Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » जलमार्ग वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती : गडकरी

जलमार्ग वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती : गडकरी

=१४ एप्रिलपासून मुंबईत भारत समुद्र परिषदेचे आयोजन=
nitin gadkari2नवी दिल्ली, [९ मार्च] – भारतीय समुद्र क्षेत्रात गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणात संधी आहे. त्याच्या माध्यमातून जगभरातील देशांना भारतात आमंत्रित करून देशाच्या समुद्र क्षेत्राचा विकास करण्याची सरकारची भूमिका असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज बुधवारी सांगितले.
जहाजबांधणी मंत्रालयातर्फे १४ ते १६ एप्रिल दरम्यान मुंबईत आयोजित भारत समुद्र परिषद २०१६ ची सविस्तर माहिती राष्ट्रीय मीडिया केंद्रात आयोजित पत्रपरिषदेत देताना गडकरी म्हणाले की, रस्ते आणि रेल्वेपेक्षाही जास्त क्षमता आज समुद्र क्षेत्रात आहे. आतापर्यंत या क्षेत्राच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले. रस्ता आणि रेल्वेने होणार्‍या वाहतुकीपेक्षा जलमार्गाने होणारी वाहतूक कितीतरी पटीने स्वस्त आहे. त्यामुळे अशा जलमार्ग वाहतुकीला प्राधान्य देण्याची भूमिका सरकारने घेतली आहे.
जलमार्ग वाहतुकीमुळे महागाई तर कमी होईल, पण यातून मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होणार आहे. देशाच्या विकासात जलमार्ग वाहतुकीचे मोठे योगदान राहणार आहे, यातून अर्थव्यवस्थेला गती मिळण्यासोबत देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नातही यामुळे दोन टक्क्याची भर पडणार आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
मुंबईच्या गोरेगाव येथील बॉम्बे कन्व्हेन्शन ऍण्ड एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित या परिषदेचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेच्या आयोजनात दक्षिण कोरियाचेही मोठे योगदान राहणार आहे. या परिषदेत सहभागी देश आणि कंपन्यांना भारतीय समुद्र क्षेत्रात गुंतवणूक आणि व्यवसायाची संधी मिळणार आहे. या परिषदेत नॉर्वे, सिंगापूर, संयुक्त अरब अमिरात, ब्रिटन, फ्रान्स आणि युरोपीयन समुदाय सहभागी होणार आहेत, असे ते म्हणाले.
ही परिषद म्हणजे ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाचाच भाग आहे. या परिषदेचा प्रचार करण्यासाठी कोलकाता, चेन्नई, हैदराबाद आणि अहमदाबाद येथे रोडशोचेही आयोजन करण्यात येणार आहे.
आज या परिषदेच्या माध्यम मोहमेचा शुभारंभ करण्यात आला. भारतीय समुद्र क्षेत्रात असलेल्या गुंतवणूक क्षमतेकडे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27187

Posted by on Mar 10 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (710 of 2453 articles)


=कन्हैयाचे पुन्हा विषारी बोल= नवी दिल्ली, [९ मार्च] - संसद हल्ल्याप्रकरणी फासावर लटकविण्यात आलेल्या अफजल गुरूचे समर्थन करून भारतविरोधी घोषणा ...

×