Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » छत्रपतींनंतर मोदींनीच ओळखले सागरी सामर्थ्य

छत्रपतींनंतर मोदींनीच ओळखले सागरी सामर्थ्य

=मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन=
FADNAVIS_DEVENDRA1मुंबई, [१५ एप्रिल] – देशाला समृद्ध आणि सशक्त करण्यासाठी सागरी सामर्थ्य महत्त्वाचे आहे. हे सामर्थ्य देशाच्या इतिहासात सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले आणि त्यानुसार पावले टाकली. त्यानंतर कित्येक वर्षांनी सागरी सामर्थ्याची खर्‍या अर्थाने जाणीव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झाली आणि त्यांनी सागरी सामर्थ्य बळकट करीत देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवारी येथे केले.
‘समुद्री भारत’ परिषदेच्या दुसर्‍या दिवशी ‘राज्यातील सागरी क्षेत्रातील संधी’ या विषयावर आयोजित परिसंवादात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर, कर्नाटकचे अतिरिक्त मुख्य सचिव कांबळे आणि परिसंवादाचे संयोजक व महाराष्ट्राचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव गौतम चॅटर्जी उपस्थित होते. महाराष्ट्रातील सागरी क्षेत्रात गुंतवणूक करण्याची ही सुवर्ण संधीच आहे. देश-विदेशातील गुंतवणूकदारांचे महाराष्ट्रात स्वागत आहे, असे आवाहन करीत मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, शासकीय पातळीवर सर्व निर्णय झटपट घेतले जातील, कोणत्याही प्रकारचा अडथळा या कामात येऊ दिला जाणार नाही, यासाठी बंदर विकास खाते मी माझ्याकडे ठेवले आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी याविषयी निश्‍चिंत राहावे. सर्व बाबतीत मी जातीने लक्ष देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्रातील समुद्री किनार्‍यांच्या विकासासाठी गठित करण्यात आलेल्या महाराष्ट्र सागरी मंडळाकडून आठ सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. माझे सरकार व्यापारातील सुलभता यावर लक्ष केंद्रित करीत आहे. आज झालेल्या आठ सामंजस्य करारांवर आमच्या सरकारने अतिशय त्वरेने आणि पारदर्शक निर्णय घेतले आहेत. यासाठी आमचे सर्व अधिकारी कौतुकास पात्र आहेत. जहाज बांधणी आणि तोडणी, जहाजाची डागडुजी, बंदरांची कल्पक रचना आणि जेट्टींचे व्यवस्थापन यासारख्या उद्योगात अजूनही मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीच्या संधी आहेत. यातून राज्यात आर्थिक क्रांती तर होणार आहेच, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रेवदंडा येथील दोन, दिघी येथील तीन, मुंबईतील दोन आणि मानखुर्द येथील एका सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. या आठ सामंजस्य करारांमुळे महाराष्ट्रात १४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, त्यातून सुमारे ५,२०० जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील समुद्र किनार्‍यांचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र बंदर धोरण तयार केले आहे. त्याचा फायदा सर्वांनी घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
लक्ष्मीकांत पारसेकर
गोवा सरकारने गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारे धोरण तयार केले असून, त्याचा फायदा राज्याला मिळत आहे, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांनी या चर्चासत्रात बोलताना सांगितले.
गेल्या १४ महिन्यांत सरकारने पर्यावरणाशी अनुकुल आणि रोजगार निर्माण करणार्‍या ८४ प्रकल्पांना मान्यता दिली आहे. येत्या पाच वर्षांत ५० हजार रोजगार निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले.
नागपूरपासून सुपर एक्सप्रेस वे
नागपूरपासून मुंबईपर्यंत सुपर एक्सप्रेस वे बांधण्याचा निर्णय सरकारने घेतला असूून, यामुळे राज्यातील १४ जिल्हे मुंबईशी जोडले जाणार आहेत. याचा फायदा या भागातील उद्योग व्यवसायांना होणार आहे. आपल्या भागातील माल ते थेट मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्टपर्यंत नेऊ शकतील. तिथून या मालाची विदेशात निर्यात करणे शक्य होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27820

Posted by on Apr 16 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (492 of 2451 articles)


=१३० जणांचा मृत्यू= नवी दिल्ली, [१५ एप्रिल] - यावर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट आली असून, ...

×