Home » क्रीडा, ठळक बातम्या » जगमोहन दालमिया यांचे निधन

जगमोहन दालमिया यांचे निधन

jagmohan dalmiaकोलकाता, [२० सप्टेंबर] – भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) व बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे आज रविवारी येथे एका खाजगी इस्पितळात उपचारादरम्यान हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ७५ वर्षांचे होते.
गेल्या गुरुवारी रात्री त्यांना छातीत दुखत असल्यामुळे तातडीने येथील बी. एम. बिर्ला हार्ट रिसर्च इंस्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले होते. दुसर्‍या दिवशी ऍन्जीयोग्राफी केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली होती. कालच डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती. इस्पितळाच्या कोरोनरी क्रिटिकल केअर युनिटमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज अचानक त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी, तसेच बराच मोठा आप्त-मित्र परिवार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे दालमिया हे पहिले भारतीय क्रिकेट प्रशासक होते. ते याआधी जेव्हा बीसीसीआयचे अध्यक्ष होते तेव्हापासून भारतीय क्रिकेटमध्ये व्यावसायिकतेचे वारे वाहू लागणे सुरू झाले होते. कोलकाता शहरामधील गणमान्य उद्योगपतींमध्ये त्यांची गणना होत होती. एम. एल. दालमिया ऍण्ड कंपनीचे ते सहमालक होते. १९७९ साली ते बीसीसीआयमध्ये आले होते. १९८३ साली ते बीसीसीआयचे कोषाध्यक्ष असताना भारताने क्रिकेट विश्‍वचषक जिंकला होता. त्यानंतर ते अनेक वर्षे बीसीसीआयमध्ये कार्यरत होते. त्यांनी याआधीही अनेकदा बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषविले आहे. १९९७ साली ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी अविरोध निवडून आले होते.
जगमोहन दालमिया यांचा अल्पपरिचय
३० मे १९४०, कोलकाता येथे जन्म, तरुण वयात कोलकात्यातील क्लब क्रिकेटमध्ये यष्टीरक्षण, १९७९ मध्ये बीसीसीआयच्या क्रिकेट प्रशासनात प्रवेश, १९८३ त बीसीसीआयचे कोषाध्यक्ष, १९८७ आणि १९९६ साली भारतात विश्‍वचषकाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका, १९९१ मधील दक्षिण आफ्रिकेच्या ऐतिहासिक भारत दौर्‍याच्या आयोजनात महत्त्वाचा वाटा, भारतीय क्रिकेटमध्ये पैसा आणण्याचे श्रेय दालमियांना, १९९७ मध्ये आयसीसीचे अध्यक्ष, २००१ ते २००४ बीसीसीआयचे अध्यक्ष, २००५ मध्ये दालमियांच्या मतदानाने शरद पवार पराभूत, रणबीरसिंग बोर्डाच्या अध्यक्षपदी, २००६ मध्ये पवार सत्तेत आल्यावर दालमियांवर विश्‍वचषकाच्या आयोजनात गैरव्यवहाराचा ठपका, बोर्डातून हकालपट्टी, २००७ मध्ये दालमियांची कोर्टात धाव, आरोप सिद्ध करण्यात बीसीसीआय अपयशी, क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड, २०१३ मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीनिवासन यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर दालमियांची अंतरिम अध्यक्षपदी निवड, २ मार्च २०१५ ला बीसीसीआयच्या अध्यक्षपदी दालमियांची दहा वर्षांनी पुन्हा निवड आणि १७ सप्टेंबर २०१५
मान्यवरांच्या प्रतिक्रिया
बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह भाजपाध्यक्ष अमित शाह, सचिन तेंडुलकर, अनुराग ठाकूर तसेच राजीव शुक्ला यांच्यासह अनेकांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
जगमोहन डालमिया यांचे अचानक निधन झाल्याचे वृत्त ऐकून आपल्याला धक्का बसला असून त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी असल्याचे राष्ट्रपती प्रवण मुखर्जी म्हणालेे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवरून आपला शोक व्यक्त करताना म्हणाले की, या दु:खद क्षणी आपण दालमिया यांच्या कुटुंबियांसोबत असून जगमोहन दालमिया यांच्या आत्म्यास शांती लाभो.
पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी शोक व्यक्त करताना म्हणतात की, बंगालवर अतिशय प्रेम करणारे जगमोहन दालमिया हे उत्कृष्ट क्रीडा प्रशासक होते. त्याचे क्रिकेटमधील कार्य विसरणे शक्य नाही.
भारतीय तसेच जागतिक क्रिकेटचे मोठे नुकसान झाल्याची शोकसंतप्त भावना भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी ट्विटरवरून व्यक्त केली आहे.
दालमिया यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करीत जूनमध्ये आपण त्यांना भेटलो होतो तेव्हा ही शेवटची भेट असेल, असे वाटले नाही, अशाप्रकारचे ट्विट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने केले आहे.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष अनुराग ठाकूर आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, दालमिया आमचे प्ररणास्रोत होते, त्यांच्या निधनाने क्रिकेटची व आपली व्यक्तिशा मोठी हानी झाली आहे.
आयपीएलचे आयुक्त राजीव शुक्ला म्हणाले की, दालमिया यांच्या अचानक निधनाने क्रिकेटचे खूप मोठे नुकसान झाले आहे. आमचे अध्यक्ष असलेल्या जगमोहन दालमिया यांच्या अचानक जाण्याने आम्ही अतिशय दु:खी असल्याचे ट्विट बीसीसीआयने केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23974

Posted by on Sep 21 2015. Filed under क्रीडा, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, ठळक बातम्या (1431 of 2455 articles)


=पंतप्रधानांचे विरोधकांना सडेतोड उत्तर= नवी दिल्ली, [२० सप्टेंबर] - देशाच्या कानाकोपर्‍यात राहणार्‍या सामान्य माणसापर्यंत पोहोचणे, त्याच्या समस्या जाणून त्या सोडविणे, ...

×