Home » क्रीडा, ठळक बातम्या » गोलरक्षकच ठरले हिरो

गोलरक्षकच ठरले हिरो

रियो दी जानेरियो, [२ जुलै] – संपूर्ण जगभरातील क्रीडाप्रेमींना वेड लावणारी फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून, लवकरच उपांत्यपूर्व फेरीच्या लढती होणार आहेत. परंतु, स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सामन्यांवर नजर टाकली असता मोठे नाव असलेले स्टार स्ट्रायकर्स नव्हे तर गोलरक्षकच खरे हिरो ठरल्याचे ठळकपणे दिसून येते.
अर्जेंटिनाचा लियानेल मेस्सी आणि ब्राझीलचा युवा खेळाडू नेमार ही फुटबॉल जगतातील सुपरिचित नावे आहेत. परंतु, २०१४ च्या फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेत गुलिर्मो ओचोआ, ज्युलियो सेझार, टीम हॉवर्ड, किलोर नवास, अलिरजा हकिकी या गोलरक्षकांनी आपापल्या संघांसाठी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे त्यांना नवी ओळख मिळाली आहे. या विश्‍वचषक स्पर्धेदरम्यान गोलरक्षकांनी केलेल्या शानदार बचावाचे अनेक किस्से तयार झाले आहेत. मंगळवारी झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या अखेरच्या सामन्यात भलेही बेल्जियमने अमेरिकेचा पराभव केला असेल. परंतु, या सामन्याचा खरा नायक अमेरिकेचा गोलरक्षक टीम हॉवर्ड हाच ठरला. हॉवर्डने अनेकदा सुंदर बचाव करून बेल्जियमला गोल करण्याची संधी नाकारली. त्यामुळेच सामन्यानंतर बेल्जियमच्या रोमेलू लुकाकु आणि ड्राईस मर्टन्स यांनी हॉवर्डला मिठी मारून त्याचे अभिनंदन केले. बेल्जियमचा कर्णधार व्हिन्सेट कोम्पानीने आपल्या ट्विटर पेजवर ‘दोनच शब्द : टीम हॉवर्ड, सन्माननीय’ असे लिहून त्याच्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. हॉवर्डने या सामन्यात तब्बल १६ वेळा चेंडूला जाळीत जाण्यापासून रोखले आणि म्हणूनच पराभूत संघाचा असूनही त्याची सामनावीर म्हणून निवड झाली. हॉवर्डच्या कामगिरीमुळे संघाचे प्रशिक्षक जुर्गन क्लिन्समन हेदेखील खूपच प्रभावित झाले. टीमच्या कामगिरीमुळेच आम्ही सामन्यात परतलो होतो, असे गौरवोद्‌गार क्लिन्समन यांनी काढले. साखळी सामन्यांमध्येही हॉवर्डने अमेरिका व पोर्तुगाल यांच्यातील २-२ अशा बरोबरीत राहिलेल्या लढतीत चमकदार कामगिरी केली होती आणि तेव्हाही त्याची सामनावीर म्हणून निवड झाली होती. वर नमूद केलेल्या नावाशिवायदेखील इतर काही संघांच्या गोलरक्षकांनीदेखील शानदार कामगिरी करून प्रभावित केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=13929

Posted by on Jul 2 2014. Filed under क्रीडा, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, ठळक बातम्या (2404 of 2455 articles)


= ‘युसए’वर २-१ अशी मात= साल्वाडोर, [२ जुलै] - विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम सामन्यात केव्हिन डी ब्रूनी व रोमेलू ...

×