Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » गरिबी दूर करणे हेच आमचे ध्येय : नरेंद्र मोदी

गरिबी दूर करणे हेच आमचे ध्येय : नरेंद्र मोदी

=संयुक्त राष्ट्रसंघात निनादला भारतीय संस्कृतीचा जयघोष=
narendra modi in unoन्यूयॉर्क, [२५ सप्टेंबर] – जगात शांतता नांदण्यासाठी, न्यायपूर्ण विकास होण्यासाठी गरिबी दूर होण्याची नितांत आवश्यकता असून जगातील सर्व देशांनी त्यासाठी एकत्रित येऊन प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी केले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत भाषण करताना ते बोलत होते. पंतप्रधानांनी यावेळी भारतीय परंपरा व संस्कृतीचा गौरवपूर्ण उल्लेख करून संयुक्त राष्ट्रसंघाचे व भारताचे ध्वेय एक़च असल्याचे सांगितले. आपल्या अर्धा तासाच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणाच्या मुद्यांवर भाष्य केले. संयुक्त राष्ट्रसंघाचा अजेंडा व्यापक असल्याचे सांगून हा अजेंडा सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणाच्या विषयावर आमची परिपक्वताच दर्शवितो, असे ते म्हणाले. मोदींनी ख्यातनाम विचारवंत पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. शेवटच्या माणसापयर्र्ंत विकासाचे लाभ पोहोचलेच पाहिजेत, असे दीनदयालजींना प्रकर्षाने वाटायचे. याबाबतीत दीनदयालजी आणि युनोचे विचार एकसारखेच असल्याचे मोदी यांनी सांगितले. आम्ही सर्वजण गरिबी हटविण्याचे स्वप्न पाहात आहोत. जगात १.३ बिलीयन लोक गरिबीचे जीवन कंठत आहेत. जगात शांतता नांदायची असेल तर गरिबी उन्मूलन आणि न्यायपूर्ण विकास हेच आमचे ध्वेय असले पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले. भारताने विकासाचा जो मार्ग पत्करला आहे त्याच्यात आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या अजेंड्यात समानता आहे, ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. आम्ही गरिबांना सशक्त बनवून गरिबी ाटविण्याचा मार्ग निवडला आहे. गरिबांचा कौशल्य विकास करण्याचे काम सुरू असून जनधन योजनेअंतर्गत १८० मिलियन बँक खाती उघडण्यात आली आहेत, याकडे त्यांनी जगाचे लक्ष वेधले. गरिबांना मिळणारा लाभ थेट त्यांच्या खात्यात जमा होत असून विम्याचा लाभही थेट खात्यात जमा होत असल्याचे त्यांनी सांगितले.
विश्‍वकल्याण हेच ध्वेय असलेल्या भारतीय संस्कृतीचा आवर्जून उल्लेख करून पंतप्रधान मोदी म्हणाले, आमच्या भारतात पृथ्वीला माता असे संबोधतात. पृथ्वी आमची माता आहे आणि आम्ही तिचे पुत्र आहोत, असे आमची संस्कृती सांगते. आम्ही संपूर्ण विश्‍वालाच एक कुटुंब मानतो. उदारबुद्धी असलेले लोक संपूर्ण विश्‍वालाच आपले कुटुंब मानते. त्यामुळे आम्ही सर्वांना सोबत घेऊन विकासाची प्रक्रिया राबवत आहोत. आमची योजना महत्त्वाकांक्षी असून धोरण निर्धारणासाठी विविध पर्यायांची आवश्यकता असते. पर्यावरण रक्षणाचा संकल्प करण्याची आज गरज असून आम्हाला वैश्‍विक जनभागीदारी करून नवनिर्माण केले पाहिजे, असेही मोदी यांनी सांगितले. सर्व विकसित देशांना हवामान बदला (क्लायमेट चेंज) संदर्भात आपले आर्थिक योगदान करावे लागेल, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. आम्हाला अशा जगाची निर्मिती करावी लागेल जेथे सर्वजण स्वत:ला सुरक्षित आणि सुप्रतिष्ठित समजतील. संपूर्ण विश्‍वासाठी विकासाची गरज आहे, मात्र या वसुंधरेला सुंदर ठेवणेही आवश्यक आहे. आणि आम्ही ते करू शकू, हा मला पूर्ण विश्‍वास आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. सर्वे भवंतु सुखिन: या शांतिमंत्राने त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24054

Posted by on Sep 26 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1413 of 2458 articles)


सलग नवव्या वर्षी कायम राखले अव्वल स्थान -१८.९ अब्ज डॉलर्सची संपत्ती -फ्लिपकार्टच्या संस्थापकांचा देशातील १०० श्रीमंतांमध्ये समावेश सिंगापूर, [२४ ...

×