Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » चिदम्बरम् पिता-पुत्रावरून संसदेत पुन्हा गदारोळ

चिदम्बरम् पिता-पुत्रावरून संसदेत पुन्हा गदारोळ

loksabhaनवी दिल्ली, [२ मार्च] – एअरसेल-मॅक्सिस प्रकरणातील भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून माजी केंद्रीय मंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम् आणि त्यांचा मुलगा कार्तीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज बुधवारी लागोपाठ दुसर्‍या दिवशीही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. यामुळे राज्यसभेत अनेकदा कामकाज स्थगित करावे लागले. लोकसभेतही अण्णाद्रमुकने या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे सभापती सुमित्रा महाजन यांनी या मुद्यावर चर्चा करण्याची परवानगी दिली.
आज बुधवारी लोकसभेत कामकाजाला प्रारंभ होताच चिदम्बरम् पितापुत्रावर कारवाई करावी, अशी मागणी करत अण्णाद्रमुक सदस्य घोषणा देत वेलमध्ये आले. सदस्यांच्या भावना लक्षात घेता प्रश्‍नोत्तराच्या तासानंतर नियम १९३ नुसार या मुद्यावर दोन तासांची अल्पकालीन चर्चा करण्याची परवानगी सभापती महाजन यांनी दिली. न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणावर सभागृहात चर्चा करता येणार नाही, सभागृहाच्या कामकाजाच्या नियमांचे हे उल्लंघन असल्याचा आरोप करत कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांनी सभात्याग केला. तत्पूर्वी चर्चेला विरोध करत कॉंग्रेस आणि डावे सदस्य घोषणा देत वेलमध्ये आले होते.
अण्णाद्रमुक आणि बिजू जनता दलाच्या सदस्यांनी चर्चेत सहभागी होताना या मुद्यावरून कॉंग्रेस आणि भाजपा यांच्यात हातमिळवणी असल्याचा आरोप केला. या पितापुत्राला वाचवणारी ताकद कोणती, अशी विचारणाही या पक्षांनी केली. न्यायालयात प्रलंबित असलेल्या मुद्यावर सभागृहात चर्चा करता येत नाही, याकडे तृणमूल कॉंग्रेसचे सौगत राय यांनी लक्ष वेधले. सभागृहाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीवर आरोप करता येणार नाही, असेही ते म्हणाले. या मुद्यावर चर्चा करण्यासाठी जी नोटीस देण्यात आली, त्यात कोणत्याही व्यक्तीचे नाव नाही, त्यामुळे या मुद्यावर चर्चा करण्याची परवानगी देण्यात आली, असे सभापती सुमित्रा महाजन यांनी स्पष्ट केले.
चर्चेला प्रारंभ करताना बिजू जनता दलाचे भर्तुहरी मेहताब यांनी या प्रकरणी अद्याप एफआयआरही दाखल करण्यात आला नाही, तसेच सीबीआयने आरोपपत्रही दाखल केले नाही, असा आरोप केला. या प्रकरणाचा सविस्तर तपशील देत या मुद्यावर कॉंग्रेस आणि भाजपा यांच्यात हातमिळवणी असल्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीत दिरंगाई केली जात आहे, असा आरोप मेहताब यांनी केला. या प्रकरणात एखादा सरकारी अधिकारी वा त्याच्या नातलगाचा सहभाग आहे का, अशी विचारणाही मेहताब यांनी केली.
चिदम्बरम् यांच्या मुलाने जगभरातील रियल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असल्याचे आयकर आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) टाकलेल्या धाडींमधून स्पष्ट झाले, याकडे मेहताब यांनी लक्ष वेधले.
अवैध सावकारीच्या माध्यमातून चिदम्बरम् यांनी जगभर आपले आर्थिक साम्राज्य उभे केले. बाहेर देशातील काळा पैसा देशात आणण्याच्या गोष्टी करणारे पंतप्रधान मोदी याप्रकरणात कठोर कारवाई करतील का, अशी विचारणा अण्णाद्रमुकचे के. टी. जी. व्यंकटेश यांनी केली. हा मुद्दा १७६ लाख कोटी रुपयांचे नुकसान करणार्‍या स्पेक्ट्रमशी संबंधित असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणात सर्वांत चांगले आणि अभ्यासपूर्ण भाषण भाजपाचे किरीट सोमय्या यांचे झाले. शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचे भाषण झाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26998

Posted by on Mar 3 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (777 of 2453 articles)


=जेएनयूचा खुलासा= नवी दिल्ली, [२ मार्च] - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील महिषासूर दिनप्रकरणी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी संसदेत दिलेली ...

×