Home » ठळक बातम्या, नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय » ‘गाव तेथे संघशाखा’ उपक्रम राबविणार

‘गाव तेथे संघशाखा’ उपक्रम राबविणार

=केवळ घोषणा कामाच्या नाहीत – सरसंघचालक=
DR MOHAN BHAGWATकानपूर, [१५ फेब्रुवारी] – आज संपूर्ण समाज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. समाजाच्या या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संघाचा विस्तार करणे आवश्यक असून, गाव तेथे संघाची शाखा सुरू करण्याचा आमचा निर्धार आहे. हिंदू समाजाला संघटित करणे हेच संघाचे कार्य आहे. पण, केवळ भाषणबाजी करून हे कार्य पूर्ण होऊ शकणार नाही, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी रविवारी येथे केले.
देशातील हिंदू समाजाच्या रा. स्व. संघाकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. त्या पूर्ण करायच्या आहेत आणि त्यासाठी संघाचा विस्तार करावाच लागणार आहे, असे सरसंघचालकांनी राष्ट्र रक्षा संगमात बोलताना सांगितले.
‘‘हिंदूंना संघटित करणे, त्यांना निर्भय, आत्मनिर्भर आणि स्वावलंबी करणे, तसेच देशासाठी जगण्याची व मरण्याची तयारी ठेवणार्‍या हिंदू समाजाची निर्मिती करणे हे संघाचे कार्य आहे. पण, नुसत्या भाषणांनी हा उद्देश साध्य होणार नाही. त्यासाठी कृती करावी लागणार आहे… रा. स्व. संघाच्या शाखांचा काय अर्थ आहे? आपण तिथे एकत्र येतो आणि सर्वकाही विसरतो. आपल्यासमोर केवळ भगवा ध्वज असतो आणि तोच आपल्या गर्वाचे प्रतीक आहे,’’ असे सरसंघचालक म्हणाले.
शक्तिप्रदर्शन या शब्दातून वातावरण तापते. जेव्हा आम्ही असे कार्यक्रम आयोजित करतो, तेव्हा संघ आपल्या शक्तीचे प्रदर्शन करीत आहे, असे बोलले जाते. पण, ज्यांच्याजवळ शक्ती नसते, त्यांनाच शक्ती प्रदर्शन करण्याची गरज असते. आम्हाला त्याची गरजच नाही. आमचे स्वत:चेच बळ आहे आणि स्वबळावरच आम्ही पुढील वाटचाल करतो. हे आमचे ‘आत्मदर्शन’ आहे, असेही डॉ. भागवत यांनी स्पष्ट केले.
‘इतिहास साक्षी आहे… आपण कुणापेक्षाही मागे नव्हतो. पण मूठभर लोकांनी आपल्याला गुलाम बनविले. संविधान सभेच्या शेवटच्या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, आपला देश कुठल्याही बाबतीत मागे नाही. पण, काही स्वार्थी लोकांनी हा देश ब्रिटिशांच्या स्वाधीन केला. आपण जोपर्यंत बंधुभाव जोपासणार नाही, तोपर्यंत हा धोका कायम राहील,’ असा इशाराही त्यांनी दिला.
रा. स्व. संघाच्या विचारसरणीत नवीन असे काहीच नाही. नावीन्य केवळ संघाच्या आजच्या कार्यपद्धतीत आहे. आपला देश विविधतेने नटलेला आहे. भाषा, जात आणि प्रांत यांचा विचार न करता आम्ही सर्वच भारताला आपली माता समजतो आणि म्हणूनच आम्ही ‘भारत माता की जय’ असे अभिमानाने म्हणतो, असे सरसंघचालकांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20594

Posted by on Feb 16 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय (2062 of 2455 articles)


=मोदी सरकारविरोधात मुद्देच नाही= अहमदनगर, [१५ फेब्रुवारी] - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात कोणताही मुद्दा नसताना केवळ काही जुन्या सहकार्‍यांच्या आग्रहाखातर ...

×