Home » ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य » जयललिता निर्दोष मुक्त

जयललिता निर्दोष मुक्त

=बेहिशेबी संपत्ती प्रकरण, १७ मे रोजी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ=
jaylalitaबंगळुरू, [११ मे] – बेहिशेबी संपत्तीप्रकरणी दोषी ठरविण्यात आल्यानंतर चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने आज सोमवारी निर्दोष मुक्त केले आहे. या निकालामुळे जयललिता यांचा पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या १७ मे राजी त्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
आपल्या ज्ञात उत्पन्न स्रोतांच्या बाहेर जाऊन जयललिता यांनी ६६.६४ कोटी रुपयांची माया जमा केल्याचा आरोप होता. या प्रकरणी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याविरुद्ध तामिळनाडूत खटला सुरू होता. त्यानंतर हा खटला कर्नाटकातील विशेष न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये विशेष न्यायालयाने जयललिता यांना दोषी ठरवून चार वर्षांचा कारावास आणि १०० कोटी रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. या न्यायालयाने जयललिता यांच्यासोबतच त्यांच्या खास मैत्रिण एन. शशिकला, व्ही. एन. सुधाकरन आणि जे. एलासवारसी यांनाही दोषी ठरवून चार वर्षाचा कारावास व दहा कोटी रुपयांचा ठोठावला होता. या निकालामुळे जयललिता यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
दोषी ठरविण्याच्या निकालाला आणि शिक्षेला जयललिता यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यासाठी उच्च न्यायालयाने विशेष खंडपीठाची स्थापना केली होती. या प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद अलीकडेच पूर्ण झाला होता. आज सोमवारी या खटल्याचा निकाल जाहीर करताना विशेष खंडपीठाने जयललिता, शशिकला आणि अन्य दोघांनाही आरोपमुक्त केले. दरम्यान, खटल्याचा निकाल येणार असल्याने आणि बंगळुरूमध्ये अण्णाद्रमुकचे मोठ्या संख्येत कार्यकर्ते जमा झाल्याने या शहरात सकाळपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते.
न्यायालयाने जयललिता यांना निर्दोष मुक्त करण्याचा निकाल जाहीर करताच अण्णाद्रमुकच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून प्रचंड जल्लोष केला. तामिळनाडूत ठिकठिकाणी मिठाई वाटण्यात आली.
जयललिता यांनी १९९१ मध्ये मुख्यमंत्रिपदावर विराजमान होण्यापूर्वी तीन कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली होती. आपल्या सत्ताकाळात त्यांनी मासिक केवळ एक रुपया मानधन घेतले. तथापि, पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांच्याकडे ६६.६५ कोटींची मालमत्ता असल्याचे उघड झाले. १८ सप्टेंबर १९९६ रोजी त्यांच्याविरुद्ध या प्रकरणी खटला दाखल करण्यात आला. तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपात तथ्य आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध १९९७ मध्ये आरोपपत्र दाखल झाले होते.
न्यायव्यवस्थेवर विश्‍वास : जयललिता
न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्‍वास होता. तो आज सार्थक ठरला आहे. या प्रकरणात विरोधकांनी मला मुद्दामच गोवले होते. न्यायालयाने मला निर्दोष मुक्त केले, याचा मनापासून आनंद आहे, अशी प्रतिक्रिया जयललिता यांनी व्यक्त केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22510

Posted by on May 12 2015. Filed under ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य (1704 of 2452 articles)


=पाकी उच्चायुक्ताचे अजब वक्तव्य= नवी दिल्ली, [११ मे] - केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातच असल्याचा दावा केला ...

×