Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » केजरीवालांनी घेतली राजनाथ, राष्ट्रपती, नायडूंची भेट

केजरीवालांनी घेतली राजनाथ, राष्ट्रपती, नायडूंची भेट

=दिल्लीला मागितला राज्याचा दर्जा, केजरीवाल आज पंतप्रधानांना भेटणार=
kejri meets rajnathनवी दिल्ली, [११ फेब्रुवारी] – दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविणारे आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज बुधवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि केंद्रीय नगर विकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली. राजनाथसिंह आणि नायडू यांच्या भेटीत केजरीवाल यांनी राजधानीतील अनधिकृत कॉलन्यांसोबतच दिल्लीला राज्याचा दर्जा मिळविण्याच्या मुद्यांवर चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत आप नेते मनीष सिसोदिया हेदेखील उपस्थित होते.
केजरीवाल यांनी सकाळी सर्वप्रथम नायडू यांची भेट घेतली आणि चार महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. यातील पहिला मुद्दा म्हणजे, ज्या गरिबांना केंद्र सरकारच्या मदतीची आणि नुकसान भरपाईची नितांत गरज आहे, त्यांना ही मदत तातडीने पुरविण्यात यावी, दिल्लीतील बेकायदेशीर लोकवस्त्यांचा मुद्दाही प्राधान्याने चर्चेत होता, अशी माहिती सिसोदिया यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
दिल्लीत आणखी जास्त संख्येत शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि बगिचे आवश्यक आहे आणि त्यासाठी जमिनीची गरज आहे. दिल्ली विकास प्राधिकरणाच्या ताब्यात ज्या जमिनी आहेत, त्या आवश्यक सुविधांसाठी सरकारला उपलब्ध करून देण्यात याव्या, अशी विनंती आम्ही नायडू यांना केली. त्यानंतर दिल्लीला वेगळ्या राज्याचा दर्जा मिळावा, अशी मागणीही आम्ही त्यांना केली, असेही सिसोदिया यांनी सांगितले.
यानंतर केजरीवाल आणि सिसोदिया गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या भेटीला गेले. दिल्लीला वेगळ्या राज्याचा दर्जा मिळण्यासोबतच विविध संस्थांमध्ये योग्य समन्वय असण्याच्या गरजेवर या भेटीत भर देण्यात आला. दिल्लीच्या विकासाकरिता आम्हाला केंद्राच्या सहकार्याची गरज आहे. या मार्गात राजकीय मतभेद यायला नको, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. यावेळी केजरीवाल यांनी राजनाथसिंह यांनाही आपल्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले.
केंद्रात भाजपा ज्याप्रमाणे स्पष्ट बहुमतात आहे, त्याचप्रमाणे दिल्लीत आप स्पष्ट बहुमतात आहे. आमच्याकडे बहुमत असल्याने दिल्लीकरांना दिलेल्या वचनांची पूर्तता करण्यात कुठलीच अडचण जायला नको. आम्ही आपल्या परीने योग्य ते प्रयत्न करणार आहोत, असे सिसोदिया म्हणाले. त्यानंतर सायंकाळी केजरीवाल व सिसोदिया यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचीही भेट घेतली.
केजरीवाल आज पंतप्रधानांना भेटणार
दिल्लीत ऐतिहासिक विजय मिळविणारे आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल गुरुवार, १२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. दिल्लीतील निकाल जाहीर झाल्यानंतर स्वत: पंतप्रधानांनी केजरीवालांना फोन करून अभिनंदन केले होते आणि त्यांना चहाचे निमंत्रणही दिले होते.
केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांनी बुधवारी गृहमंत्री राजनाथसिंह, नगर विकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. याच काळात केजरीवाल यांनी पंतप्रधानांचे आभार मानताना भेटीची वेळही मागितली होती. पंतप्रधानांनी त्यांना गुरुवारी सकाळी साडेदहाची वेळ दिली आहे. पंतप्रधानांसोबत चहा घेतानाच ते त्यांना आपल्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रणही देणार आहेत. दिल्लीच्या विकासाशी संबंधित विविध मुद्यांवर आपण पंतप्रधानांसोबत चर्चा करणार असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
दिल्लीच्या विकासासाठी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारचे सहकार्य आम्हाला आवश्यक आहे. निवडणुका संपलेल्या आहेत, त्यामुळे आता आमच्या मनात कुणाविषयी कुठल्याच गैरभावना नाहीत. केंद्र आणि दिल्ली सरकारच्या सहकार्यानेच विकास शक्य होणार आहे, असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20498

Posted by on Feb 12 2015. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (2074 of 2452 articles)


=दिल्लीत भाजपा आणि कॉंग्रेसला दणका, १४ ला केजरीवालांचा रामलीलावर शपथविधी= नवी दिल्ली, [१० फेब्रुवारी] - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली ...

×