Home » ठळक बातम्या, विदर्भ » आणि गोपीनाथ मुंडेंच्या दणक्याने रेल्वे रवाना

आणि गोपीनाथ मुंडेंच्या दणक्याने रेल्वे रवाना

नागपूर, [३ जून] – साल ३० ऑक्टोबर १९९०. सार्‍या जगाचे लक्ष केवळ एकाच शहराभोवती केंद्रित झाले होते आणि ते म्हणजे अयोध्या. ३० ऑक्टोबर रोजी देवोत्थान एकादशीच्या मुहूर्तावर कुठल्याही परिस्थितीत कारसेवा करणारच अशी गर्जना विश्‍व हिंदू परिषदेचे तत्कालीन सरचिटणीस अशोक सिंघल यांनी केली होती. तर कुठल्याही परिस्थितीत कारसेवा होऊ देणार नाही, अशी दर्पोक्ती उत्तरप्रदेशाचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव करीत होते. ‘परिंदा भी पैर नही मार सकता’ अशी चिथावणीची भाषा करीत त्यांनी आंदोलनकर्त्या कारसेवकांना आव्हान दिले होते. रामजन्मभूमी मुक्तीच्या आंदोलनात राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीही संपूर्ण शक्तिनिशी उतरली होती आणि त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरली होती. कारण मुंडे राजकारणात असले, तरीही एक स्वयंसेवक म्हणून त्यांचा अखिल महाराष्ट्रात, घराघरात जनसंपर्क होता. त्यावेळी संपूर्ण भारतातून सर्वाधिक संख्येत महाराष्ट्रातील कारसेवक अयोध्येला गेले होते. २७ ऑक्टोबर रोजी मुंबई-फैजाबाद गाडीतून अयोध्येला जाण्यासाठी हजारो कारसेवक बसले. गाडीत पाय ठेवायलाही जागा नव्हती. याच गाडीतून तत्कालीन भाजपा विधिमंडळ गटनेते गोपीनाथ मुंडेही आपल्या कार्यकर्त्यांसमवेत प्रवास करीत होते. एक संघर्षशील व आक्रमक नेता म्हणून त्यांची प्रतिमा त्याचवेळी तयार होत होती.
केंद्रातील तत्कालीन विश्‍वनाथप्रताप सिंग सरकारने मुलायमसिंगांना ‘मदतीचा हात’ देत रेल्वेगाड्या अयोध्येपर्यंत पोहोचणारच नाहीत यासाठी पुरेपूर प्रयत्न केला होता. त्यामुळे गोपीनाथ मुंडे ज्या गाडीतून प्रवास करीत होते, ती गाडीही मध्यप्रदेश-उत्तरप्रदेश सीमेवरील मारकुंडी रेल्वे स्थानकावर मध्यरात्री थांबविण्यात आली. गाडी सहज थांबली असेल असे कारसेवकांना वाटले. या गाडीत महाराष्ट्राव्यतिरिक्त अन्य राज्यातील कारसेवकही होते. मात्र, तास दोन तास होऊनही गाडी पुढे न सरकल्याने कारसेवकांमध्ये अस्वस्थता पसरली. अयोध्येत जायचे कसे, हा प्रश्‍न होताच. आणि नंतर खुलासा झाला की दिल्लीहून आदेश असल्याने गाडी पुढे जाणार नाही. येथूनच तुम्हाला परतावे लागेल. झाले, सर्व कारसेवक खवळले आणि मारकुंडी रेल्वेस्थानकावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. एक जननेता म्हणून गोपीनाथजींनी आपली जबाबदारी ओळखली आणि तत्काळ त्यांनी स्टेशनमास्तरशी संवाद सुरू केला. मात्र, दिल्लीच्या आदेशामुळे तो अधिकारी काही ऐकून घ्यायला तयार नव्हता. निदान गाडी अलाहाबादपर्यंत तरी जाऊ द्या अशी विनंती मुंडेंनी वरिष्ठ रेल्वे अधिकार्‍यांना केली. मात्र, ते बधले नाहीत. अखेर मुंडेंमधील आक्रमक कार्यकर्ता जागा झाला. त्यांनी हजारो कार्यकर्त्यांसह स्टेशनवरच ठाण मांडून जोरदार आंदोलन सुरू केले. काही हिंसक प्रसंग घडल्यास तुम्हीच जबाबदार राहाल, असे त्यांनी पोलिसांना बजावले. मुंडेंच्या या आक्रमक पवित्र्याने पोलिस व प्रशासकीय अधिकारी पार गोंधळून गेले. ‘मंदिर वही बनायेंगे’ व ‘बच्चा-बच्चा रामका’ अशा घोषणा सुरूच होत्या. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून स्टेशनमास्तरने वरिष्ठांना कल्पना दिली. अखेर ‘गाडी पुढे रवाना करा’ असा आदेश रेल्वे मंत्रालयातून देण्यात आला. मुंडेंनी याची माहिती कारसेवकांना देताच सर्वत्र एकच जल्लोष झाला. अयोध्येत कारसेवा झाली ती वेगळीच आणि इकडे गोपीनाथ मुंडेंनी स्टेशनवर आधीच ‘कारसेवा’ करून सरकारच्या तोंडाला फेस आणला होता.

 

Short URL: https://vrittabharati.in/?p=13419

Posted by on Jun 3 2014. Filed under ठळक बातम्या, विदर्भ. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, विदर्भ (2420 of 2455 articles)


परळी वैजनाथ, [३ जून] - गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त कळताच, मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथजवळ असलेले नाथ्रा हे ...

×