Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » ओबामा यांच्या दौर्‍यामुळे कडेकोट सुरक्षा

ओबामा यांच्या दौर्‍यामुळे कडेकोट सुरक्षा

President Barack Obama Speaks at a Meeting of the Democratic Governors Associationनवी दिल्ली, [१९ जानेवारी] – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर राजधानी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिन समारंभाचे ओबामा प्रमुख पाहुणे आहेत. याआधीही प्रजासत्ताक दिनी अनेक परदेशी राष्ट्रप्रमुख दिल्लीत आले होते, मात्र यावेळी जेवढी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे, तेवढी याआधी कधीही नव्हती.
२५ जानेवारीला ओबामा यांचे राजधानी दिल्लीत आगमन होणार असून २७ जानेवारीला ते परत जाणार आहेत. त्यापूर्वी आग्रा येथे ताजमहाल पाहण्यासाठी जाण्याचा त्यांचा कार्यक्रम आहे. ओबामा यांच्या तीन दिवसांच्या राजधानीतील वास्तव्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून सुरक्षा यंत्रणा डोळ्यात तेल घालून सज्ज झाल्या आहेत.
बराक ओबामा यांच्या सुरक्षेसाठी राजपथवर सात टप्प्यात सुरक्षा व्यवस्था राहणार असून पहिल्या तीन टप्प्यातील सुरक्षा व्यवस्था ही अमेरिकेच्या सुरक्षा दलांची राहणार आहेत. यासाठी बराक ओबामा यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील सिक्रेट सर्व्हिस एजंटसह दीड हजारावर अधिकारी आणि जवान दिल्लीत दाखल झाले आहेत.
राजधानीत १५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. निमलष्करी दलाचे २० हजार आणि दिल्ली पोलिसांचे ८० हजार असे १ लाख सुरक्षा जवान सज्ज झाले आहेत. आधीच कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणार्‍या राजधानीला आता किल्ल्याचे स्वरूप आले आहे.
सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून राजधानीतील प्रत्येक हॉटेलची, विश्रामगृहाची तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे. याशिवाय ज्या घरमालकांनी आपल्याकडे भाडेकरू वा पेईंग गेस्ट ठेवले त्यांची तपासणीही पोलिसांनी सुरू केली आहे. पोलिस पडताळणीशिवाय आपल्याकडे भाडेकरू ठेवणार्‍या घरमालकांवर पोलिसांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
बराक ओबामा यांच्या दौर्‍याच्या आधीपासून म्हणजे २४ जानेवारीपासूनच राजपथ परिसरातील सर्व शासकीय, निशासकीय कार्यालये आणि मेट्रो स्टेशन बंद ठेवण्याची सूचना अमेरिकी सुरक्षा अधिकार्‍यांनी भारतीय अधिकार्‍यांना केली आहे. राजपथच्या परिसरात असणार्‍या सर्व इमारतींवर सुरक्षाजवान तैनात केले जाणार आहेत. याशिवाय गर्दीतही साध्या वेषातील जवान राहणार आहेत. बराक ओबामा यांचा मुक्काम राहणार असलेल्या चाणक्यपुरी भागातील आयटीसीच्या मौर्या शेरेटन या पंचतारांकित हॉटेलचा ताबा अमेरिकेच्या सुरक्षा अधिकार्‍यांनी घेतला असून याठिकाणी त्यांनी आपला नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. २२ जानेवारीपासून हे हॉटेल पूर्ण रिकामे केले जाणार असून याठिकाणी सुरक्षा जवानांशिवाय कोणालाच प्रवेश राहणार नाही.
परंपरेत बदल
सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून बराक ओबामा प्रजासत्ताक दिनी राजपथवर आपल्या विशेष कारमधून येणार आहेत. आतापर्यंत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला बोलावलेला परदेशी पाहुणा आपल्या राष्ट्रपतींसोबत त्यांच्या कारने राजपथवर येत होता. यावेळी मात्र अमेरिकी सुरक्षा अधिकार्‍यांनी भारताच्या राष्ट्रपतींसोबत त्यांच्या कारने अमेरिकन अध्यक्षांना राजपथवर आणायला सुरक्षेच्या कारणामुळे विरोध दर्शवला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा यावर्षी खंडित होणार आहे. त्याचप्रमाणे बराक ओबामा
राजपथवर ज्या ठिकाणी बसून संचलनाची पाहणी करतील, त्याठिकाणी बुलेटप्रुफ मंडप राहणार आहे. बराक ओबामा यांना जवळपास दोन तास राजपथवर उघड्या आकाशाखाली बसू द्यायलाही अमेरिकेच्या सुरक्षा अधिकार्‍यांचा विरोध होता. त्यामुळे हा संपूर्ण परिसर नो फ्लाय झोन करण्याची मागणीही अमेरिकेने केली होती. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दरवर्षी विमानाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली जातात, ती यावर्षी होतील की नाही, अशी शंका निर्माण झाली होती. मात्र ही प्रात्यक्षिके सादर करणारी विमाने वगळता अन्य विमानांच्या उड्डाणावर या काळात बंदी राहणार आहे. ५०० किमीच्या आकाशात यावेळी कोणतीही विमाने उडू शकणार नाहीत. तशी सूचना सर्व विमानतळांना देण्यात आली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19822

Posted by on Jan 20 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (2209 of 2453 articles)


पुणे, [१९ जानेवारी] - सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. आर. के. ...

×