Home » ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » चर्चेतून कोणतीही प्रगती नाही : राम माधव

चर्चेतून कोणतीही प्रगती नाही : राम माधव

=जम्मू-काश्मिरातील पेच=
23Fir03.qxpनवी दिल्ली, [१८ मार्च] – जम्मू-काश्मिरात सरकार स्थापन करण्याच्या मुद्यावर पीडीपी आणि भाजपा यांच्यात सुरू असलेल्या चर्चेतून अद्याप कोणतीही प्रगती झाली नाही. भाजपा महासचिव आणि जम्मू काश्मीरचे प्रभारी राम माधव यांनी आज शुक्रवारी या आशयाचे संकेत दिले.
११, अशोक रोड या भाजपा मुख्यालयात पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना राम माधव म्हणाले की, जम्म-काश्मिरात सरकार स्थापन करण्याच्या मुद्यावर पीडीपी आणि भाजपा यांच्यात असलेला गतिरोध कायम आहे. या मुद्यावर अद्याप कोणतीही प्रगती झाली नाही.
पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी गुरुवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची राजधानीत भेट घेतली. त्यानंतर राज्यात लवकरच पीडीपी-भाजपा सरकार सत्तारुढ होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यात सरकार स्थापण्यात भाजपातर्फे महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्‍या राम माधव यांना जम्मू-काश्मिरात येत्या एक आठवड्यात सरकार स्थापन होणार का, असा प्रश्‍न विचारला असता, याचे उत्तर माझ्याजवळ नाही, असे ते म्हणाले.
सरकार स्थापन करण्याबाबत मेहबुबा मुफ्ती यांच्या काही अटी भाजपाने मान्य केल्या का, या प्रश्‍नावर राम माधव म्हणाले की, कोणत्याही अटी मान्य करण्यात आल्या नाही. राज्यात कोणत्याही अटींवर सरकार स्थापन करण्याची भाजपाची तयारी नाही. मेहबुबा मुफ्ती यांनी आधी राज्यात सरकार स्थापन करावे आणि नंतर आपल्या मागण्यांबाबत केंद्र सरकारशी चर्चा करावी. आपल्या मागण्यांसाठी केंद्र सरकारशी चर्चा करण्याचा अधिकार कोणत्याही राज्य सरकारला असतो.
मुफ्ती मोहम्मद सईद राज्यात मुख्यमंत्री असताना जी परिस्थिती होती, त्यात आणि आताच्या परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने त्यांच्या जागी नवा नेता निवडण्याची जबाबदारी पीडीपीची होती, ती जबाबदारी त्या पक्षाने पार पाडली नाही, याकडे राम माधव यांनी लक्ष वेधले.
सरकार स्थापन करण्याबाबत आमच्याकडून कोणतीही अडचण नाही. पुढाकार पीडीपीला घ्यायचा आहे. त्यावेळी जी स्थिती होती, त्या स्थितीतच सरकार बनले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यात काही फेरबदल करायचा असेल, तर त्याबाबत सरकार स्थापन झाल्यावरच चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27436

Posted by on Mar 19 2016. Filed under ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य (620 of 2452 articles)


नवी दिल्ली, [१८ मार्च] - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात गेल्या ९ फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमात देशद्रोही घोषणा दिल्याप्रकरणी देशद्रोहाचा खटला दाखल ...

×