Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » उत्तराखंड, जेएनयु मुद्यांवरून राज्यसभेत गदारोळ

उत्तराखंड, जेएनयु मुद्यांवरून राज्यसभेत गदारोळ

=राज्यसभेत कामकाज स्थगित=
rajyasabhaनवी दिल्ली, [२६ एप्रिल] – उत्तराखंड आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयु) विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमार आणि अन्य विद्यार्थी नेत्यांवरील कारवाईच्या मुद्यांवरून आज पुन्हा राज्यसभेत गदारोळ झाला. यामुळे सभागृहाचे कामकाज आधी तीनदा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करावे लागले.
उत्तराखंडच्या मुद्यावरून राज्यसभेत सोमवारीही प्रचंड गदारोळ झाला होता. उत्तराखंडचा मुद्दा आज पुन्हा कॉंग्रेसच्या सदस्यांनी आक्रमकपणे उपस्थित केला, तर डाव्या पक्षाच्या सदस्यांनी कन्हैया कुमार आणि अन्य विद्यार्थी नेत्यांवर मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या कारवाईवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. उत्तराखंडच्या मुद्यावर सभागृहात चर्चेची अनुमती द्यावी, या कॉंग्रेसच्या मागणीला बसपाच्या मायावती यांनी पाठिंबा दिला. घटनेतील ३५६ कलमांचा दुरुपयोग आधी कॉंग्रेसने केला, आता भाजपा करीत आहे, असा आरोप मायावती यांनी केला. मात्र, उत्तराखंडच्या मुद्यावर सभागृहात चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी मायावती यांनी केली.
सभागृहाचे नेते आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही मागणी फेटाळून लावली. उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवटीला मंजुरी देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी सभागृहात मांडला जाईल, तेव्हाच या मुद्यावर चर्चा करता येईल, असे ते म्हणाले. उत्तराखंडच्या मुद्यावर आम्हालाही खूप काही बोलायचे आहे, त्याठिकाणी विधानसभेच्या अध्यक्षांनी बहुमतातील पक्षाला अल्पमतात केले, तर अल्पमतातील पक्षाला बहुमतात. आपल्या या कृतीने अध्यक्षांनी घटनेच्या चिंधड्या उडवल्या, असा आरोप जेटली यांनी केला. सभागृहातील ६७ पैकी ३५ सदस्य म्हणतात की, आम्ही वित्तविधेयकाच्या विरोधात मतदान केले, तरीसुद्धा विधानसभेचे अध्यक्ष त्यांचा आवाज दडपून टाकतात, याकडे लक्ष वेधत जेटली म्हणाले की, या मुद्यावर सभागृहात जेव्हा चर्चा होईल, तेव्हा आम्हीही त्यात सहभागी होऊ. जेटली यांच्या या आरोपाने कॉंग्रेस सदस्य संतप्त झाले आणि घोषणा देत वेलमध्ये आले. त्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उपसभापती कुरियन हे सदस्यांना आपल्या जागेवर जाण्याचे आवाहन करीत होते, पण कॉंग्रेस सदस्य ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे कुरियन यांनी सभागृहाचे कामकाज बारा वाजेपर्यंत स्थगित केले. बारा वाजता कामकाज सुरू झाल्यावर कॉंग्रेस सदस्यांची घोषणाबाजी सुरूच होती.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमार आणि इतर विद्यार्थी नेत्यांवरील कारवाईचा मुद्दा भाकपाचे डी. राजा यांनी उपस्थित केला. ही कठोर कारवाई म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप राजा यांनी केला. मानव संसाधन मंत्रालयाच्या सूचनेवरून ही कारवाई करण्यात आली, असा आरोप करत राजा म्हणाले की, हा विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न आहे. या मुद्यावरून डाव्या पक्षाचे सदस्यही घोषणा देत वेलमध्ये आले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज वारंवार स्थगित करावे लागले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27997

Posted by on Apr 27 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (437 of 2453 articles)


औरंगाबाद, [२६ एप्रिल] - राज्यात पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर तेथील दारू आणि बिअर निर्मिती कंपन्यांच्या पाणीपुरवठ्यात उद्यापासून ५० टक्के आणि १० मेपासून ...

×