Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » कम्युनिस्ट नेते ए.बी. बर्धन कालवश

कम्युनिस्ट नेते ए.बी. बर्धन कालवश

=सोमवारी अंत्यसंस्कार=
a b bardhanनवी दिल्ली, [२ जानेवारी] – आपले संपूर्ण आयुष्य पक्षासाठी आणि कामगारांच्या कल्याणासाठी समर्पित करणारे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे अध्वर्यू अर्धेन्दूभूषण उपाख्य भाई बर्धन यांचे शनिवार २ रोजी येथील जी. बी. पंत रुग्णालयात उपचारादरम्यान रात्री ८.३० वाजता निधन झाले. मृत्युसमयी ते ९२ वर्षांचे होते.
इस्पितळात त्यांची प्राणज्योत मालवली तेव्हा त्यांची मुलगी अल्का बरूआ, मुलगा प्रा. अशोक बर्धन उपस्थित होते. त्यांच्या पत्नी पद्मा या नागपूर विद्यापीठात प्रोफेसर होत्या. त्यांचे १९८६ साली निधन झाल्यानंतर बर्धन भाकपाच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयातच निवासाला होते.
पक्षाचे राष्ट्रीय सचिव डी. राजा यांनी सांगितले की, सात डिसेंबर रोजी बर्धन यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचाराला ते प्रतिसादही देत होते. शुक्रवारी त्यांचे व्हेंटिलेटर काढल्यानंतर ते सामान्यपणे श्‍वासोश्‍वासही घेत होते. पण शनिवारी अचानक त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांची प्रकृती नाजूक झाली होती. अखेर रात्री साडेआठ वाजता त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.
दिल्लीतील अजॉय भवनमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. सोमवार ४ जानेवारी रोजी दिल्लीस्थित निगमबोध घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातच नव्हे तर देशात कामगार संघटनेसह डाव्या राजकारणाचे एक प्रमुख आधारस्तंभ राहिलेले अर्धेन्दूभूषण बर्धन १९५७ मध्ये नागपुरातून अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेवर निवडून गेले होते. १९६७ आणि १९८० च्या लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदार संघात मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता. नंतर भारतातील सर्वात जुन्या ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस (आयटक) या कामगार संघटनेचे ते महासचिव झाले. १९९० च्या दशकात ते दिल्लीतील राजकारणात आले व भाकपाचे उपसचिव बनले. नंतर १९९६ मध्ये त्यांनी इन्द्रजित गुप्ता यांच्या जागी पक्षाचे महासचिव म्हणून जबाबदारी स्वीकारली.
अल्पपरिचय
मूळ बांगलादेशमधील बरिसाल येथे २५ सप्टेंबर १९२४ रोजी जन्मलेले भाई बर्धन एक झुंजार कामगार नेते म्हणून लोकप्रिय होते. डाव्या विचारसरणीशी त्यांची बांधिलकी असली तरी आपल्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांची इतरही पक्षांतील नेत्यांशी जवळीक होती, मित्रत्वाचे घनिष्ठ संबंध होते. भारतीय राजकारणातील एक अनुभवी व ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना सर्वच पक्षात मान होता. १९९० पासून ते दिल्लीच्या राजकारणात सक्रिय झाले. आधी त्यांच्याकडे उपसचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. १९९६ साली भाकपाचे महासचिवपद बर्धन यांच्याकडे सोपविले गेले होते.
शोकसंवेदना
बर्धन यांच्या निधनाने देशातील डाव्या आघाडीच्या राजकारणाला मोठा धक्का बसला असून कामगार, गरीब व गरजूंचे नेते म्हणून ते सदैव स्मरणात राहतील. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली, अशी शोकसंवेदना गृहमंत्री राजनाथसिंह यांनी ट्विटरवरून व्यक्त केली आहे.
बर्धन यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद असल्याचे ट्विट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.
लाल सलाम, कॉम्रेड बर्धन. आपली बुद्धिमत्ता, अनुभव व मार्गदर्शन सदैव स्मरणात राहील. भारतीय क्रांतीला पुढे नेण्याचा संकल्प करणे हीच आपल्याला खरी श्रद्धांजली ठरेल, असे ट्विट माकपाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26383

Posted by on Jan 3 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (948 of 2453 articles)


=सरकारला मिळणार ४४०० कोटींचा महसूल, पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कुठलीही वाढ नाही= नवी दिल्ली, [२ जानेवारी] - केंद्र सरकारने आज शनिवारी पेट्रोल ...

×