Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » काही लोकांचे फक्त वयच वाढले

काही लोकांचे फक्त वयच वाढले

=पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात=
Narendra modi-lok-sabha_16नवी दिल्ली, [३ मार्च] – काही लोकांचे वय वाढते, पण त्यासोबत बुद्धी वाढत नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी नाव न घेता कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. देशाचे व्यापक हित डोळ्यासमोर ठेवून विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवत महत्त्वाची विधेयके पारित करण्यासाठी खांद्याला खांदा लावून सहकार्य करण्याचे आवाहनही मोदी यांनी केले.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदेत केलेल्या अभिभाषणावर लोकसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर जबरदस्त शरसंधान केले. राहुल गांधी यांनी बुधवारी केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी आणि भाजपा सरकारच्या कामगिरीवर सडकून टीका केली होती. त्याचा मोदी यांनी आपल्या भाषणात खरपूस समाचार घेतला. मी नवीन आहे, पण तुम्ही अनुभवी आहात. सुधारणेसाठी मला तुमची मदत आणि मार्गदर्शनाची गरज आहे, असे मोदी यांनी म्हटले. देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे असणारे जीएसटीसारखे विधेयक कॉंग्रेसने जाणीवपूर्वक अडवल्याचा आरोपही मोदी यांनी केला.
एखादी गोष्ट काही लोकांना उशिरा समजते, तर काही लोकांना ती समजतच नाही, असे स्पष्ट करत मोदी म्हणाले की, त्यामुळेच असे लोक मग कोणत्याही गोष्टीचा विरोध करतात. मोदी यांनी हे सांगताना राहुल गांधी यांचे नाव घेतले नाही, मात्र त्यांचा इशारा कोणाकडे आहे, हे स्पष्टपणे जाणवत होते. माझा सदरा जास्त पांढरा आहे की, तुझा अशासाठी संसदेचे सभागृह नाही, असेही ते म्हणाले. माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी संसदेतील कामकाज चालण्याबाबत वेळोवेळी केलेल्या विधानांचा मोदी यांनी आपल्या भाषणात समर्पक उल्लेख केला. मोदी यांचे घणाघाती भाषण सुरू असताना सभागृहात उपस्थित सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अन्य कॉंग्रेस नेत्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. मोदींच्या वाग्बाणांना सामोरे जाण्याचे धैर्यही कॉंग्रेसमध्ये उरले नव्हते. त्यामुळे सभागृहातून बाहेर पडण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी केला, पण भाजपा सदस्यांनी तो हाणून पाडला. मोदी यांच्या भाषणाला भाजपा सदस्य वेळोवेळी बाके वाजवून दाद देत होते, सभागृहात अनेक वेळा हास्याचे कारंजेही उडाले.
सभागृहाचे कामकाज चालले पाहिजे, पण सरकार आणि सरकारच्या कार्यक्रमांना विरोध आहे, म्हणून सभागृहाचे कामकाज होऊ दिले जात नाही, असे नाही तर आपल्या कमीपणाच्या भावनेमुळे कामकाजात व्यत्यय आणला जातो. कारण सभागृहाचे कामकाज झाले, तर आपल्याला बोलावे लागेल, असे स्पष्ट करत मोदी म्हणाले की, संसदेत अनेक तेजस्वी आणि बुद्धिमान खासदार आहेत. या खासदारांना बोलायची संधी दिली तर आपले काय होईल, अशी भीती काहींना वाटते. त्यामुळेच विरोधी पक्षात कोणी ताकदवान, प्रभावी नेता होऊच नये, असा प्रयत्न केला जातो. नव्या तरुण खासदारांमधील प्रतिभेचा देशाला परिचय होऊ दिला जात नाही. हीच कमीपणाची भावना आहे. त्यामुळेच गेल्या दोन अधिवेशनात अशा तरुण खासदारांची भाषणे ऐकायला मिळाली नाही. या पार्श्‍वभूमीवर संसदेच्या अधिवेशनातील एखादा आठवडा असा असला पाहिजे, ज्यात फक्त तरुण आणि पहिल्यांदाच निवडून आलेले बोलू शकतील. महिलादिनी फक्त महिला खासदारांनाच बोलू दिले पाहिजे, असेही मोदी म्हणाले.
मोदी यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खडगे म्हणाले की, अशीप्रकारे कोणाची खिल्ली उडवणे योग्य नाही. यावर प्रत्युत्तर देत मोदी म्हणाले की, मग मेक इन इंडियाची खिल्ली का उडवली गेली. या योजनेत काही त्रुटी असतील, तर त्याबाबत सूचना केल्या पाहिजे. मेक इन इंडिया यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. तुम्ही आमच्यापेक्षा चांगले काम कसे करता, म्हणून कॉंग्रेस आम्हाला प्रत्येक मुद्यावर विरोध करत आहे, असे मोदी म्हणाले.
तासाभराच्या आपल्या भाषणात मोदींनी आपल्या सरकारने सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांचा सविस्तर आढावा घेतला.
देशातील ४५ जिल्ह्यांमध्ये कृषी पीकविमा योजनेसोबत प्रायोगिक तत्त्वावर सात नव्या विमा योजना शेतकर्‍यांना देण्याची घोषणाही मोदी यांनी यावेळी केली. अन्नसुरक्षा योजनेचे पुरस्कर्ते असल्याचा आव कॉंग्रेस आणते, मग केरळ, मिझोरम, आणि अरुणाचल सारख्या कॉंग्रेसशासित राज्यांमध्ये ही योजना का राबवण्यात आली नाही, असा प्रश्‍न मोदी यांनी उपस्थित केला.
ज्ेव्हा तुमच्याजवळ बोलण्यासारखे काहीच नसते, तेव्हा गुजरातचा मुद्दा उपस्थित केला जातो, हे तुमच्या वैचारिक दिवाळखोरीचेच लक्षण आहे, असा आरोप मोदी यांनी केला. संसदेत कामकाज होत नसल्याबद्दल चिंता व्यक्त करत मोदी म्हणाले की, यामुळे सत्ताधारी पक्षाचेच नव्हे, तर विरोधी पक्षाचेच जास्त नुकसान होत आहे. त्यांना जनतेच्या जिव्हाळ्याचे मुद्दे सभागृहात मांडताच येत नाही. कितीही नाराजी असली तरी हेच ते सभागृह आहे, जिथे आपल्या भावना मोकळेपणाने आणि तर्कशुद्धपणे मांडता येतात, सरकारवर प्रश्‍नांची सरबत्ती करता येते आणि सरकारलाही याची उत्तरे द्यावी लागतात, आपली बाजू मांडावी लागते. आपला बचाव करावा लागतो. चर्चा करताना कोणाची गय करण्याचे, त्याला माफ करण्याचे कारण नाही. मात्र, हे करताना सभागृहाची प्रतिष्ठा कायम राहील याची काळजी घेतली पाहिजे. कारण आपण सभागृहाची प्रतिष्ठा राखली तरच आणखी जास्त प्रभावीपणे आपली बाजू मांडता येईल. असे मी नाही, तर राजीव गांधी यांनी म्हटले होते, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
गेल्या १४ वर्षांपासून विरोधकांच्या टीकेचा मला सामना करावा लागतो, आरोप सहन करावे लागतात, उपदेश ऐकावे लागतात, असे स्पष्ट करत मोदी म्हणाले की, आता मला याची सवय झाली, त्यामुळे त्याचे काही वाटत नाही.
२७ सप्टेंबर २०१३ ला मनमोहनसिंग सरकारने आणलेला अध्यादेश पत्रपरिषदेत टराटरा फाडला होता. ज्येष्ठांचा अशा पद्धतीने केलेला अपमान देशवासी विसरणार नाहीत, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ करताना लखनौला आयोजित प्रचारसभेत समाजवादी पक्षाचा निवडणूक जाहीरनामा राहुल गांधी यांनी फाडला. कदाचित आम्हाला मुलायमसिंह यादव आवडत नसतील, पण ते ज्येष्ठ नेते आहेत, याचे भान ठेवले पाहिजे. उपदेश देणारे खूप आहेत, पण त्या उपदेशाप्रमाणे चालणारे खूपच कमी, असा टोला मोदींनी राहुल गांधी यांना लगावला.
‘भिकेचा कटोरा हाती घेऊन आम्ही निघालो, असे आम्हीच जोरजोरात म्हणत असू, तर दुसरे आणखी जोरजोरात म्हणतील’, असे मी नाही तर इंदिरा गांधी यांनी १९७४ मध्ये आयपी कॉलेजमध्ये म्हटले होते, असे मोदी यांनी म्हणताच कॉंग्रेस सदस्यांचे चेहरे उतरले.
कार्यपालिकेला आणखी जबाबदार बनवण्याची आवश्यकता प्रतिपादित करत मोदी म्हणाले की, मात्र देशाला नोकरशाहीच्या भरवशावर सोडता येणार नाही, तर देशाच्या विकासासाठी १२५ कोटी लोकांनाही विश्‍वासात घ्यावे लागेल.
वृत्तपत्रातील हेडलाईन्ससाठी तूतू..मैमै करणे योग्य नाही. या देशातील लोकांच्या आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत, त्यांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण केल्या पाहिजे.
वाजपेयींच्या कार्यकाळात सुरू झालेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा फायदा गरीब राज्यांना मिळाला, असे स्पष्ट करत मोदी म्हणाले की, केंद्राचा पैसा मनरेगालाही मिळाला आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेलाही. पण, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेला मिळालेल्या पैशातून देशाच्या विकासाचा राजमार्ग खुला झाला. त्यातून पायाभूत संपत्तीचे निर्माण झाले.
राष्ट्रपतींचे तरी ऐका
सभागृह हे चर्चा, वादविवाद करण्यासाठी असते, असे राष्ट्रपती आपल्या अभिभाषणात म्हणाले होते. सभागृहाचे कामकाज कसे चालावे, याबाबत राष्ट्रपतींनी काही अपेक्षा व्यक्त केल्या. त्यांचा सल्ला आम्ही मानला पाहिजे. सभागृहाचे कामकाज चालू दिले पाहिजे. सभागृहातील चर्चेत अडथळा आणला तर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो, असे मोदी म्हणाले.
संसदेच्या कामकाजात अडथळा आणणे म्हणजे संसदीय कामकाजावरचा विश्‍वास कमी करण्यासारखे आहे, या लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चटर्जी यांच्या विधानाचे स्मरण करून देत मोदी म्हणाले की, सदस्यांनी आपल्या वागणुकीतून सभागृहाची प्रतिष्ठा कायम राखली पाहिली, असे मी नाही तर राजीव गांधी यांनी म्हटले होते.
मनरेगा यशाचे नव्हे, अपयशाचे स्मारक
कॉंग्रेस सरकारच्या काळातील मनरेगावर जोरदार हल्ला चढवताना मोदी म्हणाले की, मनरेगा हे आमच्या यशाचे नव्हे, तर अपयशाचे स्मारक आहे. देशातील गरिबी आम्हाला दूर करता आली नाही. त्यामुळे गरिबांसाठी हे योजना सुरू करण्यात आली. खड्डे खोदून त्यातील माती गरिबांना बाहेर काढावी लागली, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, देशातील गरिबी दूर करण्यात आम्हाला यश आले असते, तर मनरेगाची गरजच भासली नसती.
अनेक राज्यांत मनरेगासाठी नियमच बनवण्यात आले नाही, असा आरोप करत मोदी म्हणाले की, ज्या राज्यात गरिबी कमी प्रमाणात आहे, त्याठिकाणी मनरेगाचा उपयोग मोठ्या प्रमाणात झाला, पण ज्या राज्यात खरोखर गरिबी आहे, तिथे मनरेगा पोहोचलीच नाही. मनरेगा योजनेत आम्ही अनेक सुधारणा केल्या आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27001

Posted by on Mar 4 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (776 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२ मार्च] - एअरसेल-मॅक्सिस प्रकरणातील भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून माजी केंद्रीय मंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम् आणि त्यांचा ...

×