Home » ठळक बातम्या, विदर्भ » कष्टकरी पंतप्रधान हा संदेश जनतेत गेलाय्

कष्टकरी पंतप्रधान हा संदेश जनतेत गेलाय्

=भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस पी. मुरलीधर राव यांचे प्रतिपादन=
नागपूर, [२६ ऑगस्ट] – सरकारमध्ये भाजपा कुठेच दिसत नाही केवळ मोदीच काम करताना दिसतात, तीन महिने उलटूनही केंद्र सरकार महागाईवर लगाम आणण्यात अपयशी ठरत आहे, जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही कमी होताना दिसत नाहीत, काळा पैसा परत आणण्याच्या संदर्भातही अजून सरकारने कुठलीही ठोस पावले उचललेली नाहीत, राज्यपाल नियुक्त्यांच्या संदर्भात सरकार द्वेषभावनेने वागत आहे, असे कितीही आरोप विरोधकांनी विशेषतः कॉंग्रेस पक्षाने लावले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्रीचा दिवस करून काम करताहेत हा संदेश जनतेत गेला असून, तीच राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी जमेची बाजू असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस पी. मुरलीधर राव यांनी येथे केले. नागपूर दौर्‍यावर आले असता त्यांनी तरुण भारत कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन संपादकीय सहकार्‍यांशी मनमोकळा संवाद साधला.
बिहारच्या पोटनिवडणुकीतील निकालांबाबत मोदींच्या नेतृत्वाविरुद्धचा कौल अशी कितीही ओरड मीडियासह लालू-नितीश यांनी केली असली तरी लोकसभा निवडणुकीतील मुद्दे आणि राज्यातील परिस्थिती यात फरक आहे. स्थानिक मुद्दे वेगळे असतात आणि जनतादेखील भिन्न विचार करून मतदान करते. तसे पाहिले तर नरेंद्र मोदी हे कधीच माध्यमांचे मित्र नव्हते. गेल्या १०-१२ वर्षांपासून सातत्याने मोदींविरुद्ध दुष्प्रचार सुरू असून, केंद्रात झालेला त्यांचा विजय पचविणे माध्यमांना अजूनही जड जात आहे, हे त्यांच्या कोल्हेकुईचे खरे कारण आहे. म्हणूनच बिहारचा मुद्दा मोदींशी जोडला जाणे पूर्णतः चुकीचे आहे, ही बाब मुरलीधऱ राव यांनी अधोरेखित केली.
लोकांना पारदर्शिता आणि जबाबदारीचे निर्वहन हवे आहे. काळा पैसा परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याची त्यांची सरकारकडून अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे उद्योगांच्या म्हणजेच अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनाची त्यांची अपेक्षा आहे. ही सारी कामे सुरू झाली आहेत. तरीदेखील भाजपाच्या नेतृत्वाबाबत प्रश्‍न उपस्थित करण्याची विरोधकांची खोड जाणार नाही, याकडे मुरलीधर राव यांनी लक्ष वेधले.
लोकांना सरकारच्या कामाचे परिणाम दिसू लागले आहेत. केंद्रीय सचिवालयातील बदल तर कुणीच नाकारू शकत नाहीत. परराष्ट्र धोरणातील फरकही लोकांच्या नजरेत भरला आहे. पाकिस्तानसोबतचा वार्तालाप थांबविण्याचा सकारात्मक संदेश जनतेत गेला आहे. एकाचवेळी फुटीरवाद्यांशी आणि पाकिस्तानशी चर्चा आम्हाला अमान्य आहे. सार्कबाबतचे आमचे धोरणे सौहार्दाचे असून डब्ल्यूटीओबाबतही आम्ही देशहितैषी भूमिका घेतलेली आहे, असे मुरलीधर राव म्हणाले.
मोदींचे १५ ऑगस्टचे भाषण त्यांचे व्यक्तित्त्व निर्धारित करणारे होते. देशाला उत्पादकतेचे आगार बनवण्याचा त्यांचा संकल्प जनतेने उचलून धऱला. सफाईचा संदेशही जनतेच्या मनावर बिंबला. संसदेतील विरोधी पक्ष नेतेपदाचा मुद्दा खरे तर कॉंग्रेेसने उपस्थितच करायला नको. सारे काही घटनेच्या चौकटीत राहून होत आहे. राज्यपालांच्या नियुक्त्या आणि त्यांच्या बदल्यांसंदर्भातील त्यांची भूमिका म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डॉंटे’ या सारखी असल्याचेही मुरलीधऱ राव म्हणाले.
जनुकीय विकसित बियाणांची उपयुक्तता, त्यांचे होणारे दुष्परिणाम आणि या बियाणांच्या आग्रहामागचा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा उद्देश याबाबत जोवर पूर्ण खात्री होत नाही, तोवर केंद्र सरकार याबाबतचा अंतिम निर्णय घेणार नाही, असेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात स्पष्ट केले. या विषयावर अजूनही शास्त्रज्ञांकडून आंतरराष्ट्रीय आणि देशाच्या पातळीवर विरोधाभासी मते व्यक्त होत आहेत, याकडे गांभीर्याने पाहिले जाण्याची गरजही त्यांनी प्रतिपादित केली.
महाराष्ट्रातील निवडणुकीत विजय मिळविणे हीच भाजपाची एकमेव स्ट्रॅटेजी राहणार आहे. राज्यसभेत आम्हाला बहुमत नाही. त्यामुळे आमची तेथे कोंडी केली जातेय्. ती दूर करण्यासाठीच उमेदवारांची आणि नेतृत्वाची निवड तसेच संघटनात्मक पातळीवरील प्रश्‍न, विजय हा एकमेव निकष ठेवून हातळली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मोदींचे यश हे प्रत्येक राष्ट्रवादी नागरिकासाठी महत्वाचे असून, देशात प्रथमच लांगुलचालनाची नीती हद्दपार झालेली आहे, याकडेही मुरलीधर राव यांनी लक्ष वेधले.
तभाचे प्रबंध संचालक विश्वास पाठक यांनी मुरलीधर राव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी स्वदेशी जागरण मंचचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य योगानंद काळे, श्रीकांत देशपांडे, कार्यकारी संपादक गजानन निमदेव, मुख्य कार्यकारी अधिकारी केतन पाठक, सहाय्यक संपादक श्यामकांत जहागीरदार, सहाय्यक संपादक चारुदत्त कहू आणि सहाय्यक संपादक सुनील कुहीकर उपस्थित होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=16036

Posted by on Aug 26 2014. Filed under ठळक बातम्या, विदर्भ. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, विदर्भ (2376 of 2455 articles)


=‘ओळख विदर्भातील संतांची’ स्पर्धेचा देखणा पारितोषिक वितरण समारंभ= नागपूर, [२४ ऑगस्ट] - ‘आज आपल्या हिंदू समाजाचे अस्तित्व कायम टिकून राहिले ...

×