Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » एमटीसीआरमध्ये भारताचा प्रवेश

एमटीसीआरमध्ये भारताचा प्रवेश

  • चीन, पाकिस्तानला जोरदार धक्का
  • परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची अधिकृत घोषणा

MTCR-MODIनवी दिल्ली, [२७ जून] – अणुपुरवठादार देशांच्या गटात (एनएसजी) भारताचा प्रवेश रोखणार्‍या चीनला आज सोमवारी मोठा धक्का बसला आहे. क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण व्यवस्था अर्थात एमटीसीआर राष्ट्राच्या समूहात आज भारताला सहज प्रवेश मिळाला आहे. विशेष म्हणजे, चीन आणि पाकिस्तान यासारख्या देशांनाही अद्याप या समूहाचे सदस्यत्व मिळाले नाही. भारतासाठी ही घडामोड म्हणजे फार मोठे यश मानले जात आहे.
गेल्या आठवड्यात एनएसजीमध्ये भारताच्या प्रवेशाच्या मार्गात चीन आणि अन्य काही देशांनी खोडा टाकला होता. आज मात्र थेट एमटीसीआरमध्ये भारताला प्रवेश मिळाला. या गटातील भारत हा ३५ वा देश ठरला आहे. या गटात समावेश झाल्यामुळे भारत आता दुसर्‍या देशांसोबत क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करू शकणार आहे.
भारताचे परराष्ट्र व्यवहार सचिव एस, जयशंकर यांनी फ्रान्स, नेदरलँड आणि लक्झमबर्ग यासारख्या देशांच्या राजदूतांच्या उपस्थितीत एमटीसीआर समूहाच्या सदस्यत्वावर स्वाक्षरी केली. यानंतर लगेच नवी दिल्लीतील फ्रान्स दूतावासातर्फे याबाबतची औपचारिक घोषणा करण्यात आली. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एक निवेदन जाहीर करून ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली.
भारताच्या सदस्यत्वाला पाठिंबा दिल्याबद्दल या राष्ट्रसमूहातील सर्व ३४ देशांचा भारत मनापासून आभारी आहे. विशेषत: फ्रान्स आणि लक्झमबर्गच्या राजदूतांचे आम्ही विशेष आभार मानतो, असेही या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. भारताने एमटीसीआरच्या सदस्यत्वासाठी गेल्या वर्षी अर्ज केला होता. त्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अखेर भारताला हे सदस्यत्व देण्यात आले, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले.
इटलीचा विरोध मावळला
भारताच्या एमटीसीआरमधील सदस्यत्वाला इटलीचा विरोध होता. इटलीच्या दोन नौसैनिकांवर भारतात हत्येचा गुन्हा दाखल आहे, त्यामुळेच इटलीचा विरोध होता. मात्र भारताने दोन्ही नौसैनिकांना मायदेशी जाण्याची परवानगी दिल्यानंतर इटलीचा विरोध मावळला.
एमटीसीआरचा अर्थ आणि त्याचे फायदे
एमटीसीआर म्हणजेच क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण व्यवस्था असून, भारताच्या समावेशामुळे या समूहात आता ३५ देश झाले आहेत. जगभरात मोठ्या आणि विनाशकारी क्षेपणास्त्रांचा प्रसार रोखणे व मानवरहित शस्त्रांच्या निर्मितीवर आळा घालण्याचे काम हा गट करीत असतो.
या गटातील सहभागामुळे भारताला आता मानवरहित ड्रोन खरेदी करता येणार आहे. शिवाय, अमेरिकेडून प्रीडेटर ड्रोन खरेदीचा मार्गही मोकळा झाला आहे. भारत आता ब्राह्मोससारखे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकू शकणार आहे. या गटात प्रवेश झाल्यामुळे एनएसजीमधील भारताची दावेदारी आता आणखी बळकट झाली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28972

Posted by on Jun 28 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (165 of 2453 articles)


=परदेशातील संपत्तीची सरकारला मिळाली माहिती= नवी दिल्ली, [२७ जून] - भारतीयांनी विदेशातील बँकांमध्ये तब्बल १३ हजार कोटींचा काळा पैसा ठेवला ...

×