Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » आसामात भाजपाला आघाडी

आसामात भाजपाला आघाडी

  • तामिळनाडूत अण्णाद्रमुक, केरळात डावी आघाडी, बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस
  • इंडिया टीव्ही सी-व्होटरचा निष्कर्ष

BJP-FLAG-RALLY-IN-UP-1नवी दिल्ली, [५ मार्च] – निवडणूक आयोगाने शुक्रवारी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर काही तास उलटत नाहीत तोच इंडिया टीव्ही सी-व्होटरने केलेल्या प्रारंभिक जनमत चाचणीच्या निष्कर्षानुसार आसामात भाजपाला आघाडी मिळणार असून, केरळमध्ये माकपच्या नेतृत्वातील डावी आघाडी पुनरागमन करण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुक आणि पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा तृणमूल कॉंग्रेस आपली सत्ता कायम ठेवेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
आसाम विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ कॉंग्रेसला टक्कर देणार्‍या भाजपाच्या नेतृत्वातील आघाडीला बहुमतापेक्षा थोड्या कमी जागा मिळतील, असा अंदाज आहे. १२६ सदस्यीय विधानसभेत भाजपाच्या नेतृत्वातील आघाडीला ५७ जागा मिळतील, असा अंदाज आहे. हा आकडा बहुमतापेक्षा ७ ने कमी आहे. मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या नेतृत्वातील कॉंग्रेस पक्षाला ४४ जागांवरच समाधान मानावे लागेल. पाच वर्षांपूर्वी कॉंग्रेसला ७८ जागा मिळाल्या होत्या. बदरुद्दिन अजमल यांच्या ऑल इंडियन डेमॉक्रॅटिक फ्रंटला १९ जागा मिळून शकतात. इतर पक्ष सहा जागा पटकावतील असा अंदाज आहे. मात्र, ही जनमत चाचणी भाजपा-आगप यांच्या आघाडीची घोषणा होण्यापूर्वी करण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सत्ता कायम राखतील, असा अंदाज आहे. २९४ सदस्यीय विधानसभेत तृणमूल कॉंग्रेसला १५६ जागा मिळू शकतात. गेल्या निवडणुकीत तृणमूलने १८४ जागा जिंकल्या होत्या. माकपच्या नेतृत्वातील डाव्या आघाडीला ११४ (गेल्या वेळीपेक्षा ६० अधिक) जागा मिळण्याचा अंदाज आहे. गेल्या वेळी ४२ जागा जिंकणारा कॉंग्रेस पक्ष यावेळी फक्त १३ जागा जिंकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. इतरांना ७ जागा मिळू शकतात.
तामिळनाडू निवडणुकीत द्रमुकशी लढा देणार्‍या सत्तारूढ अण्णाद्रमुकला २३४ सदस्यीय विधानसभेत बहुमतापेक्षा दोन जागा कमी मिळू शकतात. अण्णाद्रमुकला ११६ (गेल्यावेळी २०३), तर द्रमुकला १०१ जागा मिळण्याचा अंदाज आहे. इतर पक्षांना १७ जागा मिळू शकतात, तर भाजपाला फारसे यश मिळत नसल्याचे दिसत आहे.
केरळात मुख्यमंत्री ओमन चंडी यांच्या नेतृत्वातील युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटला सत्तेतून पायउतार व्हावे लागू शकते. १४० सदस्यीय विधानसभेत गेल्या वेळी ७२ जागा जिंकणार्‍या युडीएफला यावेळी ४९, तर माकपच्या नेतृत्वातील डाव्या आघाडीला ८९ जागांसह स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज आहे. भाजपाच्या नेतृत्वातील रालोआला एक व इतरांना एक जागा मिळू शकते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27039

Posted by on Mar 6 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (760 of 2453 articles)


=अमित शाह यांचा विश्‍वास= लखनौ, [५ मार्च] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपाप्रणीत रालोआचे सरकार प्रत्येक गावाच्या शेवटच्या टोकापर्यंत ...

×