Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » जंगलराजचा अंत करा

जंगलराजचा अंत करा

  • गया येथील रॅलीत पंतप्रधानांचे आवाहन
  • अहंकार, अन्यायापासून मुक्ती देणारी विधानसभा निवडणूक
  • परिवर्तन हाच सर्वोत्तम मार्ग

MODI IN BIHAR RALLYगया, [९ ऑगस्ट] – विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर असलेल्या बिहारच्या गया येथील विशाल रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी जदयु आणि राजद या दोन्ही पक्षांचा पुरता पंचनामा केला. जंगलराज आणि अहंकार किती घातक आहे, त्यामुळे किती त्रास होतो, याचा अनुभव बिहारवासी २५ वर्षांपासून घेत आहेत. आता हे लोक राज्यात ‘जंगलराज भाग-२’ आणू पाहत आहेत. बिहारची वाट लावायची नसेल, तर या जंगलराजचा अंत करण्याचा निर्धार आजच्या ऑगस्ट क्रांतिदिनीच करा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
रॅलीत लोटलेल्या विशाल जनसागराकडे पाहून मोदी म्हणाले की, बिहारच्या जनतेने परिवर्तनाचा निर्णय घेतला असल्याची खात्री आता मला पटली आहे. विकासाच्या माध्यमातून बिहारचे भाग्य बदलविण्याचा आणि शक्तिशाली बिहारची निर्मिती करण्याचा पक्का निर्धार मला या गर्दीत दिसत आहे. २५ वर्षांपासून तुम्ही ज्यांना सहन केले, ज्यांचा प्रत्येक अन्याय आणि अहंकार सहन केला, त्या सर्वांपासूनच मुक्ती देणारे पर्व या निवडणुकीत येणार आहे. ही निवडणूक जंगलराज आणि अहंकारी हुकूमशाहीपासून मुक्तता करणारी ठरणार आहे.
जंगलराज आणि अहंकारी हुकूमशाही, अशी मानसिकता असलेले लोक गेल्या २५ वर्षांपासून बिहारवर राज्य करीत आहेत. २५ वर्षांचा काळ जसा गेला, तसाच कार्यकाळ पुढील पाच वर्षांचा राहिला, तर काय होईल, याची जरा कल्पना करा. इतिहास, संस्कृती आणि अहिंसेची चर्चा बिहारशिवाय अपूर्ण आहे. पण, येथे सत्तेत बसलेल्या अहंकारी लोकांनी बिहारचा इतिहास व संस्कृतीसोबतच नागरिकांच्या स्वप्नांचाही चुराडा केला. बिहारकडे सर्व प्रकारची संपत्ती असताना आणि विकासाला वाव असतानाही हे राज्य विकासाच्या मार्गावर समोर का जात नाही, जनतेच्या स्वप्नांचा चुराडा कुणी केला, जंगलराज कुणी आणले, असा सवाल करीत बिहारला पुन्हा २५ वर्षे मागे न्यायचे नसेल, तर आजच विकासाचा संकल्प करा. तुमचा आशीर्वाद विकासाच्या रूपात मी परत करणार आहे. बिहारला वाचवायचे आहे… घडवायचे आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
‘जंगलराज भाग-१’च्या काळात सत्ताधारी नेत्यांना कारागृहाचा अनुभव नव्हता. पण, आता या नेत्यांना कारागृहाचा अनुभव आला आहे. हे नेते आता ‘जंगलराज भाग-२’च्या तयारीला लागले आहेत. या भाग दोनमध्ये बिहारवासीयांना बरबादीशिवाय काहीच दिसणार नाही. अलीकडेच भाजपा नेत्याची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली, ‘जंगलराज भाग-२’ ही सुरुवात आहे, असा घणाघाती हल्लाही पंतप्रधानांनी केला.
या लालटेनवाल्यांनी तुम्हाला अंधारात ठेवले आहे. वीज मिळत नाही. विद्यार्थ्यांना अंधारात अभ्यास करावा लागतो. मागील निवडणुकीत याच नेत्यांनी, वीज मिळली नाही, तर आम्ही पुन्हा मत मागणार नाही, असा निर्धार केला होता. वीज मिळाली नसतानाही हे लोक पुन्हा तुमच्यापुढे मत मागण्यासाठी येणार आहेत. हा विश्‍वासघात आहे. तुमचे भवितव्य या लोकांनी अंधारात नेले आहे. हा वारंवार विश्‍वासघात तुम्ही मान्य करणार का, असा सवाल करतानाच, ज्यांनी बिहारसारख्या संपन्न राज्याला बिमारू राज्य बनविले, त्यांना त्यांची जागा दाखवा, असेही पंतप्रधान म्हणाले.
विष पिणारे निवडणुकीनंतर जेव्हा विष ओकतील, तेव्हा ते कुणाच्या ताटात पडेल, नुकसान जनतेचेच होणार. त्यामुळे ज्यांनी विष घेतले आहे, त्यांना ते ओकण्याची संधीच द्यायला नको, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘कोण चंदन कुमार आहे आणि कोण भूजंग प्रसाद आहे, कोण विष पाजत आहे आणि कोण पित आहे, याची माहिती मलाही नाही. विष पिणार्‍याची आणि पाजणार्‍याची आपल्याला गरजच नाही,’ असा चिमटा पंतप्रधानांनी काढला.
पंतप्रधान म्हणाले, राजद म्हणजे ‘रोज जंगल राज का डर’ आणि जदयु म्हणजे ‘जनतेचे दमन आणि उत्पीडन’

Short URL: https://vrittabharati.in/?p=23615

Posted by on Aug 10 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (1522 of 2452 articles)


=नजमा हेपतुल्ला यांची भूमिका= पाटणा, [९ ऑगस्ट] - या देशात वास्तव्यास असलेल्या प्रत्येक समाजाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळजी आहे. ...

×