Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » उत्तराखंडच्या मुद्यावरून संसदेत गदारोळ

उत्तराखंडच्या मुद्यावरून संसदेत गदारोळ

=राज्यसभा दिवसभरासाठी स्थगित •, लोकसभेत कॉंग्रेसच्या सदस्यांची घोषणबाजी=
sansad1नवी दिल्ली, [२५ एप्रिल] – उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मुद्यावरून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या टप्प्यात सोमवरी पहिल्याच दिवशी अपेक्षेप्रमाणे दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज आधी तीनदा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले, तर लोकसभेत कॉंग्रेसच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत वेलमध्ये धरणे दिले.
राज्यसभेत कामकाजाला प्रारंभ होताच विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी उत्तराखंडचा मुद्दा उपस्थित केला. यावर सभागृहात चर्चा करण्याची मागणी आझाद यांनी केली. सभागृहाचे कामकाज चालू नये, अशी मोदी सरकारची इच्छा आहे, त्यामुळे अधिवेशनाला काही दिवस राहिले असताना आधी अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यात आली, आता उत्तराखंडमध्ये तोच प्रयोग करण्यात आला, याकडे लक्ष वेधत आझाद म्हणाले की, हा विरोधी पक्षांना जाणीवपूर्वक भडकविण्याचा सत्ताधारी पक्षाचा प्रयत्न आहे. अरुणाचल प्रदेशमधील कॉंग्रेसचे सरकार पाडण्यात आले, नंतर उत्तराखंडमधील सरकार पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. कॉंग्रेसच्या शासनकाळातही राष्ट्रपती राजवट लावण्यात आली, पण अशा क्रूर आणि घटनाबाह्य पद्धतीने नाही, याकडे आझाद यांनी लक्ष वेधले.
न्यायालयात असलेल्या प्रकरणावर सभागृहात चर्चा करता येत नाही, असे संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी स्पष्ट केले. मात्र, आझाद आणि इतर कॉंग्रेस सदस्य चर्चेच्या मागणीवर ठाम होते. सरकारने न्यायालयाच्या निर्णयाचा अपमान केला, उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे, म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप करत आझाद म्हणाले की, आम्ही लोकशाहीचा अपमान आणि कत्तल होऊ देणार नाही. याचवेळी हातात पोस्टर घेऊन कॉंग्रेस सदस्य आपल्या जागेवर उभे होत घोषणा देऊ लागले.
जेएनयूच्या वेळी न्यायप्रविष्ट असलेल्या मुद्यावर चर्चेपासून कोणीही आम्हाला रोखू शकत नाही, अशी भूमिका सभागृहाचे नेते अरुण जेटली यांनी घेतली होती, याकडे माकपचे सीताराम येचुरी यांनी लक्ष वेधले. याचवेळी कॉंग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी घटनेतील ३५६ (३) कलमाचा संदर्भ देत सभागृहात अशा मुद्यावर चर्चा करता येते, याकडे लक्ष वेधले. जेव्हा सभागृहात उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवटीचा अध्यादेश मंजुरीसाठी मांडला जाईल, त्यावेळी या मुद्यावर चर्चा करता येईल, आताच नाही, असे अरुण जेटली यांनी स्पष्ट केले. मात्र, यामुळे विरोधकांचे समाधान झाले नाही. हाती पोस्टर घेत कॉंग्रेसचे सदस्य घोषणा देत वेलमध्ये आले. त्यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सदस्यांनी हातातील पोस्टर बाजूला सारून आपल्या जागेवर जावे, असे आवाहन उपाध्यक्ष पी. जे. कुरियन वारंवार करत होते. परंतु, कॉंग्रेसचे सदस्य ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. लोकशाहीची हत्या बंद करा, अशा घोषणा कॉंग्रेसचे सदस्य देत होते.
सभागृहातील वातावरण शांत होत नसल्यामुळे कुरियन यांनी पावणेबाराच्या सुमारास सभागृहाचे कामकाज स्थगित केले. बारा वाजता अध्यक्ष हमीद अन्सारी पीठासीन झाले. त्यांनी शून्य तास पुकारला. पण कॉंग्रेसच्या सदस्यांनी पुन्हा घोषणबाजी सुरू केली. फलक दाखवू नये, असे आवाहन हमीद अन्सारी करत होते. पण, सदस्यांचा त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. भाजपा सदस्यांनीही प्रत्युत्तरात घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सभागृहातील गोंधळ आणखी वाढला. पंतप्रधान मोदी यांना काम करू न देण्याची विरोधकांची भूमिका आहे, असा आरोप मुख्तार अब्बास नकवी यांनी केला. गोंधळ वाढल्यामुळे अध्यक्षांनी कामकाज दुपारी दोनपर्यंत स्थगित केले. दोन वाजता याचीच पुनरावृत्ती झाली, त्यामुळे आधी कामकाज तीन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करावे लागले.
लोकसभेतही गदारोळ
लोकसभेत कामकाजाला सुरुवात होताच उत्तराखंडच्या मुद्यावरून कॉंग्रेसने दिलेला स्थगनप्रस्ताव फेटाळण्याची घोषणा सभापती सुमित्रा महाजन यांनी केली. उत्तराखंडच्या मुद्यावर चर्चेची कॉंग्रेसची मागणी होती. मात्र ही मागणी सभापतींनी अमान्य केल्यामुळे कॉंग्रेसच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. उत्तराखंडचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने या मुद्यावर सभागृहात चर्चा करता येणार नाही, अशी सरकारची भूमिका होती. मात्र, ही भूमिका खडगे यांना मान्य नव्हती. अयोध्या प्रकरण, इशरत जहॉं प्रकरण न्यायालयात असताना त्यावर सभागृहात चर्चा होतेच ना, असे खरगे म्हणाले. ‘तानाशाही नही चलेंगी, मोदी सरकार होश मे आओ’, अशा घोषणा कॉंग्रेसचे सदस्य देत होते. विविध राज्यातील विरोधी पक्षांची सरकारे अस्थिर करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खडगे यांनी केला. विरोधी पक्षांची सरकारे याच पद्धतीने अस्थिर करण्यात आली, तर देशात लोकशाही राहाणारच नाही, असे खडगे म्हणाले. उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लावणे म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप खडगे यांनी केला. कॉंग्रेसचे सदस्य वेलमध्ये आले आणि धरणे देत खाली ठाण मांडून बसले. सदस्यांनी घोषणा थांबवत आपल्या जागेवर जाण्याचे आवाहन सभापती वारंवार करत होत्या. पण कॉंग्रेसचे सदस्य त्याला प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे महाजन यांनी गोंधळातच कामकाज सुरू केले.
चौकट
भाजपाचा संबंध नाही : राजनाथसिंह
उत्तराखंडमधील राजकीय संकटाशी भाजपाचे काही देणेघेणे नसून, हा कॉंग्रेसचा अंतर्गत प्रश्‍न आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह या गोंधळात हस्तक्षेप करत म्हणाले. कॉंग्रेसला आपले राज्य नीट सांभाळता येत नाही आणि त्याचा ठपका ते भाजपावर आणि मोदी सरकारवर ठेवत आहे, असे राजनाथसिंह म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27990

Posted by on Apr 26 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (440 of 2453 articles)


=जेएनयूने उगारला कारवाईचा बडगा, कन्हैयाला दहा हजारांचा दंड= नवी दिल्ली, [२५ एप्रिल] - येथील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) परिसरात ...

×