Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » आता दाऊदच्याही मुसक्या बांधणार

आता दाऊदच्याही मुसक्या बांधणार

=डोबाल यांचा ‘मास्टर प्लान’=
AJIT DOBHALनवी दिल्ली, [२७ ऑक्टोबर] – अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन छोटा राजनला इंडोनेशियात अटक करण्यामागे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबाल यांचा ‘मास्टर प्लान’ प्रामुख्याने कारणीभूत होता. राजनच्या प्रत्येक हालचालींवर डोबाल गेल्या काही महिन्यांपासून लक्ष ठेवून होते. विशेष म्हणजे, आता राजनच्या माध्यमातून अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन आणि मार्च १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिमपर्यंत पोहोचण्याची धाडसी योजनाही डोबाल यांनी तयार केली आहे.
पुढील आठवड्यात छोटा राजनला भारतात आणण्यात येण्याची शक्यता आहे. सीबीआयचे एक उच्चस्तरीय पथक त्यासाठी लवकरच इंडोनेशियाला रवाना होणार आहे. त्याला भारतात आणल्यानंतर दाऊदविषयीची सविस्तर माहिती प्राप्त करण्यावर भारतीय तपास संस्थांचा भर असेल, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्राने दिली.
दरम्यान, राजनला अटक झाल्याची माहिती वार्‍यासारखी जगाच्या कानाकोपर्‍यात पसरली आणि मुंबई पोलिसांनी त्याच्या मालमत्तांवर धाडी टाकण्यास सुरुवात केली. गुन्हे अण्वेषण विभागाने राजनची बांधकाम कंपनी खुशी डेव्हलपर्सच्या मुंबईतील सर्व रहिवासी आणि व्यावसायिक मालमत्तांवर धाडी घातल्या. इतकेच नव्हे, तर राजनचा भाऊ आणि राजकीय नेता दीपक निकाळजे यांच्या फ्लॅटवरही धाड टाकण्यात आल्याचे सूत्राने सांगितले.
छोटा राजनला अटक करण्यात अजित डोबाल यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. राजनला अटक करण्याच्या काही दिवसांपूर्वीच डोबाल इंडोनेशियातील काही लोकांच्या संपर्कात होते. राजनच्या प्रत्येक हालचालींची माहिती त्यांना गुप्तचरांकडून मिळत होती. दाऊद इब्राहिम राजनच्या जीवावर टपून बसला असल्याची माहितीही डोबाल यांना होती. त्यामुळे राजनला जिवंत पकडण्यावरच त्यांचा भर होता. आता राजनला भारतात आणण्यात आल्यानंतर ते त्याच्याकडून दाऊदविषयीची प्रत्येक महत्त्वाची माहिती प्राप्त करणार आहेत.
आमच्या भीतीमुळेच राजन आला शरण : छोटा शकीलचा दावा
छोटा राजनला ठार मारण्यासाठी आम्ही मोहीमच हाती घेतली होती. त्याच्यावर दोनवेळा हल्लेही केले आहेत. पण, तो सुदैवाने बचावला. दाऊद इब्राहिमची ‘डी’ कंपनी आपला गेम केल्याशिवाय शांत बसणार नाही, याची जाणीव असल्यानेच, स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी छोटा राजन पोलिसांना शरण गेला, असा दावा दाऊदचा उजवा हात असलेला अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन छोटा शकीलने केला आहे.
छोटा राजनला अटक झाल्याने आमची फार मोठी निराशा झाली आहे. त्याच्या अटकेची बातमी ऐकून आम्ही मुळीच खुश नाही. त्याने स्वत:ला सुरक्षित केले असले, तरी आमचे शत्रूत्व संपत नसल्याचेही शकीलने एका अज्ञात ठिकाणाहून वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
आम्ही मुळीच थांबणार नाही. त्याला संपविणे हाच आमचा उद्देश आहे. त्याच्यावर हल्ले करण्याचे आमचे सत्र सुरूच राहतील, असे सांगताना, इंडोनेशियन पोलिसांच्या ताब्यात असलेला छोटा राजन भारताच्या ताब्यात जाण्याबाबत काहीही माहिती नसल्याचेही तो म्हणाला.
आमचा भारत सरकारवर विश्‍वास नाही. ते त्याचे लाड पुरवतील आणि आमच्याविरुद्ध त्याची मदत घेतील. भारत सरकार त्याची चौकशी करून त्याला फासावर लटकवतील, याविषयीदेखील आम्हाला शंका आहे. त्याची अटक हा आमचा विषय नाही. ‘दुष्मन खत्म हो’ हाच आमचा हेतू आहे. तो कोठेही असला, तरीही आम्ही त्याला सोडणार नाही, असा इशाराही शकीलने दिला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25367

Posted by on Oct 28 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1268 of 2453 articles)


=एका पुस्तकातील खळबळजनक दावा= नवी दिल्ली, [२७ ऑक्टोबर] - पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो आणि तहरिक-ए-इन्साफ या राजकीय पक्षाचा सर्वेसर्वा ...

×