Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » घर, कारचे स्वप्न स्वस्त झाले

घर, कारचे स्वप्न स्वस्त झाले

=रेपोदरात पाव टक्क्याची कपात=
RBI GATEनवी दिल्ली, [४ मार्च] – आर्थिक सुधारणा अधिक गतीने राबविण्याचा अर्थसंकल्पातील प्रस्ताव आणि महागाईच्या दरात झालेली घसरण या पार्श्‍वभूमीवर भारतीर रिझर्व्ह बँकेने आज बुधवारी आपल्या पतधोरणाच्या द्वैमासिक आढावा बैठकीच्या आधीच रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात जाहीर केली. यामुळे हा व्याज दर आता ७.५० टक्क्यांपर्यंत खाली आला असून, यामुळे सर्वसामान्यांचे स्वत:चे घर आणि कार खरेदी करण्याचे स्वप्नही आता स्वस्त होण्याची शक्यता आहे.
अल्प मुदतीच्या कर्जावरील व्याजाचा अर्थातच रेपो दर (आरबीआयकडून बँकांना देण्यात येणार्‍या कर्जावरील व्याजाचा दर) आतापर्यंत ७.७५ टक्के होता. तो आता ७.५० टक्के इतका झाला आहे. रेपो दर कमी करण्याचा हा निर्णय तत्काळ प्रभावाने देशभरात लागू होणार आहे. इतर व्याजदरांमध्येही आवश्यकतेनुसार तडजोड करण्यात येणार असल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी पत्रपरिषदेत दिली.
आरबीआयने रेपो दरात कपात केली असली तरी, कॅश रिझर्व्ह रेशोचा दर (सीआरआर) ४ टक्के कायम ठेवला आहे. महागाईवर नियंत्रण ठेवण्याच्या आणि आर्थिक तुटीला आळा घालण्याच्या सरकारच्या प्रयत्नानंतर आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वच बँका आरबीआयच्या या निर्णयाचा लवकरच पाठपुरावा करणार असल्याचा विश्‍वास इंडियन बँक असोसिएशनने व्यक्त केला आहे.
आरबीआयने रेपोदरात कपात करण्याची गेल्या दोन महिन्यातील ही दुसरी वेळ आहे. याआधी डिसेंबर महिन्यात रेपो दर ०.२५ टक्क्यांनी कमी करून ७.७५ टक्के करण्यात आला होता. दरम्यान, या दरकपातीमुळे शेअर बाजारात प्रचंड तेजी पाहायला मिळाली आहे.
अर्थव्यवस्थेला चालना मिळणार : अर्थराज्यमंत्र्यांचा विश्‍वास
भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपोदरात ०.२५ टक्क्यांची कपात जाहीर केल्याने याचा फायदा अर्थव्यवस्था बळकट होण्यात आणि सर्वसामान्यांच्या गृह व वाहन कर्जावरील व्याजदरात कपात होण्यात होईल, असा विश्‍वास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी व्यक्त केला.
महागाईच्या दरात लवकरच आणखी घसरण होणार असून, अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळणार असल्यामुळे रेपो दरात आणखी कपात करण्यासाठी बराच वाव आहे. गेल्या आठवड्यात सरकारने देशाला प्रगतीच्या मार्गावर नेणारा अर्थसंकल्प सादर केला होता, त्याचेच हे प्रतीक आहे, असे सिन्हा यांनी पत्रकारांना सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21125

Posted by on Mar 5 2015. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1969 of 2453 articles)


=आरोपी यादीतून नाव वगळण्यास हायकोर्टाचा नकार= मुंबई, [४ मार्च] - महाराष्ट्र कॉंगे्रसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी खांद्यावर येऊन दोन दिवसही लोटले नसताना, ...

×