अनिवासी भारतीयांचा त्यांचे वास्तव्य असलेल्या देशात नेहमीच आदर केला जातो. अप्रवासी भारतीयांसोबत काम करण्यास मोदी सरकार कटिबद्ध असून, ही भागीदारी फलदायीच असेल, अशी ग्वाही स्वराज यांनी उपस्थितांना दिली. जगातील विकसनशील देशांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी भारत त्यांचे नेतृत्व करू शकतो, असेही स्वराज यावेळी म्हणाल्या.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी व गयानाचे अध्यक्ष डोनाल्ड रामोतार व दक्षिण आफ्रिकेच्या परराष्ट्र मंत्री मैती कोआना मशाबाने या मोदी व स्वराज यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित होत्या. सुमारे चार हजार अप्रवासी भारतीयांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. भारतीय वंशाचे सुमारे अडीच कोटी लोक परदेशांमध्ये वास्तव्यास आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19524

Posted by on Jan 9 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2268 of 2453 articles)


=सर्व जागा महायुतीलाच मिळणार= मुंबई, [८ जानेवारी] - पृथ्वीराज चव्हाण, विनोद तावडे आणि आशीष शेलार हे विधानसभेवर निवडून गेल्याने आणि ...

×