Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » आर आर पाटील यांचे निधन

आर आर पाटील यांचे निधन

  • कर्करोगाशी झुंज अपयशी
  • राज्यात एक दिवसाचा दुखवटा
  • आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

rrpatilमुंबई, [१६ फेब्रुवारी] – महाराष्ट्राचे झुंझार नेतृत्व, अशी ओळख लाभलेले राष्ट्रवादी कॉंगे्रसचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील ऊर्फ आबा यांचे आज सोमवारी दुपारी लीलावती रुग्णालयात मुखाच्या कर्करोगाने निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. आबांची राजकीय कारकीर्द अतिशय झुंझार राहिली. पण, कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात मात्र त्यांना अपयश आले. त्यांच्या सन्मानार्थ राज्यभरात एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून, उद्या मंगळवारी दुपारी एक वाजता आबांच्या पार्थिवावर सांगली जिल्ह्यातील त्यांच्या अंजनी या जन्मगावी संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
स्वच्छ प्रतिमा आणि सहज मान्य होणारे नेतृत्व यासाठी प्रख्यात असलेल्या आबांना मागील तीन महिन्यांपासून मुखाच्या कर्करोगाने ग्रासले होते. त्यांच्यावर आधी ब्रीच कॅण्डी आणि नंतर बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात भरती करण्यात आले. मध्यंतरी त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली होती. त्यांनी चालण्याचाही सराव केला होता. परंतु, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली. यामुळे त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. सोमवार सकाळपासून आबांची प्रकृती आणखी खालावली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न केले. पण, डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही. यातच आबांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त वार्‍यासारखे महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या कानाकोपर्‍यात पसरले आणि देशभरातील राजकीय व सामाजिक वर्तुळाला प्रचंड धक्का बसला. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.
सांगली जिल्ह्यातील तासगाव विधानसभा मतदारसंघातून सहावेळा विधानसभेवर निवडून गेलेले आबा राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या फळीतील एक होते. सर्वच स्तरांवरील लोकांना अंत्यदर्शन घेता यावे, यासाठी आबांचे पार्थिव राष्ट्रवादीच्या नरिमन पॉईंट येथील प्रदेश मुख्यालयात सायंकाळी सहा वाजेपासून दोन तास ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव अंजनी या त्यांच्या जन्मगावी नेण्यात आले.
आबांच्या निधनाचे वृत्त समजताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लीलावती रुग्णालय गाठले. महाराष्ट्राच्या जनतेकरिता हा फार मोठा धक्का आहे. आर. आर. पाटील यांनी राजकारणात स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण केली होती. आयुष्यभर त्यांनी केवळ सामान्य जनतेचाच विचार केला. प्रकृतीने साथ दिली असती, तर आणखी अनेक वर्षे त्यांनी जनसेवा केली असती. त्यांचे निधन महाराष्ट्रासाठी फार मोठा आघात आहे. विधानसभेच्या माझ्या कारकिर्दीत प्रचंड ज्ञान असलेला नेता मी आजवर पाहिला नाही, अशा शब्दात आपले दु:ख व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी राज्यात एक दिवसाचा दुखवटा आणि आबांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची घोषणा केली.
तत्पूर्वी, आज सकाळी आबांची प्रकृती खालावल्याचे वृत्त समजताच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक आणि पदाधिकार्‍यांनी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयाबाहेर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. आबांची प्रकृती खालावली असली, तरी स्थिर आहे. ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे कुणीही अफवांवर विश्‍वास ठेवू नका, असे डॉक्टर आणि आबांच्या कुटुंबीयांकडून वारंवार जाहीर करण्यात येत होते.
आबांचा अल्पपरिचय
राष्ट्रवादी कॉंगे्रसच्या प्रभावशाली नेत्यांपैकी एक असलेले आबा अर्थात रावसाहेब रामराव पाटील यांची राजकीय कारकीर्द जिल्हा परिषद सदस्य ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अशी राहिली. उमदे व्यक्तिमत्त्व लाभलेल्या आबांचे राष्ट्रवादीशिवाय इतरही राजकीय पक्षांमधील नेत्यांसोबतही उत्तम मैत्रीपूर्ण संबंध होते. उत्तम वक्ते आणि सामाजिक प्रश्‍नांची जाण असणारा नेता म्हणून आबांची जनमानसात ओळख होती. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली.
सामाजिक प्रश्‍नांची जाण असणारा नेता अशी आर. आर. पाटील यांची राजकीय आणि सामाजिक वर्तुळात ओळख होती. महाराष्ट्रात गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असताना कॉंगे्रस व राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. आबा मात्र यास अपवाद ठरले. त्यांनी आपली स्वच्छ प्रतिमा जोपासली.
आबांनी आपल्या ब्लॉगवरून जनतेशी थेट संवाद साधणे सुरू केले होते. १६ ऑगस्ट १९५७ रोजी सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील अंजनी या गावात त्यांचा जन्म झाला. शिक्षणतज्ज्ञ पी. बी. पाटील यांच्या शाळेत त्यांनी लहानपणी श्रमदान करून शिक्षण घेतले. पुढे सांगलीच्याच शांतीनिकेतन महाविद्यालयात त्यांनी कला शाखेची पदवी घेतली आणि नंतर वकिलीचे शिक्षण पूर्ण केले.
१९७९ ते १९९० या काळात आबा सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य होते. १९९० मध्ये त्यांनी सर्वप्रथम राज्य विधानसभेची निवडणूक लढविली आणि जिंकलेही. त्यानंतर १९९५, १९९९, २००४ आणि २००९ मध्ये ते सलग महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले होते. १९९९ मधील कॉंगे्रस-राष्ट्रवादी कॉंगे्रसच्या सरकारमध्ये त्यांनी नगरविकास मंत्री म्हणून प्रथम जबाबदारी स्वीकारली. ग्राम विकास मंत्री म्हणून गाडगे महाराज स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविल्यामुळे शरद पवार यांनी त्यांचे विशेष कौतुक केले होते. त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण, लोकनेते वसंतदादा पाटील यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव होता. तळागाळातील साध्या माणसांसोबत गप्पा मारणे, त्यांचे दु:ख समजून घेणे याची त्यांना आवड होती. म्हणूनच ते जनमानसात लोकप्रिय होते.
२००३ मध्ये बनावट मुद्रांकांच्या तेलगी घोटाळ्यात नाव आल्यानंतर छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि महत्त्वाचे गृहखाते आबांकडे सोपविण्यात आले. त्यानंतर २००४ मध्ये आबांना राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतरच्या सरकारमध्ये आबा पुन्हा राज्याचे गृहमंत्री झाले. तथापि, २६/११ च्या मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर ‘मोठमोठ्या शहरांमध्ये असे लहानलहान हल्ले होतच असतात,’ असे वादग्रस्त विधान केल्यामुळे आबांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. २००९ मध्ये राज्यात पुन्हा एकदा कॉंगे्रस आणि राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर आले आणि आबा पुन्हा गृहमंत्री झाले. मुंबई आणि महाराष्ट्राच्या अन्य भागात डान्स बार्सवर बंदी घालण्याचा वादग्रस्त पण तितकाच धाडसी निर्णय आबांनी घेतला. या निर्णयामुळे आबांच्या कणखर नेतृत्वाची झलक सार्‍या महाराष्ट्राला दिसली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20633

Posted by on Feb 17 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (2052 of 2451 articles)


नांदेड, [१६ फेब्रुवारी] - महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील मुखेड या प्रतिष्ठेच्या विधानसभा जागेवर भाजपाने आज सोमवारी दणदणीत विजय मिळविला आहे. भाजपाचे ...

×