Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » एनएसजीतील प्रवेशासाठी मोदींचा मोर्चा रशियाकडे

एनएसजीतील प्रवेशासाठी मोदींचा मोर्चा रशियाकडे

narendra modi 21नवी दिल्ली, [१३ जून] – एनएसजीमध्ये भारताला स्थान मिळू नये यासाठी चीनचे प्रयत्न सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाकडे मोर्चा वळविला आहे. मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांना दूरध्वनी करून भारताला समर्थन देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, भारताच्या जागतिक राजकारणामधील विविध व्यासपीठांवरील वाढत्या प्रभावास रशियाचा पाठिंबा असल्याचे समजते. या दूरध्वनीच्या माध्यमामधून झालेल्या चर्चेमध्ये अत्यंत विशेष व्यूहात्मक भागीदारीमधील भागीदार देश असलेल्या भारत व रशियामधील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याप्रति दोन्ही नेत्यांनी कटिबद्धता दर्शविली.
दोन्ही देशांमधील सहकार्य असलेल्या विविध आंतरराष्ट्रीय मुद्यांवर ही चर्चा केंद्रित करण्यात आली होती, अशा आशयाचे निवेदन क्रेमलिनमधून यानंतर प्रसिद्ध करण्यात आले. मोदी व पुतीन यांच्यामध्ये लवकरच भेटही होणार आहे. या पृष्ठभूमीवर झालेली ही चर्चा अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.
एनएसजीच्या संवेदनशील बैठकीआधी मोदी हे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचीही भेट घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते. एनएसजीमधील भारताच्या प्रवेशास चीनचा ठाम विरोध करीत असताना एनएसजीमध्ये भारताला सदस्यत्व मिळावे यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मोदी यांना तसे आश्‍वासन दिल्यानंतर चीन संतप्त झाला आहे. भारताला या गटाचे सदस्यत्व मिळू नये यासाठी खोडा घालण्याचे प्रयत्न चीन करीत असून त्याचाच एक भाग म्हणून चीनने आज म्हटले की, भारताला सदस्यत्व द्यावयाचे असल्यास त्याविषयी एकमत होण्याची गरज आहे.
एनएसजीत फूट
भारताला एनएसजीत प्रवेश द्या की नाही यावरून मात्र, या करारावर स्वाक्षरी करणार्‍या देशांमध्ये फूट पडली आहे. भारताच्या सदस्यत्वावर व्हिएन्नाच्या बैठकीत चर्चाच झाली नाही, असा दावा चीनने केला आहे. अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी करणार्‍या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. व्हिएन्नामध्ये एनएसजीच्या ४८ सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, ही बैठक अधिकृत नसून, २४ जूनला होणार्‍या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी सदस्य देश एकत्रित जमले होते. यात भारताच्या सदस्यत्वाबाबत विषय नव्हता, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हॉंग लेई यांनी स्पष्ट केले.
मात्र, मोदींनी सदस्यत्व मिळविण्यासाठी पुतिन यांची मदत घेतल्याने चीन आणखीन जोरात विरोध करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
एनएसजीसाठी पाकिस्तानच लायक : अझीझ
इस्लामाबाद : अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर (एनपीटी) स्वाक्षरी न केलेल्या देशांना आण्विक इंधन पुरवठादार गटाचे (एनएसजी) सभासदत्व देण्याचा निर्णय घेण्यात आला तर या सभादत्वासाठी पाकिस्तान हा भारतापेक्षा अधिक लायक असल्याची प्रतिक्रिया त्या देशाचे परराष्ट्र संबंध सल्लागार सरताज अझीझ यांनी व्यक्त केली आहे.
पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्राला मुलाखत देताना अझीझ यांनी यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली.
एनएसजीच्या सभासदत्वासाठी भारताने अर्ज केल्याबरोबरच पाकिस्ताननेही अर्ज करण्याची व्यूहरचना आखली होती. या उद्देशार्थ आम्ही गेल्या तीन महिन्यांपासून आमचा अर्ज सुसज्ज ठेवला आहे. पाकिस्तानबरोबर भारताची तुलना केली असता भारताने १९७४ मध्ये आण्विक चाचणी घेऊन आण्विक इंधनाचा गैरवापर केल्याचे आढळून आले. त्यामुळेच एनएसजीची स्थापना करण्यात आली होती. यानंतर भारतामधून आण्विक इंधनाची चोरी झाली; पाकिस्तानमध्ये असा कोणताही प्रकार घडलेला नाही, असे अझीझ म्हणाले. एवढेच नाही तर या गटामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी इतर देशांकडून पाठिंबा मिळविण्यातही यश येत असल्याचा दावा त्यांनी केला यावेळी केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28581

Posted by on Jun 13 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (242 of 2453 articles)


चंदीगड, [१३ जून] - ज्येष्ठ नेते कमलनाथ यांची पंजाबचे प्रभारी सरचिटणीस म्हणून करण्यात आलेली नियुक्ती हा शिखांचा घोर अपमान आहे, ...

×