Home » ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » जम्मू-काश्मिरात पावसाचा कहर

जम्मू-काश्मिरात पावसाचा कहर

  • झेलमचे पाणी श्रीनगरमध्ये घुसले
  • भूस्खलनामुळे २१ ठार
  • लष्कराचे ऑपरेशन मेघराहत-२ सुरू
  • राज्य शासनाकडून २३५ कोटी =

jk-floodsश्रीनगर, [३० मार्च] – गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातील भीषण जलप्रलयाच्या कटू आठवणी अजूनही ताज्या असतानाच, शनिवारपासून सातत्याने कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण काश्मीर खोर्‍यात पुन्हा थैमान घातले आहे. झेलम नदीला पूर आला असून, पुराचे पाणी श्रीनगरसह आसपासच्या अनेक गावांमध्ये घुसले आहे. बडगाममध्ये भूस्खलन होऊन दोन घरांचा ढिगारा झाला असून, त्याखाली दबून २१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर किमान १५ जण ढिगार्‍याखाली दबले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने २३५ कोटी रुपये मंजूर केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी श्रीनगरमध्ये दाखल झाले असून, राज्यातील स्थितीचा अहवाल ते पंतप्रधानांकडे सोपविणार आहेत.पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले असून, राष्ट्रीय आपत्ती निवारण केंद्राची (एनडीआरएफ) काही पथकेही खोर्‍यात पाठविण्यात आली आहेत. लष्कराने पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ऑपरेशन मेघराहत-२ सुरू केले आहे. पीरपंजालच्या दक्षिण भागात बचाव आणि मदत कार्य करण्यासाठी सज्ज राहाण्याचे निर्देश लष्कराला देण्यात आले आहेत. लष्करी जवानांनी कलाई ब्रिजजवळ चंडाक गावातून २४ जणांना सुरक्षित बाहेर काढले.
सलग तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे झेलम नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असून, श्रीनगर शहरातील अनेक भाग पुराच्या पाण्याखाली आला आहे. पुराच्या विळख्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी सुरक्षा दलाचे शेकडो जवान युद्धपातळीवर परिश्रम घेत आहेत. अन्न पदार्थ आणि इतर साहित्यासह हवाई दलाचे विमान भटिंडाहून श्रीनगरला रवाना झाले आहे. पूरस्थितीचा सामना करण्यासाठी जवानांच्या आणखी चार तुकड्या केंद्र सरकारने सज्ज ठेवल्या आहेत. दरडी कोसळल्याने श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मिरातील पूरस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या संकटाच्या काळात राज्य सरकारला हवी ती सर्व मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी उच्चस्तरीय अधिकार्‍यांचे एक पथकही रवाना केले आहे. सोबतच, त्यांनी राज्य सरकारसोबत सातत्याने संपर्कात राहाण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच्यावर सोपवली आहे. पंतप्रधानांच्या सूचनेनंतर ते लगेच श्रीनगरला रवाना झाले.
संपूर्ण काश्मीर खोर्‍याला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून, हवामान विभागाने येत्या ७२ तासपर्यंत पावसाचे थैमान कायम राहाणार असल्याचा इशारा दिला आहे. मुसळधार पावसासोबतच खोर्‍यातील बहुतांश भागात जोरदार बर्फवृष्टी होण्याची शक्यताही वर्तवली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दोन दिवस शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21859

Posted by on Mar 31 2015. Filed under ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य (1823 of 2452 articles)


=मलेशियन पोलिस करताहेत तपास= क्वालालम्पूर, [३० मार्च] - गेल्या आठवड्यात मलेशियातील पेनांग इथे योग महोत्सवासाठी गेलेले प्रख्यात आध्यात्मिक गुरू आणि ...

×