Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » आयुष्याचा प्रत्येक क्षण १२५ कोटी भारतीयांसाठी

आयुष्याचा प्रत्येक क्षण १२५ कोटी भारतीयांसाठी

  • ओव्हरटाईम गुन्हा असेल, तर वारंवार करणार
  • शांघायमध्ये भारतीयांना नरेंद्र मोदींचे संबोधन
  • तुमचा आशीर्वाद घेण्यासाठीच आलो =

narendra modi 33शांघाय, [१६ मे] – माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा केवळ १२५ कोटी भारतीयांसाठीच आहे आणि आयुष्यभर मी भारतीयांची सेवा करीत राहणार आहे, अशी ग्वाही देतानाच, ‘काही लोक फारच कमी काम करतात, त्यांच्यावर टीका होत नाही. काही लोक निव्वळ झोपा काढतात, त्यांच्यावरही टीका होत नाही. माझे मात्र नशीबच खराब आहे… कारण, मी निरंतर आणि नेहमी कामच करीत असल्याने माझ्यावर टीका होत आहे. अविश्रांत काम करणे हा जर गुन्हा असेल, तर तो गुन्हा मी वारंवार करेन,’ अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी चीन दौर्‍यावर असताना विरोधकांना कानपिचक्या दिल्या.
केंद्रात भाजपाचे स्पष्ट बहुमताने सरकार आले आणि मी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली, त्याच क्षणी १२५ कोटी भारतीयांची सेवा करण्यासाठी मी स्वत:ला वाहून घेतले होते आणि त्यासाठीच मी निरंतर काम करीत असतो. देशवासीयांची सेवा हाच माझा एकमेव धर्म आहे आणि त्याचेच मी पालन करणार आहे, असे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी परदेश दौरेच करीत आहेत, अशी टीका माझ्यावर होत आहे. जगातील प्रत्येक चांगली गोष्ट शिकण्याचा, ती अवगत करण्याचा माझा प्रयत्न आहे. माझा प्रत्येक परदेश दौरा भारताच्या आणि विदेशात राहणार्‍या भारतीयांच्या हितासाठीच आहे, असे स्पष्ट प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी शांघाय येथील एक्सपो केंद्रात हजारो भारतीयांना संबोधित करताना केले. मोदींच्या या भाषणाच्यावेळी भारावलेल्या वातावरणामुळे न्यूयॉर्क येथील मॅडिसन स्क्वेअर गार्डन आणि ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील मोदींच्या भाषणाच्या आठवणींना उजाळा मिळाला.
काळ अतिशय झपाट्याने बदलत आहे. चीनमध्ये भारतीय आनंदाने राहत आहेत, असे सांगताना मोदी यांनी आजपासून एक वर्ष आधीच्या आठवणींनाही उजाळा दिला. तो आजचाच दिवस होता, १६ मे… केवळ चीनच नव्हे, तर जगाच्या कानाकोपर्‍यातील भारतीयांच्या मनात एकच प्रश्‍न होता आणि तो म्हणजे, लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार? प्रत्येकाचा एकच सूर होता, ‘दुख भरे दिन बिते रे भय्या, अब सुख आयो रे’. एक वर्षापूर्वी माझ्यावर टीका केली जात होती. टीका योग्यच होती, पण, शंका चुकीची होती. पंतप्रधानपदासाठी मी योग्य आहे का, माझा बायोडाटा पाहूनच अनेकांनी मला नाकारले. आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यावेळी मी एकच संकल्प केला होता आणि तो म्हणजे, न थकता काम करण्याचा… एक वर्षानंतर मी तुमच्यापुढे आहे… उद्या रविवार आहे… तुम्ही सर्वच सुटीचा आनंद घ्याल. पण, मी मंगोलियात काम करीत राहणार आहे, असे मोदी यांनी सांगताच हजारो भारतीय हात टाळ्या वाजविण्यासाठी उठले.
शांघायच्या या भूमीत आज मी ‘लघु भारत’ बघत आहे. जनता जनार्दन सर्वोपरी आहे. जनता परमेश्‍वराचेच रूप असते. तुमचा आशीर्वाद घेण्यासाठीच मी येथे आलो आहे. मला आपला आशीर्वाद द्या. दुसर्‍या देशातून आलेल्या व्यक्तीचे इतके भव्य स्वागत होण्याची चीनच्या आजवरच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. हे स्वागत नरेंद्र मोदी यांचे नसून, १२५ कोटी भारतीयांचे आहे, असे पंतप्रधानांनी म्हणताच सभागृह टाळ्यांचा कडकडाट आणि मोदी…मोदी…च्या घोषणांनी दुमदुमले.
१५ वर्षांपूर्वी विकसनशील देशांना कुणीही विचारत नव्हते. पण, आता वार्‍याची दिशा बदलली आहे. हेच विकसनशील देश विकसित जगाला आव्हान देत आहेत. जगाला देण्यासाठी आपल्याकडे खूप काही आहे, असे सांगताना मोदी यांनी दहशतवादाचा मुद्दाही उपस्थित केला. दहशतवाद्यांच्या निशाण्यावर नसेल, असा एकही देश जगाच्या पाठीवर नाही. दहशतवाद्यांच्या बंदुकांनी झालेल्या जखमांवर मलम कोण लावणार, त्यांच्या मनात आयुष्याविषयी विश्‍वास कोण जागृत करणार, या प्रश्‍नाचे एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे भारत. ज्यांच्या पूर्वजांनी ‘वसुधैव कुटुंबकम’ हा मंत्र जगाला दिला, केवळ त्यांचेच वंशज हे कार्य करू शकतात. हे संपूर्ण विश्‍वच आपले आहे. कारण, आपल्या पूर्वजांनी चंद्र आणि सूर्याचीही आपल्या नातेवाईकांसारखीच ओळख करून दिली आहे. चंद्राला मामा आणि सूर्याला दादा असे संबोधले जात होते. आजही आपल्याला त्या गोष्टी आठवतात. त्यामुळे संपूर्ण जगाची सेवा करणे ही भारतीयांचीच जबाबदारी आहे, असेही मोदी यांनी आवर्जुन सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22585

Posted by on May 17 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1692 of 2458 articles)


=बिहारलाही धक्का, एक ठार, ५.७ इतकी तीव्रता= काठमांडू/पाटणा, [१६ मे] - गेल्या २५ एप्रिलच्या महाविनाशकारी भूकंपातून अजूनही पूर्णपणे न सावरलेल्या ...

×