Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » गोरक्षा लोकांना धमकावण्यासाठी नाही, सेवा करण्यासाठी : मोदी

गोरक्षा लोकांना धमकावण्यासाठी नाही, सेवा करण्यासाठी : मोदी

  •  ‘माय गव्हर्नमेंट डॉट इन’चा दुसरा वर्धापन दिन थाटात
  •  ‘टाऊन हॉल’ कार्यक्रमाचा शुभारंभ

narendra-modi-513नवी दिल्ली, [६ ऑगस्ट] – गोरक्षा ही लोकांना धमकावण्यासाठी नसते. गायींची मनापासून सेवा करावी लागते. त्यासाठी मनात गायींबद्दल प्रेम असावे लागते, अशा स्पष्ट शब्दात सध्याच्या गोरक्षकांच्या कारवायांबद्दल आपली तीव्र नाराजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. दिवसा गोरक्षेच्या नावाने आपली दुकानदारी चालवणार्‍या या गोरक्षकांचे रात्रीचे धंदे वेगळेच असतात, असा आरोप करत मोदी म्हणाले की, राज्य सरकारांनी अशा गोरक्षकांचा पर्दाफाश करावा, तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
‘माय गव्हर्नमेंट डॉट इन’ या वेबसाईटच्या दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त येथील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये आयोजित ‘टाऊन हॉल’ कार्यक्रमाचा शुभारंभ करतांना पंतप्रधान मोदी यांनी देशातील लोकांशी थेट संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पीएमओ मोबाईल ऍपचेही लोकार्पण करण्यात आले. देशाच्या विविध भागातील लोकांनी विचारलेल्या प्रश्‍नांना मोदी यांनी मनमोकळी उत्तरे देत आपल्या सरकारची भूमिका स्पष्ट केली.
गोरक्षकांना ४ गाईबद्दल खरोखरच प्रेम असेल तर त्यांनी प्लास्टिक खाण्यापासून गायींना वाचवावे, असे आवाहन करत मोदी म्हणाले की, जेवढ्या गाई कापल्या जात नाही, त्यापेक्षा जास्त प्लास्टिक खाऊन मरतात. आपल्या काळ्या धंद्यावर पांघरुण घालण्यासाठी काही लोक गोरक्षकाचे सोंग घेत असतात, त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे. अशा गोरक्षकांची मला प्रचंड चीड आहे. गुजरातमध्ये असतांना मी पशुमेळाव्याचे आयोजन करत होतो, आजारी पशुंवर उपचार करत होतो, याकडे मोदींनी लक्ष वेधले.
देशाच्या अर्थव्यवस्थेला ताकद देण्याची क्षमता कृषी क्षेत्रात आहे, पण त्यासाठी पांरपरिक पध्दतीच्या शेतीच्या मानसिकतेतून शेतकर्‍यांनी बाहेर आले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.
शेतकर्‍यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, तसे एकाच पिकांवर अवलबूंन राहण्यापेक्षा एकापेक्षा जास्त पीक घेण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन करत मोदी म्हणाले की, शेतकर्‍यांनी आपल्या शेतीचे तीन भाग करत एका भागात आपले मूळ पीक घ्यावे, दुसर्‍या भागात इमारती आणि फर्निचरसाठी लागणार्‍या लाकडांची झाडे लावावी, तर तिसर्‍या भागात पशुपालन करावे. यामुळे शेतकर्‍यांचा आर्थिक विकास होईल.
आज संपूर्ण जगात मंदीचे वातावरण आहे. लोकांची क्रयशक्ती कमी होत आहे, मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीतही भारतात आर्थिक विकासाचा दर ७.६ टक्के आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत आहे, हा आपल्या सर्वांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा विषय आहे, असे स्पष्ट करत मोदी म्हणाले की, सातत्याने ३० वर्ष आपला विकास दर ८ टक्के राहात असेल तर जगातील सर्व सुखसुविधा आपल्या देशातील लोकांनाही उपलब्ध झाल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण जगात भारत आघाडीवर राहील.
जशी स्थिती एखाद्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीची असते, तशीच स्थिती देशाच्याही अर्थव्यवस्थेची असते. उत्पनाचे स्रोत वाढल्यावर विकास कामांचा प्राधान्यक्रमही बदलत असतो, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले. देशाच्या तिजोरीत पैसा असेल तर विकासकामांना गती येईल, विकास कामांना गती आली तर त्यातून रोजगार वाढेल, परिणामी सगळ्यांना त्याचा फायदा होईल, असे मोदी म्हणाले.
विकासाच्या कामात सरकारचा हस्तक्षेप कमी झाला पाहिजे, तसेच लोकांचा सहभाग वाढला पाहिजे. स्वच्छ भारत अभियान हे लोकांच्या सहभागाचे अतिशय उत्तम उदाहरण आहे, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, राजकीय पक्षांचा जोर हा पहिली निवडणूक जिंकल्यावर दुसरी निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक ते निर्णय घेण्याकडे असतो. लोकांचाही जोर आम्ही तुम्हाला निवडून दिले, त्यामुळे आता तुम्हीच आमचा विकास करा, यावर असतो. एक पक्ष विकास करत नसेल तर लोक दुसर्‍या पक्षाला निवडून देतात. मात्र आपल्या जबाबदारीबद्दल लोक उदासीन असतात.
विकास आणि सुशासन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यामुळे त्यांच्यात संतुलित संबंध असला पाहिजे, असे आवाहन करत मोदी म्हणाले की, सुशासनामुळे लोकांच्या जीवनात परिवर्तन आल्याशिवाय राहणार नाही.
प्रत्येक गोष्टीसाठी आज पंतप्रधानांना जबाबदार धरले जाते, त्यांना उत्तर मागितले जाते, या प्रवृत्तीबद्दल नाराजी व्यक्त करत मोदी म्हणाले की, प्रत्येक जण मग त्या स्थानिक स्वराज्य संस्था असो वा राज्य सरकार, आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करतात. त्यातून अनेक समस्या उदभवतात. त्यामुळे ज्याच्याकडे जी जबाबदारी आहे, त्यालाच त्यासाठी उत्तरदायी धरले पाहिजे. त्यांच्याकडेच त्याचे उत्तर मागितले पाहिजे.
अनेक वेळा समस्यांचे मूळ हे सरकारमध्ये असते. सरकारच आपल्या वागणुकीने समस्या निर्माण करते, त्यामुळे सरकारने आपल्या वागणुकीत आणि कार्यपद्धतीत बदल केला पाहिजे, अशा कानपिचक्या देत मोदी म्हणाले की, जनतेच्या तक्रारींचे निराकरण करणारी सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज आहे. आज आपल्या देशात जनतेच्या तक्रारी ऐकणारी आणि त्याचे निराकरण करणारी कोणतीही यंत्रणा नाही.
स्मार्ट सिटीची योजना असली तरी ग्रामीण भागाच्या विकासासाठीही सरकार कटिबद्ध आहे, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, ग्रामीण भागात खूप ताकद आहे. त्यामुळे आम्ही गाव मरू देणार नाही. आत्मा गावांचा असावा आणि त्यात सुविधा शहरांच्या, अशी ग्रामीण भागाच्या विकासाबाबत आमची भूमिका आहे.
आरोग्याबाबत प्रत्येकजण दुसर्‍याला सल्ला देतो, स्वत: मात्र आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा रोग होणारच नाही या दृष्टीने सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे. कारण एकदा आजार घरात आल्यावर कुटुंबाची अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त होते. स्वच्छ भारत अभियानाचा मूळ उद्देशच आजार दूर करण्याचा आहे. पिण्याचे शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळाले तरी अर्ध्यापेक्षा जास्त आजार आपोआपच दूर होतील.
आरोग्य विम्याला प्रोत्साहन देण्याची सरकारची भूमिका आहे, हेल्थ इन्शुरन्ससोबत हेल्थ ऍश्युरन्सवरही आमचा भर असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29165

Posted by on Aug 7 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (136 of 2453 articles)


=लष्कर-ए-इस्लामची धमकी= श्रीनगर, [६ ऑगस्ट] - सुमारे अकरा महिने शांत राहिल्यानंतर लष्कर-ए-इस्लामने पुन्हा डोके वर काढले असून, खोरे रिकामे करा ...

×