Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » आता भाजपाचे लक्ष अंतिम फेरीकडे

आता भाजपाचे लक्ष अंतिम फेरीकडे

=बिहार विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाने भाजपाचे मनोबल उंचावले=
bihar-mapनवी दिल्ली, [१० जुलै] – बिहारमध्ये विधानपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या निर्विवाद विजयाने भाजपाने एकप्रकारे विधानसभा निवडणुकीची उपांत्यफेरी जिंकली आहे. भाजपाचे लक्ष आता विधानसभा निवडणुकीच्या अंतिम फेरीकडे लागले आहे. या विजयाने भाजपा आणि मित्रपक्षांचे मनोबल उंचावले असून याचा फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीत निश्‍चितपणे मिळणार आहे.
विधानपरिषदेच्या २४ जागांपैकी भाजपाच्या नेतृत्वातील रालोआने १३ जागा जिंकल्या आहेत. यात भाजपाने सर्वाधिक म्हणजे १२ जागा जिंकत आपला वरचष्मा सिद्ध केला आहे. रामविलास पासवानांच्या नेतृत्वातील लोकजनशक्ती पक्षाने एक जागा जिंकली आहे.
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या भाजपाच्या दारुण पराभवानंतर बिहारमध्ये होणारी विधानसभा निवडणूक ही पहिलीच आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकणे भाजपासाठी आवश्यकच नाही तर अपरिहार्य आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत मिळालेल्या या निर्विवाद विजयाने भाजपाचा आत्मविश्‍वास वाढला आहे, हे निश्‍चित.
ऑक्टोबर महिन्यात बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे विधान परिषदेच्या २४ जागांसाठी होणार्‍या निवडणुकीला अतिशय महत्त्व प्राप्त झाले होते. बिहारमध्ये कधीकाळी भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या जनता दल युनायटेडने विधानसभा निवडणुकीसाठी लालूप्रसाद यादवांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी केली आहे. मात्र, या दोन नेत्यांच्या आघाडीला फक्त ८ जागांवर समाधान मानावे लागले. जनता दल युनायटेडला ५ तर राजदला ३ जागा मिळाल्या.
विधानपरिषद निवडणुका या प्रत्यक्ष जनतेतून होत नसल्या तरी राज्यातील जनतेचा पर्यायाने लोकप्रतिनिधींचा कल कसा आहे, याचे संकेत यातून मिळाले आहेत, हे नाकारता येणार नाही. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जदयु आणि राजदचे नेते नाईलाजाने एकत्र आले असले तरी या दोन पक्षांचे मध्यमस्तरावरचे नेते आणि कार्यकर्ते मनापासून एकत्र आलेले नाहीत, हे या निवडणुकीच्या निकालाने दिसून आले आले आहे. नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्या आघाडीला ८ जागा मिळाल्या असल्या तरी या दोघांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांचे काम केले नाही. उलट एकमेकांच्या विरोधात काम केले. जदयुचा उमेदवार होता तेथे राजदच्या कार्यकर्त्यांनी त्याला मदत केली नाही, मतही दिले नाही. त्याचप्रमाणे राजदचा उमेदवार होता तेथे जदयुच्या कार्यकर्त्यांनी त्याला मदत केली नाही. त्यामुळेच या दोन पक्षांना या निवडणुकीत अपेक्षित यश मिळू शकले नाही. आगामी बिहार विधानसभेच्या निवडणुकीत या दोन पक्षांची स्थिती काय राहणार याचे दर्शन या निवडणुकीतून मिळाले आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या आधी जदयु आणि राजद यांची आघाडी विधानसभा निवडणुकीत भाजपासमोर मोठे आव्हान उभे करेल, असे मानले जात होते. ते या निकालाने खोटे ठरले.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत या दोन पक्षांच्या मध्यमस्तरावरच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांचे काम केले नाही तर विधानसभा निवडणुकीत करण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. उलट, या निवडणुकीच्या निकालाने या दोन पक्षातील संबंध आणखी तणावपूर्ण होणार आहेत. त्यामुळे या आघाडीचे विधानसभा निवडणुकीत भाजपासमोर मोठे आव्हान उभे राहील अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. परिणामी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयाची संधी वाढली आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत आम्हाला दोनतृतीयांश बहुमत मिळेल, असा विश्‍वास लोकजनशक्ती पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी व्यक्त केला, तो यथार्थ आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23372

Posted by on Jul 11 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (1565 of 2452 articles)


इस्रोची ऐतिहासिक कामगिरी आतापर्यंत ४५ विदेशी उपग्रहांचे प्रक्षेपण वैज्ञानिकांनी केला जल्लोष चेन्नई, [१० जुलै] - ब्रिटनचे पाच उपग्रह एकाचवेळी ...

×