Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » कॉंग्रेसनेच आत्मपरीक्षण करावे : रविशंकर प्रसाद

कॉंग्रेसनेच आत्मपरीक्षण करावे : रविशंकर प्रसाद

►अनेक पंतप्रधानांचा अपमान केला,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, ९ फेब्रुवारी –
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचा अपमान करण्यात आला, असा आरोप करण्यापूर्वी कॉंग्रेसने आपण या आधी किती पंतप्रधानांचा अपमान केला, याबाबत आत्मपरीक्षण करावे आणि नंतर बोलावे, या शब्दात केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री रविशंकरप्रसाद यांनी आज कॉंग्रेसवर हल्ला चढवला. पंतप्रधान मोदी चुकीचे काहीच बोलले नाही, असे ते म्हणाले.
भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत रविशंकरप्रसाद यांनी कॉंग्रेसने आपल्या कार्यकाळात स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी किती पंतप्रधानांचा अपमान केला, याचा सविस्तर लेखाजोखा सादर केला. कॉंग्रेसने लालबहादूर शास्त्री, चौधरी चरणसिंग, चंद्रशेखर, इंद्रकुमार गुजराल, विश्‍वनाथ प्रतापसिंह, पी. व्ही. नरसिंहराव या पंतप्रधानांचा अपमान केला, याकडे लक्ष वेधत रविशंकरप्रसाद म्हणाले की, गांधी घराण्याच्या बाहेरील नेता कॉंग्रेसमध्ये कधीच खपवून घेण्यात आला नाही. बाहेरच्या नेत्याचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घेण्याची आणि त्याची उपयोगिता संपल्यावर त्याला फेकून देण्याची कॉंग्रेसची संस्कृती आहे.
नरसिंहराव यांची तर कॉंग्रेसने त्यांच्या मृत्यूनंतर जेवढी विटंबना केली, ती अक्षम्य आहे. नरसिंहराव डॉ. मनमोहनसिंग यांचे राजकीय गुरू होते, पण पंतप्रधान असतांनाही ते आपल्या गुरूची मृत्यूनंतर होत असलेली विटंबना थांबवू शकले नाही. मृत्यूनंतर नरसिंहराव यांचे पार्थिव कॉंग्रेस मुख्यालयात आणू दिले नाही, एवढेच नाही तर दिल्लीत अंत्यसंस्काराची परवानगी नाकारण्यात आली, असा आरोप रविशंकरप्रसाद यांनी केला.
डॉ. मनमोहनसिंग अमेरिकेचे दौर्‍यावर असतांना कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यादेश फाडून फेकत नॉन्सेन्स या शब्दात त्यांची अवहेलना केली होती, याकडे लक्ष वेधत रविशंकरप्रसाद म्हणाले की, नोटबंदीच्या निर्णयावर डॉ. मनमोहनसिंग यांनी ज्या शब्दात टीका केली, ते त्यांचे शब्द राहूच शकत नाही. दुसर्‍यांच्या शब्दांचा उपयोग करण्यास त्यांना बाध्य करण्यात आले. कधी कधी तर मला डॉ. मनमोहनसिंग यांची कीव येते, असे ते म्हणाले.
डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर टीका करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच चुकीचे बोलले नाही, संसदेत भाषण करतांना व्यंग, उपरोध,उपहास, शाब्दिक कोट्या केल्या जातात, ती संसदीय परंपरा आहे, असे स्पष्ट करत रविशंकरप्रसाद म्हणाले की, कॉंग्रेसने तर याआधी पंतप्रधान मोदी यांच्यासाठी अतिशय खालच्या भाषेचा उपयोग केला. मौत के सौदागर, खून की दलाली असे शब्द वापरण्यात आले. कॉंग्रेस नेत्यांकडून यापेक्षा वेगळी अपेक्षाही करता येत नाही.
संपुआच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व घोटाळ्यांच्या जबाबदारीतून डॉ. मनमोहनसिंग सुटू शकत नाही, असे ते म्हणाले. गांधी घराण्याने डॉ. मनमोहनसिंग यांच्या तथाकथित विश्‍वसनीयतेचा आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी उपयोग केला, असा आरोप करत रविशंकरप्रसाद म्हणाले की, कॉंग्रेस हा आता राजकीय पक्ष नाही, तेथे कोणतीही विचारधारा नाही,  तर गांधी घराण्याची आरती ओवाळणार्‍यांचा पक्ष झाला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=34699

Posted by on Feb 10 2017. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (59 of 2453 articles)


►अर्थसंकल्पावरील चर्चेला जेटलींचे उत्तर, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, ९ फेब्रुवारी - जागतिक पातळीवर मंदीची परिस्थिती असतांनाही त्या परिस्थितीचा भारतावर परिणाम ...

×