Home » गुजरात, ठळक बातम्या, राज्य » चला, एकत्र काम करू या

चला, एकत्र काम करू या

  • पंतप्रधान मोदी यांची हाक
  • व्हायब्रंट गुजरातचे उद्‌घाटन

PTI1_11_2015_000066Bगांधीनगर, [११ जानेवारी] – संपूर्ण जगाला व्यवसाय करण्यासाठी भारताला सर्वोत्तम आणि सहज असे ठिकाण म्हणून समोर आणायचे आहे. माझे सरकार हे उद्दिष्ट पूर्ण करणार आहे. आम्ही केवळ घोषणा करीत नाही, प्रत्यक्ष कृती करतो. भारतीय प्रचंड आशावादी असून, भारतासोबत काम करण्यासाठी जगही उत्सुक आहे. जगभरातील गुंतवणूकदारांना भारताकडे आकर्षित करण्यासाठी आपण एकत्र यायलाच हवे. ‘चला, सर्वांच्या कल्याणासाठी आपण एकत्र येऊन काम करू या,’ अशी हाक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी येथे दिली.
सातव्या ‘व्हायब्रंट गुजरात’ संमेलनाचे गांधीनगर येथे आज थाटात उद्‌घाटन झाले. त्यावेळी मोदी बोलत होते. भाषणाच्या सुरुवातीला मोदी यांनी फ्रान्सवरील दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध करून आम्ही फ्रान्सच्या जनतेसोबत असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर उपस्थितांचे स्वागत करीत सर्वांचेच आभार मानले.
अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तसेच रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी उत्पादन क्षेत्राला बळकट करण्याची गरज नमूद करताना मोदी म्हणाले की, प्रकल्पांना तत्काळ मंजुरी मिळण्याकरिता आपल्या सरकारने केंद्र आणि राज्य स्तरावर एक खिडकी योजना तयार केली आहे. भाजपाप्रणीत रालोआ केंद्रात सत्तेवर आल्यानंतर अवघ्या सात महिन्यांच्या अल्प कालावधीत निराशा आणि अनिश्‍चिततेचे वातावरण दूर झाले आहे. अगदी पहिल्या दिवसापासून माझ्या सरकारने अर्थव्यवस्था मजबूत करण्याची मोहीम हाती घेतली आहे. सहजपणे भाकीत करण्यासारखे, पारदर्शक आणि विश्‍वासार्ह असे वातावरण देशात निर्माण करण्यासाठी माझे सरकार वचनबद्ध आहे. भारतात व्यवसाय करणे अतिशय सोपे व्हावे, हाच तुमच्या आणि माझ्या मनातील महत्त्वाचा मुद्दा आहे. माझे सरकार याच दिशेने काम करीत आहे, याचा विश्‍वास मी तुम्हाला देतो. आर्थिक सुधारणांचे चक्र गतीने पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कुणीही सहजपणे भाकीत करू शकेल, असे आमच्या सरकारचे धोरण राहणार आहे. आमचे कर धोरण स्थिर राहील, असेही वचन मी देत आहे. या क्षेत्रात गेल्या सात महिन्यांच्या काळात आम्ही काही ठोस निर्णय घेतले आहेत.
आम्ही केवळ घोषणा करीत नाही, प्रत्यक्ष कृती करतो. प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत केवळ १०० दिवसांत आम्ही ११ कोटी नवीन बँक खाती उघडली आहेत. आम्ही सर्व जगाला एक कुटुंब मानतो. जगातील शंभरपेक्षा अधिक देश येथे एकाच छताखाली आले आहेत. त्यामुळेच आम्ही ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना मानतो. काही लोकांना वाटत असेल की, मोदी एखाद्या गोष्टीला खूप महत्त्व देऊन उंच का नेऊन ठेवतात, पण, सत्यता अशी आहे की, ती उंच पोहोचलेली गोष्टच सरकारला काम करण्याची प्रेरणा देत असते. भारताने केवळ पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम यशस्वी करून दाखविली आहे. अहमदाबादमध्ये रिक्षाच्या प्रवासासाठी प्रति किलोमीटर १० रुपये खर्च येतो. मात्र आम्ही केवळ ७ रुपये किलोमीटर एवढ्या कमी खर्चात मंगळ मोहीम यशस्वी करून दाखविली आहे. भारतात संरक्षण, विमा, बांधकाम तसेच द्रुतगती रेल्वे मार्गांसह अन्य क्षेत्रे थेट विदेशी गुंतवणुकीसाठी खुली आहेत. गुंतवणुकीसंदर्भात काही अडचणी असल्यास सरकार तुमच्या पाठिशी आहे, असा विश्‍वास मी आज येथे तुम्हाला देत आहे, असे मोदी यांनी आवर्जुन सांगितले.
योगाला आंतरराष्ट्रीय मान्यता दिल्याबद्दल संयुक्त राष्ट्र संघाचे आभार मानताना, जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेला भारत आर्थिक महासत्ता म्हणून विकसित होत आहे, अशा वेळी आपण स्थैर्य आणि सर्वांच्या कल्याणासाठी एकत्र येऊन काम करण्याची नितांत गरज आहे. खाजगी आणि सार्वजनिक गुंतवणुकीच्या माध्यमातून पायाभूत सुविधा विकसित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे मोदी म्हणाले.
यावेळी संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून, अमेरिकेचे विदेश मंत्री जॉन केरी, जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम यॉंग किम यांच्यासह १०० देशांचे प्रतिनिधी आणि भारतासह जगभरातील उद्योजक उपस्थित होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19566

Posted by on Jan 11 2015. Filed under गुजरात, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in गुजरात, ठळक बातम्या, राज्य (2256 of 2452 articles)


=सुब्रम्हण्यम स्वामी यांचा गौप्यस्फोट= कोलकाता, [११ जानेवारी] - नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू १९४५ मध्ये विमान अपघातात झाला नव्हता, त्यांची ...

×